जगात चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या वादळाला प्रसारमाध्यमासह सोशल मिडियावरही भरपूर फूटेज मिळालं. इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या स्त्रीनं आपल्या जोडीदाराशी फारकत घेण्याचं उचललेलं पाऊल हा या चर्चेचा केंद्रबिंदू. झालं असं, की मेलोनी यांचा बॉयफ्रेंड न्यूज अँकर आंद्रेया जम्ब्रुनो यानं मीडियासेट न्यूज टॉक शो ‘डियारो डेल जिआर्नो’च्या ‘बिहाइंड द सीन’ दरम्यान स्त्रियांबद्दल अश्लील वक्तव्यवजा टिप्पणी केली. त्यानंतर मेलोनी यांनी आपण आंद्रेयापासून वेगळ्या होत असल्याचं जाहीर केलं.
जगाच्या एका कोपऱ्यात फुलपाखराने जिवाच्या आकांताने आपले पंख फडफडवले तर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात ते वादळ निर्माण करू शकतं, हे वाक्य लोकप्रिय आहे. मेलोनी यांच्या प्रकरणात मात्र एका देशाची पंतप्रधान जणू अप्रत्यक्षरित्या जगातील शोषित स्त्रियांची एक प्रतिनिधी झाली, अशाच प्रतिक्रिया गेले काही दिवस व्यक्त होत होत्या. सहजीवनात राहणाऱ्या दोन व्यक्ती वेगळ्या व्हायला अनेक दिवसांपासून साचलेली कारणं असतात, मात्र आंद्रेया यांच्या अश्लील टिप्पणी प्रकारानंतर ते घडलं, हे खरं. त्यामुळे मेलोनी यांनी आपल्या आणि जगभरातल्या स्त्रियांच्या स्वाभिमानाला ठेच लागू न देता एक ठाम निर्णय घेतला, दुसऱ्या स्त्रीबद्दल असभ्य बोलणाऱ्या जोडीदाराला सोडून दिलं, असा त्याचा थेट अर्थ घेतला जाणं साहजिकच होतं.
मेलोनी आणि आंद्रेया गेली १० वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहात होते. त्यांना जिनेव्ह्रा नावाची ७ वर्षांची मुलगीसुद्धा आहे. वरवर पाहता त्रिकोणी गोडी गुलाबीचाच संसार म्हणा ना! पण जेव्हा आंद्रेयाने पुरूषी अहंकाराची परिसीमा गाठली, त्यानंतर मेलोनी यांनी आपला निर्णय ठामपणे घेतला. कधी आंद्रेया आपल्या सहकारी महिलेशी लगट करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत होते, कधी तो त्याच्या स्त्री सहकाऱ्यांना ग्रुप सेक्ससाठी आमंत्रण देत होता. एकदा तर ‘मद्यपान केलेल्या तरुणी सामूहिक बलात्कारास बळी पडल्या तर त्याला त्यांचे मद्यपान कारणीभूत आहे’ असे अकलेचे तारे त्याने जाहीरपणे तोडले.
हेही वाचा… साटे-लोटे लग्नांबद्दल कायदा काय म्हणतो?
मेलोनी देशाचे सर्वोच्च पद धारण करतात. त्यांची स्वतःची एक प्रतिमा आहे हे आंद्रेयास नक्कीच माहिती होतं आणि असं असूनसुद्धा त्यानं आपलं वर्तन बदललं नाही. कमीअधिक फरकानं असं वागणारे पुरुष जगात अनेक आहेत. अगदी आपल्या आजूबाजूच्या कुटुंबांतही ते दिसतात.
स्त्रियांबाबतची आपली बुरसटलेली मतं जाहीरपणे, अभिमानाने व्यक्त करणारे… स्त्रियांना कशी अक्कल नसते, असं म्हणत ती केवळ उपभोग्य वस्तू असल्याचं मानणारे… समोरच्या स्त्रीची इच्छा नाही हे कळूनही तिला नकोसं होईल, इतकं तिच्या मागे लागणारे, तिच्यासमोर ‘सूचक’ बोलणारे… असे पुरूष आपण कमी पाहतो का?… हे सर्व खूपदा या पुरूषांच्या पत्नीच्या समोरही सुरू असतं. पण मेलोनी यांच्यासारख्या आपल्या नवऱ्याला किंवा पार्टनरला आपल्या तत्वांसाठी स्वतःच्या आयुष्यातून बेदखल करणाऱ्या स्त्रिया जगात किती असतील बरं?… ‘त्याच्या कृत्यांसाठी मला जबाबदार मानले जाऊ नये’ असे मेलोनी यांनी अखेर या कृतीतून जणू ठणकावून सांगितले.
ही हिम्मत तुमच्या-आमच्यासारखी मुलगी दाखवू शकेल का? अशी कितीतरी कुटुंबे असतात, जिथे पुरुषांच्या बेजबाबदार वर्तनामुळे विभक्त झालेल्या जोडप्याचा त्रास सगळं कुटुंब अनुभवत असतं. घरात पुरुष नैतिकतेनं वागत नसेल, मारझोड करत असेल, व्यसनी असेल, तरी त्याला धरून राहण्याचे, सर्व हालअपेष्टा सोसण्याचे संस्कार मात्र जगभरात फक्त स्त्रीवर केले जातात.
हेही वाचा… समुपदेश: लेबलिंग करताय?
आताच्या काळात शिक्षणानं स्त्रियांना स्वावलंबी बनवलं असलं, तरी पारंपरिकता सोडणं मात्र सगळ्यांनाच जमतं असं नाही. नवऱ्याशिवाय जगताना लोक काय म्हणतील? आपल्यालाच दोष देतील का? या केवळ विचारानंच अनेक स्त्रिया नवरा कसाही असला तरी त्याच्यासोबत आयुष्य ढकलतात. त्यात पदरी मूल असेल, तर मुलांच्या भविष्यासाठीही स्त्रिया अत्याचार सहन करत राहतात. कदाचित त्यांना विवाहामुळे मिळालेली सामाजिक प्रतिष्ठाही महत्त्वाची वाटत असावी. काही स्त्रियांच्या बाबतीत पतीपासून विभक्त झालो तर राहायचं कुठे? माहेरी राहू दिलं नाही तर काय? स्त्री कमावती नसेल तर आपल्या व मुलांच्या खर्चाचं काय, हे प्रश्न उद्भवतात. समाजातील इतर पुरुषांची कावळ्याची नजरही स्त्रिया ओळखून असतात. ते आपल्या नशिबी येऊ नये, यासाठीही काहीजणी पतीच्या वर्तनाकडे कानाडोळा करत असाव्यात. अशा अनेक जोडप्यांत लग्न हा केवळ सोपस्कार राहिलेला असतो. नवरा शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारे शोषण करतो, तरीसुद्धा खूप स्त्रिया ते लग्न मोडण्याची हिम्मत दाखवत नाहीत.
मेलोनी यांनी मात्र स्वतःच्या अस्तित्वाला, स्वकर्तृत्वाला, स्वतःच्या भविष्याला आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या स्त्रीत्वाला महत्त्व देऊन हिम्मत दाखवली आहे. ती अनेक पिचलेल्या स्त्रियांना मानसिक बळ निश्चित देईल. अर्थात असे निर्णय घ्यायचे झाले, तर स्त्रीला आधी स्वावलंबी- मुख्यत: आर्थिकदृष्ट्या आणि त्याबरोबरीनं मानसिकदृष्ट्याही व्हावं लागेल, हेही खरंच.
tanmayibehere@gmail.com