“ सुनंदा, आपल्या ग्रुपमधील सर्वांनी नर्मदा परिक्रमा करायचं ठरवलं आहे. तुझी सुद्धा परिक्रमा करण्याची इच्छा आहे, हे तू एकदा मला सांगितलं होतंस. पुढच्या महिन्यात जायचं आहे. २१ दिवसांची ट्रिप आहे, तू येशील ना?”
“२१ दिवस? अवघड आहे गं.”
“ त्यात अवघड काय आहे? तू रिटायर्ड झाली आहेस, आता काय सुट्टी मिळत नाही, हे कारण नाही. मुलगी सासरी आहे. मुलाचं लग्न झालं आहे. घरात सून आहे. नवरा त्याच्या शेअर मार्केट मध्ये बिझी असतो. आता काय अडचण आहे?”
“भैरवी, अगं घरातल्या कामांपासून बाई कधी रिटायर्ड होऊ शकते का? सायली आणि संकेतला सकाळी वेळेवर डबा द्यायचा असतो. ते सकाळी ९ वाजता घराबाहेर पडतात. नातवाची शाळा ११ वाजता असते. त्याचं आवरून द्यावं लागतं. आमच्या ह्याचं डाएट बघावं लागतं. त्यांची एन्जोप्लास्टी झाल्यापासून त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. हे सगळं सोडून मी २१ दिवस कशी येऊ शकेन?”
आणखी वाचा-आईने लेकीच्या सासरी रमू नये, पण घरच लेकीचं असेल तर? सूनेच्या घरावर हक्क कोणाचा?
सुनंदा आणि भैरवी बोलत असतानाच संजयराव त्यांच्या रूममधून बाहेर आले आणि म्हणाले, “भैरवीताई, सुनंदा तिच्या ऑफिसमधून रिटायर्ड झाली आणि आता फुलटाईम बिनपगारी नोकरी तिनं स्वीकारली आहे. ऑफिसमध्ये रजा तरी मिळत होत्या. इथं कोणतीही रजा नाही. तिथं गोपनीय अहवालातून तरी तिची प्रशंसा व्हायची. इथं कितीही राबली तरी कौतुकाचे शब्दही मिळत नाहीत. ऑफिसमध्ये तिला स्वतःला अपडेट राहावं लागायचं, इथं स्वतःकडं बघायलाही तिला वेळ नाही.”
त्यांचं बोलणं ऐकून सुनंदा म्हणाली, “ अहो, तिला काहीतरीच काय सांगताय? आपल्याच घरातील कामं म्हणजे नोकरी असते का? तुमचं आपलं काहीतरीच असतं.”
“सुनंदा, मी खरं तेच बोलतोय. तू नोकरीत असतानाही आपला मुलगा आणि सून त्यांच्या वेळेला ऑफिसला जात होते. आपल्या चिकुचं आवरण्यासाठी बाई होती. सगळं सुरळीत चालू होतं. तू स्वतः हे सर्व अंगावर ओढून घेतलं आहेस. तुझ्याशिवाय घरातील कामं होणारच नाहीत असं तुला वाटतं. यात अडकून राहू नकोस. हे मी अनेकवेळा तुला समजावून सांगितलं आहे पण तू यातून बाहेर पडायलाच तयार नाहीस.”
“ अहो, आत्ताच मुलांना आपली गरज आहे. इतके दिवस मी नोकरीत असल्याने स्वयंपाकासाठी आणि चिकुला सांभाळण्यासाठी बाई ठेवली होती, पण आता मी घरातच असते, मग उगाचच मोलकरणी कशाला ठेवायच्या?”
“सुनंदा, बायकांना काढून टाकण्याचा निर्णय तुझा होता आणि तू निवृत्त झाल्यामुळं मुलांनीही आता घरच्या कामासाठी तुला गृहीत धरलं आहे. आपल्या दोघांच्या नोकऱ्या, घरच्या जबाबदाऱ्या, मुलं यामुळं तरुण वयात आपल्या दोघांनाही आपलं लाईफ एन्जॉय करायला मिळालंच नाही, पण आता पुन्हा तू संसारात अडकली आहेस. स्वतःवरची बंधन तू वाढवली आहेस. आता तरी यातून बाहेर ये. आपल्यालाही एकत्रित वेळ काढता आलेला नाही. आपणही थोडा एकत्रित देश पाहू.”
भैरवी दोघांचं बोलणं ऐकत होती. तिनंही संजयरावांच्या बोलण्याला दुजोरा दिला, “सुनंदा, नोकरी करत असताना घरातील काही गोष्टी करणं जमत नाही म्हणूनच निवृत्त झाल्यावर आता तरी करू म्हणून घरातील सर्व कामं करण्याची जबाबदारी तू हौसेनं घेतलीस हे खरं असलं तरी त्यात तू स्वतःला अडकून घेतलं आहेस. निवृत्त झाल्यावर शांतपणे आयुष्य व्यतीत करणं, स्वतःचे छंद जोपासणं, व्यायाम करणं, प्रवास करणं, या गोष्टी करणंही महत्वाचं आहे. तुझ्या मानसिक आरोग्यासाठी ते गरजेचं आहे. मुलांच्या गरजेला मदत नक्की करावी आणि जेवढी मदत करणं तुला सहज शक्य आहे ती नक्की करच, पण ‘माझ्याशिवाय काहीच होणार नाही’ हा आपला अहंकार असतो. निवृत्ती मनातून स्वीकार. मुलांच्या संसारात तू अडकून राहू नकोस.’इदं न मम’ असं म्हणून या संसारातून बाहेर ये.”
आणखी वाचा-सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
संजयराव पुन्हा समजुतीच्या स्वरात म्हणाले, “सुनंदा, गेली अनेक वर्षे नर्मदा परिक्रमा करण्याची तुझी इच्छा आहे, हे मला माहिती आहे. तुझ्या मैत्रिणी निघाल्या आहेत तर नक्की जा. मुलांना त्यांचा संसार सांभाळण्याची सवय लाव आणि अगदी काही लागलच तर मी आहे,काळजी करू नकोस .”
संजयराव आणि भैरवी जे सांगत होते ते सुनंदाला पटतं होतं तरीही कळतंय, पण वळत नाही, अशी तिची अवस्था झाली होती. परंतु ‘मी आहे’ या संजयरावांच्या आश्वासक शब्दांनी तिला उभारी आली. नर्मदा परिक्रमा करायचीच, पण सांसारिक परिक्रमेतून हळूहळू निवृत्त व्हायचं असं तिनं मनात तरी ठरवलं.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
smitajoshi606@gmail.com