हे शीर्षक वाचून तुम्ही ‘पौरुषा’चा अर्थ ‘मर्दपणा’ असा घेणार असाल, तर तुमची फसगत होईल. अनेकदा एखाद्या स्त्रीला ‘पुरुषासारखी’ अशी उपमा दिली जाते, ती तिचा ‘टॉमबॉय’पणा, बिनधास्तपणा, शारीरिक ताकद अधोरेखित करण्यासाठी. इथे या ‘ती’चं नाव आहे ‘मंदाकिनी देवी’. ती वृद्ध आहे आणि ऐकू-बोलू शकत नाही. अर्थातच ती टॉमबॉयपणाच्या सार्वत्रिक व्याख्येत अजिबात बसत नाही. तरी तिला रुपेरी पडद्यावर ‘पौरुषाचं प्रतीक’ का म्हटलं असावं बरं?… त्याची मुळं आहेत ती ज्या काळात घडली त्या काळात.
जवळपास १ हजार वर्षांपूर्वीच्या चोल साम्राज्याच्या काळात स्त्रिया जरी राजकारणात लक्ष घालत होत्या, तरी शारीरिक वर्चस्व गाजवण्याची प्रतिमा स्त्रीरुपाच्या बाबतीत नव्हती. या काळात शस्त्र हातात न धरता आणि प्रत्यक्ष युद्धभूमीतही न उतरता वीरांगनेचंच कर्तृत्त्व गाजवणाऱ्या मंदाकिनीला चित्रपटात ‘मर्द’ म्हटलं जाणं त्या काळ-परिस्थितीला धरून उचितच!
हेही वाचा – अटरली-बटरली गोडुली
नुकत्याच येऊन गेलेल्या आणि आता ‘ॲमेझॉन प्राईम’वर पाहायला मिळणाऱ्या ‘पोन्नियिन सेल्व्हन- २’ (पीएस- २) या तमिळ चित्रपटातली मंदाकिनी देवी ही भूमिका कदाचित ऐश्वर्या रायच्या आतापर्यंतच्या अभिनयाच्या कारकिर्दीतली सगळ्यात आगळीवेगळी भूमिका ठरावी. मणिरत्नम् दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्व्हन’ चित्रपटाच्या भाग १ व २ मध्ये ऐश्वर्यानं दोन भूमिका साकारल्या आहेत. त्यातल्या ‘नंदिनी’ या खलनायिकेच्या व्यक्तिरेखेत तिनं केवळ डोळ्यांमधून भावभावना व्यक्त करून अभिनयात कशी बहार आणता येते, याचं उत्तम दर्शन घडवलंय. परंतु चित्रपटप्रेमींमध्ये चर्चेची ठरली, ती तिची याच चित्रपटातली मंदाकिनी देवीची भूमिका. ही दोन भागांची चित्रपटमालिका दक्षिण भारतात प्रचंड चर्चिली गेली असली, तरी हिंदी भाषेचा आणि बॉलिवूडचा प्रभाव असलेल्या राज्यांत या चित्रपटास यश मिळालं नाही. भाषेच्या अडसरामुळे उपेक्षित राहिलेल्या या चित्रपटात सांगितलेली मंदाकिनी देवीची गोष्ट जाणून घेण्याजोगीच.
मंदाकिनी ही श्रीलंकेची रानकन्या. हत्तीवर बसून फिरणारी, साधी वस्त्रं परिधान करणारी आणि दागिन्यांनी नटलेली नसूनही गुणांनी जिचं रूप खुलतं अशी. चोल साम्राज्याचा सम्राट सुंदर चोल. राजगादीवर बसण्यापूर्वी त्याची श्रीलंकेतल्या एका मोहिमेदरम्यान मंदाकिनीशी ओळख होते. पांड्या सैन्याच्या आरमारानं हल्ला चढवलेला सुंदर चोल लंकेतल्या एका बेटावर आश्रय घेतो. तिथे त्याला भेटलेली ही रानकन्या त्याचा जीव वाचवते आणि त्याला जीव लावतेही. चेहऱ्यावर देवतेसारखा गोडवा असलेल्या, शांत आणि सेवाभावी स्वभावाच्या मंदाकिनीवर सुंदर चोलचं मन जडतं. त्या काही दिवसांत दोघांचं प्रेम फुलतं. ‘मी परत येईन’ असं वचन मंदाकिनीला देऊन सुंदर चोल तंजावूरला परततो. पुढे त्याला राजेपदावर विराजमान व्हावं लागतं आणि मंदाकिनीला दिलेलं वचन दूर राहातं. त्यानंतर आपला मंत्री अनिरुद्ध याला सुंदर चोल मंदाकिनीला शोधून आणायला श्रीलंकेत धाडतो. पण मंदाकिनीनं स्वत:ला समुद्रात झोकून दिलं आणि ती मरण पावली अशी माहिती मिळते. आपण मंदाकिनीच्या केलेल्या विश्वासघाताचं शल्य मनात घेऊन राहिलेला राजा सुंदर चोल पुढे विवाह करतो आणि त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी होते.
इकडे मंदाकिनीचा मृत्यू झालेला नसतो. प्रियकराच्या वियोगानंतरही मंदाकिनीच्या माथी आलेले भोग संपत नाहीत. राजा वीर पांडियन तिचा गैरफायदा घेतो आणि त्यातून तिला नंदिनी आणि मुलगा मदुरांतकन् अशी जुळी मुलं होतात. मुलांना भारतातच ठेवून श्रीलंकेत परतलेली मंदाकिनी रानात साध्वीचं जीवन व्यतित करू लागते. तरीही सुंदर चोल आणि त्याच्या मुलांवर तिची दुरून मायेची नजर आहे. विशेषत: चोल साम्राज्याचा युवराज अरुणमोळी वर्मन् (राजा राजा चोलन्) तिला आपल्या मुलासारखा वाटतो. लहानपणी कावेरी नदीत पडलेल्या अरुणमोळीला मंदाकिनी वाचवते आणि त्यामुळेच त्याला कावेरीपुत्र (तमिळमध्ये ‘पोन्नियिन सेल्व्हन’) म्हणू लागतात. पुढेही एकदा श्रीलंकेच्या मोहिमेवर आलेल्या अरुणमोळीचा जीव मंदाकिनीच वाचवते. आणि अखेरीस तर सुंदर चोलच्या जिवावर उठलेल्या पांड्या सैनिकांचा डाव उधळून लावत मंदाकिनी स्वत:च्या उरात बाण घेऊन सुंदर चोलला जिवंत ठेवते. आपण मंदाकिनीचा पूर्वीच मृत्यू झाल्याचं ऐकून त्यावर विश्वास ठेवला आणि तिला शोधण्याचा पुन्हा प्रयत्न केला नाही, या पश्चातापानं दग्ध झालेल्या वयोवृद्ध, आजारी सुंदर चोलच्या हातांत मंदाकिनी प्राण सोडते, अशी ही कथा.
इथे हे अधोरेखित करायला हवं, की खरोखरच्या चोल साम्राज्यात मंदाकिनी नावाचं पात्र होतं का, याबद्दल कुणीही खात्रीनं सांगू शकत नाही. त्यामुळे मंदाकिनी हे पात्र ‘पोन्नियिन सेल्व्हन’ ही महाकादंबरी लिहिणाऱ्या कल्की या लेखकाच्या कल्पनेची भरारी असल्याचं मानलं जातं. खरी असो वा नसो, मंदाकिनीची गोष्ट पुस्तकात आणि चित्रपटातही मोठा चटका लावून जाते.
हेही वाचा – म्हणे, बलात्कार झालाच नाही, फक्त विनयभंग! असं म्हणताना जीभ कशी झडत नाही?
शुभ्रवस्त्रावृता आणि मनानंही तितक्याच निर्मळ असलेल्या स्त्रीसाठी तिच्या मृत्यूसमयी चित्रपटात एक खास गाणं वाजतं. ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘इलयोर सूडार’ हे गीत त्यातले शब्द आणि करुण रसासाठी आवर्जून ऐकायला हवं. त्यात केलेलं मंदाकिनीचं वर्णन भारतीय मेनस्ट्रीम चित्रपटांत दिसणाऱ्या स्त्रीप्रतिमांना छेद देणारं आहे. या गाण्याचे शब्द मराठीत काहीसे असे आहेत –
‘तुझ्या स्तुतीची कवनं आता तरुण गाणार नाहीत
स्त्रियाही तुझ्या कर्तृत्वाची एकतारी छेडणार नाहीत
तारा आता भंगल्या आहेत
एकमेकांच्या आवाजात आवाज मिसळून
तुझं कर्तृत्त्व आळवणाऱ्यांचे सूर फुटेनासे झालेत
पौरुषाचं प्रतीक…
शत्रूंचं निर्दालन करणारा वीर…
या तलवारीची तीक्ष्ण धार आता म्यान झाली आहे…
जाईच्या कळ्यांनो, तुम्ही फुलण्याचं तरी आता काय प्रयोजन?…’
ऐश्वर्या रायनं समर्थपणे रंगवलेली, काळजाला हात घालणारी मंदाकिनीची ही भूमिका या चित्रपटात वेगळी उठून दिसली. ती पाहायलाच हवी अशी.
(lokwomen.online@gmail.com)