सुचित्रा प्रभुणे
एखाद्या संस्थेचे अध्यक्षपद म्हटले की ती व्यक्ती ५०-६०च्या आसपास असणार असं आपण सहजपणे गृहीत धरतो. परंतु ऐन विशीत अध्यक्ष म्हणून निवड होणं, ते देखील जागतिक स्तरावर प्रसिद्ध आणि वलयांकित असलेल्या केंब्रिज युनियन सोसायटीसाठी. भारतीय वंशाच्या अनुष्का काळे हिने या संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून येऊन ,निव्वळ भारतीयांसाठी नाही तर केंब्रिज विद्यापीठाच्या परंपरेत एक नवा इतिहास रचला आहे.
केंब्रिज विद्यापीठ या नावाला एक विशिष्ट वलय आहे. अमुक एक व्यक्ती केंब्रिज विद्यापीठात शिकली आहे, असं नुसतं आपल्या कानावर पडले तरी भारी वाटते. मग अशा या विद्यापीठाच्या सन्माननीय जागेवर भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांची निवड झाली तरी आपला ऊर अभिमानाने भरून येतो. अगदी काही दिवसांपूर्वीच भारतीय वंशाची असलेली २० वर्षीय तरुणी अनुष्का काळे हिची केंब्रिज युनियन सोसायटीची अध्यक्ष म्हणून निवड झाली.
वाचकांना इथे प्रश्न पडू शकतो की, यात विशेष असे काय आहे? तर इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की, इतक्या तरुण वयात हा मान मिळणं आणि तोदेखील भारतीय वंशाच्या तरुणीला हे देखील केंब्रिजच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. ही निवड बिनविरोध झाली आहे, हे अजून खास वैशिष्ट्य.
हेही वाचा >>> स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
त्या आगोदर ‘केंब्रिज युनियन सोसायटी’ हे प्रकरण तरी काय आहे, ते प्रथम जाणून घेऊ या. केंब्रिज युनियन सोसायटी ही केंब्रिज विद्यापीठाची जागतिक स्तरावर नावाजलेली, सन्माननीय अशी संस्था आहे. १८१५ साली या संस्थेची स्थापना झाली असून, या संस्थेमार्फत वेगवेगळ्या विषयांवर वाद-विवाद घडविले जातात. या शिवाय अभिव्यक्त स्वातंत्र्यावरील नवनवीन विचार मांडणे,त्यांना जागतिक पातळीवर प्रोत्साहन देणे, यासाठी ही संस्था सक्रीय आहे.
या संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या मांदियाळीवर नजर टाकली तर प्रसिद्ध लेखक रॉबर्ट हॅरीस, कोब्रा बिअरचे संस्थापक करण बिलीमोरीआ, अर्थतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले जॉन केन्स यांचा समावेश आहे. याशिवाय थिओडोर रूझवेल्ट, रोनाल्ड रेगन यांसारखे अमेरिकन अध्यक्षदेखील या वाद-विवादात सहभागी झाले होते. तर चर्चिल, मार्गारेट थॅचर आणि जॉन मेजर यांसारख्या ब्रिटिश नेत्यांनी या संस्थेच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. तर दलाई लामा, बिल गेट्स, स्टीफन हॉकिंग यांसारखी मंडळी या संस्थेच्या विविध कार्याशी जोडली गेली आहे.
अशा या जागतिक स्तरावर विशेष वलय लाभलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या तरुणीची निवड होणं, तेदेखील बिनविरोध ही निश्चितच दखल घेण्याजोगी बाब आहे.
अनुष्का सध्या केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सिडनी-ससेक्स महाविद्यालयात इंग्रजी साहित्यात शिक्षण पूर्ण करीत आहे. या व्यतिरिक्त ती डीबेट ऑफिसर म्हणून देखील कार्यरत आहे.
हेही वाचा >>> निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
एका मुलाखतीच्या दरम्यान आपल्या निवडीविषयी आनंद व्यक्त करताना ती म्हणाली की, जागतिक स्तरावरील प्रसिद्ध अशा संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. माझ्या या कार्यकाळात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. संस्थेमार्फत घेतली जाणारी चर्चासत्रे ही अधिकाधिक व्यासंगी, सहज-सोपी आणि विविध क्षेत्रांशी कशी जोडता येईल, याकडे माझा अधिक कल असेल.
त्याचबरोबर संस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणारा ‘समर गार्डन पार्टी’ या कार्यक्रमाचे सहभाग शुल्क कमी करून त्यात सामान्य विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावयाचे आहेत.
याव्यतिरिक्त अनुष्का द.आशियाई सांस्कृतिक विभागाची सदस्य आहे. या गटातून निवड होणाऱ्या काही मोजक्याच महिलांच्या यादीत आता तिच्या नावाचाही समावेश झाला आहे, ही आणखी एक दखल घेण्याजोगी बाब.
अनुष्काच्या वयाचा विचार करता, लहान वयात तिने मोठे शिव-धनुष्य उचललेले आहे. जागतिक स्तरावर नावाजलेल्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविणे, हे जितके गौरवास्पद काम आहे, तितकेच ते जबाबदारीचेही आहे. पण आपल्याला नेमक काय करायचे आहे, याबाबतची तिची उद्दिष्टे स्पष्ट आहेत. त्यामुळे हे शिव-धनुष्य ती लीलया पेलेल यात शंकाच नाही.