Sex camp in China: आपला पती किंवा जोडीदार इतर कुणाशी संबंध प्रस्थापित करू नये, यासाठी चीनमध्ये महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी सेक्स कॅम्प नावाने एक शिबिर आयोजित केलेले असून या शिबिरात महिलांना कामवासनेचे धडे दिले जात आहेत. सेक्स अपील अकादमी नावाच्या संस्थेने हे शिबिर आयोजित केलेले असून यासाठी एका महिलेला ४२० डॉलर (जवळपास ३४,००० रुपये) इतके प्रवेश शुल्क आकारले जात आहे. मात्र चीनच्या सोशल मीडियावर या शिबिराच्या विरोधात आवाज उचलला जात आहे. असहाय महिलांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याची ही शक्कल असल्याची टीका केली जात आहे.
शिबिरात नेमकं काय होतं?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील हांगझोऊ शहरात दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. “लैंगिक कामवासनेच्या माध्यमातून तुम्ही (महिला) तुमच्या आयुष्याचे नियंत्रण मिळवू शकता”, अशी टॅगलाईन या शिबिराला देण्यात आली आहे.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांना विशेष पोशाख परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वैवाहिक जीवनातून हरवलेली उत्कटता पुन्हा जागृत करण्यासाठी काही युक्त्या येथे सांगितल्या जाणार असून त्यासाठी हा विशिष्ट पोशाख आवश्यक असल्याचे शिबिराच्या नियमांत नमूद करण्यात आलेले आहे.
शिबिरार्थींमध्ये कोण कोण होते?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या शिबिरात ३५ ते ५५ वयोगटातील महिलांनी भाग घेतला होता. कुणाच्या पतीने फसवणूक केली आहे, तर कुणी एकल पालक आहे, कुणाचा पती सोडून गेला आहे, अशा वेगवेगळ्या समस्या असलेल्या महिला याठिकाणी आल्या होत्या.
आयोजकांचा दावा काय?
एक महिला प्रशिक्षक या शिबिरातील महिलांना “व्यक्तिगत संबंध आणि लैंगिक जीवन” याबाबतचे धडे देणार आहे. या प्रशिक्षिकांनी थेरपिस्ट म्हणून काम केल्याचे सांगितले जाते. आयोजकांचे म्हणणे आहे की, त्यांची संस्था मध्यम वयीन महिलांना त्यांच्या आयुष्यातील आनंद पुन्हा मिळवून देण्यासाठी अशाप्रकारच्या शिबिराचे आयोजन करत आहे.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?
सोशल मीडियाने मात्र आयोजकांचा कोणताही दावा मान्य केलेला नाही. हे शिबिर म्हणजे अनैतिक व्यवसायाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. घरगुती समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांना आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून आकृष्ट करायचं आणि त्यांचं आर्थिक शोषण करण्याची ही घाणेरडी कल्पना आहे, अशी टीका सोशल मीडियावर काही युजर्स करत आहेत.
आणखी एका व्यक्तीने म्हटले की, मध्यमवयीन स्त्रीयांवर बऱ्याच जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या असतात. त्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य यातला फरक ओळखता येत नाही. पण वाचन आणि व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून स्वतःला आकर्षक ठेवता येऊ शकते. त्यामुळे अशा शिबिराच्या जाळ्यात अडकण्याऐवजी वाचनावर भर द्यावा.
© IE Online Media Services (P) Ltd