– किशोर अतनूरकर

क्वचित प्रसंगी स्त्रियांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असफल किंवा ‘फेल’ होऊन गर्भधारणा राहू शकते. असं होण्याचं सरासरी प्रमाण ०.४ टक्के- म्हणजे १ हजार शस्त्रक्रियेमागे ४ शस्त्रक्रिया असफल होऊन गर्भधारणा राहू शकते. 

कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी, स्त्रियांवर केली जाणारी शस्त्रक्रिया ही कायम स्वरुपाची पद्धत आहे. आपल्याला  मूलबाळ नको असा पती-पत्नीचा निर्णय झाल्यानंतर स्त्रियांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो. ऑपरेशन झाल्यानंतर गर्भधारणा रहाणार नाही हे अपेक्षित असतं, किंबहुना गर्भधारणा रहाण्याची शक्यता नसते. पण  क्वचित प्रसंगी हे ऑपरेशन असफल होऊन गर्भधारणा राहू शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

हेही वाचा – लिव्ह-इन नात्याची वैधता आणि वारसाहक्क…

असं होण्याचं प्रमाण तसं खूप कमी आहे. सर्वसाधारणपणे टाक्याचं ऑपरेशन केल्यानंतर एक हजार केसेसपैकी चार स्त्रियांमध्ये अशी समस्या निर्माण होऊ शकते. ही शस्त्रक्रिया बिनटाक्याच्या पद्धतीने किंवा दुर्बिणीद्वारे ( लॅपरोस्कोपिक ) पण केली जाते. या पद्धतीने ऑपरेशन केल्यास ते ऑपरेशन असफल किंवा ‘ फेल ‘ होऊन गर्भधारणा रहाण्याचं प्रमाण टाक्याच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या ऑपरेशनच्या तुलनेत किंचित जास्त असतं. ढोबळमानाने दुर्बिणीद्वारे स्त्रियांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असफल होण्याचं प्रमाण एक हजार केसेस मागे १८ इतकं आहे. याचा अर्थ टाक्याचं ऑपरेशन चांगलं आणि लॅपरोस्कोपिक पद्धतीनं केल्यास ‘ रिस्क ‘ जास्त असं समज करून घेऊ नये. दोन्ही पद्धती योग्यच आहेत.  

स्त्रियांसाठी केली जाणारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वास्तविक पहाता, साधी, सोपी, सुरक्षित आणि अतिशय परिणामकारक शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया करताना, गर्भाशयाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला असलेल्या आणि आतमधून स्त्री-बीज आणि पुरुषाचे शुक्राणू याना वाहून नेण्यासाठी जोडल्या गेलेल्या गर्भनलिकांचा ( Fallopian Tubes ) मार्ग बंद केला जातो. शस्त्रक्रियेनंतर स्त्री-बीज आणि शुक्राणूंचा संयोग होत नाही म्हणून, गर्भधारणा रहात नाही. 

कुटुंब नियोजनासाठी केली जाणारी ही शस्त्रक्रिया असफल होऊन आपल्याला गर्भ राहिला आहे ही बातमी त्या जोडप्यासाठी एक धक्का असतो यात शंका नाही. ‘असं कस झालं ?, माझ्याचं बाबतीत असं का झालं?, माझं काही चुकलं का?, ऑपरेशन करताना डॉक्टरनी चूक केली का ? आता पुढे काय करायचं ?’ असे अनेक प्रश्न सहाजिकच त्या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या मनात येतात. असं झालं की माणूस वैतागून जातो, बऱ्याचदा, डॉक्टरनेच ऑपरेशन करताना चूक केली, त्यामुळे असं झालं, असा समज करून घेऊन डॉक्टरवर चिडतो, राग व्यक्त करतो, जाब विचारतो. काहीजण तर डॉक्टरविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करतात, डॉक्टरला कोर्टात खेचतात. या पद्धतीने डॉक्टरवर राग व्यक्त करताना, ऑपरेशन करण्यापूर्वी आपण ज्या संमतीपत्रकावर सही केली, त्या मसुद्यामध्ये काय लिहिलं होतं याचा त्या महिलेला आणि तिच्या पतीला विसर पडलेला असतो. किंबहुना, बऱ्याचदा, त्या संमतीपत्रकावर न वाचताच सही केली जाते. त्या संमतीपत्रकावर ज्या अनेक मुद्द्यांचा समावेश असतो त्यापैकी या संदर्भातील एक महत्वाचा मुद्दा पुढीलप्रमाणे असतो. “गर्भ निरोधनाच्या इतर पद्धती उपलब्ध आहेत या गोष्टीची मला जाणीव आहे. सर्व व्यवहारिक प्रयोजनासाठी ही शस्त्रक्रिया स्थायी स्वरुपाची आहे हे मला माहिती आहे आणि मला हेदेखील माहिती आहे की ही, शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची शक्यता आहे, यासाठी मी, माझे नातेवाईक किंवा इतर कोणतीही व्यक्ती, शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना किंवा आरोग्य सुविधा केंद्राला जबाबदार धरणार नाही. अशी गर्भधारणा झाल्यास मला / माझ्या पत्नीला गर्भपात करून घेता येतो याची मला माहिती आहे/माहिती दिली आहे.” 

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचं चांगलं कौशल्य प्राप्त असलेल्या आणि असे हजारो ऑपरेशन्स करण्याचा अनुभव असलेल्या डॉक्टरच्या हातून  ऑपरेशन झाल्यानंतरदेखील अशी असफलता येऊ शकते. 

हेही वाचा – कयना खरे… छोटीशी जलपरी

ही झाली कायदेशीर बाजू. पण ही शस्त्रक्रिया का असफल होऊ शकते या मागची शास्त्रीय कारणंदेखील समजली पाहिजेत. साधारणपणे चार कारणं असू शकतात. त्यापैकी दोन महत्वाची. एक म्हणजे Spontaneous Recanalisation आणि दुसरं Fistula Formation. पहिल्या कारणात, ऑपरेशनच्या वेळेस दोन्ही बाजूच्या ज्या गर्भनलिका कट करून बंद केल्या जातात, त्या नैसर्गिकरित्या आपोआप क्वचित प्रसंगी जुळल्या जाऊ शकतात. दुसरं म्हणजे, ऑपरेशननंतर गर्भनलिकेचा जो गर्भाशयाशी जोडलेला भाग असतो, त्याचं मुख नैसर्गिक कारणाने उघडल्यामुळे स्त्री-बीजाचा प्रवेश गर्भनलिकेत होतो आणि शुक्राणूंशी संबंध आल्यास गर्भधारणा राहू शकते. ऑपरेशन करताना केलेल्या चुकीच्या तंत्राचा अवलंब, गर्भनलिका ओळखण्यात अनावधानाने केलेली चूक हीदेखील ऑपरेशन असफल ठरण्यास कारणीभूत ठरू शकते.    

जननक्षम वयात, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील, मासिकपाळी चुकल्यास, ‘आपलं तर ऑपरेशन झालंय, गर्भधारणेचा तर काही प्रश्न नाही’ असं समजून बिनधास्त राहू नये. एकदा ‘ किट ‘ वर गर्भधारणा आहे किंवा नाही यासाठी लघवीची तपासणी करून बघावी. सहसा या  तपासणीचा रिपोर्ट  ‘ निगेटिव्ह ‘ येईल यात शंका नाही, पण पाळी चुकली याच्या मागचं कारण म्हणजे गर्भधारणा तर नाही ना, हे अगोदर पडताळून पहावं लागतं. 

atnurkarkishore@gmail.com