नीलिमा किराणे
नेहमीच्या वीक-एंड कट्ट्यावर इशिता आज लवकरच पोहोचली. कोपऱ्यातल्या ठरलेल्या टेबलवर अंकित एकटाच बसला होता, बाकीचे यायचे होते.
“हाय, आज लवकर आलीस? कसं पटवलंस बॉसला?” त्याने हसत विचारलं.
“तिला पटवलं कुठलं? मीच पेटून आले.”
“अरे, पुन्हा भांडण? नव्हे मतभेद? आता जॉब सोडणार असशील?” अंकित मस्करीच्या मूडमध्ये होता, पण इशिता खरंच पेटलेली.
“अंकित, आज मात्र खरंच जॉब सोडून द्यावासा वाटतोय. बॉसशी पटत नाहीच्चे. कितीही केलं तरी, ‘आणखी इम्प्रूव्हमेन्ट पाहिजे’. अप्रीसिएशनचा एक शब्द निघत नाही तिच्या तोंडून. आज अति झाल्यावर ‘डोकं दुखतंय’ सांगून तिथून सटकले; पण येताना मनात हिशेबच मांडतेय, की मला काय मिळतंय या जॉबकडून? पैसे तर कमीच वाटतात. मुग्धा माझ्याहून लहान असूनही जास्त कमावते. कामाच्या तासांचा हिशेब नाही, समाधानही नाही. मग कशासाठी करतेय मी हा जॉब?
“का बरं सोडत नाहीयेस तू हा जॉब अजून? म्हणजे त्यातून काही तरी मिळत असणार ना? ते काय आहे?” अंकित मस्करीच्या मूडमध्ये असला तरी त्याचा प्रश्न सीरियस आहे हे समजून इशिता आठवायला लागली.
“पगार बरा आहे. म्हणजे मुग्धापेक्षा कमी असला, तरी बऱ्याच जणांपेक्षा जास्त आहे. घरापासून ऑफिस तसं जवळच म्हणजे वेळ आणि पैसे वाचतात. कंपनी नावाजलेली आहे या चांगल्या बाजू आणि दुसऱ्या बाजूला, ही कटकटी बॉस. अतिशय वर्कोहोलिक, परफेक्शनिस्ट. ऑफिसला जायचयंच्या कल्पनेनंच धडधड सुरू होते. तिथे पोहोचल्यावर, ‘ही काय म्हणेल आता?’ याचं दडपण असतं. कितीही करा, ही नाखूशच..”
“फक्त तुझ्यावरच नाराज असते का ती?”
“सगळेच वैतागलेत तिच्यावर. दोघांनी प्रोजेक्ट बदलून घेतले. एकाला बाहेर चांगली ऑफर मिळाली.” “मग तूही घे बदलून…”
“या घडीला हा प्रोजेक्ट बदलून मिळणं शक्य नाही. बाहेर एक-दोन ठिकाणी शब्द टाकून ठेवलाय; पण काही घडत नाहीये. मिळेल म्हणा…”
अंकित काहीच बोलला नाही.
“काय वाटतं तुला? जॉब सोडणं बरोबर होईल की चूक?”
“चूक की बरोबर? किंवा मला काय वाटतं? हे दुसऱ्या कुणाचं तरी मत झालं ना इशिता? तुला काय वाटतं? हे सगळ्यात महत्त्वाचं नाही का?”
“मला नाही ठरवता येत. भांडण झालं की सोडावंसं वाटतं; पण चांगला जॉब नाही मिळाला तर? याची भीती वाटते.”
“थोडक्यात, थांबलं तरी बॉसची भीती, सोडलं तरी रिकामं राहण्याची भीती. म्हणजे प्रॉब्लेम ‘तुझ्या मनातली भीती’ हा आहे ना? जॉब सोडू का नको? हा तुझा खरा प्रश्नच नाहीये. मला वाटतं, ‘जॉब सोडणं चूक की बरोबर? त्याबद्दल अमक्या-तमक्याचं मत काय? असले प्रश्न रिलेटिव्ह असतात. त्यात तुला चॉइस नसतोच. बॉसवर येता-जाता वैतागणं आणि ‘जॉब सोडावासा वाटतोय’ असं पुनःपुन्हा बोलणं यात तू गरगरते आहेस. कृती नाहीच. याची लोकांनाही सवय झालीय नाही तर तू कधीच जॉब सोडला असतास.”
“म्हणजे माझ्या हातात चॉइसच नाही असं म्हणायचंय का तुला?” इशिता चिडलीच.
“तुला काय करणं जमणार आहे, हे ठरवण्याचा चॉइस तुझ्याकडे आहे. आपण आणखी किती दिवस हा त्रास सहन करू शकणार आहोत? नवा जॉब मिळायला उशीर झाला तर किती काळ काढता येईल? फक्त बॉसला वैतागून चांगला जॉब सोडण्याइतकं महत्त्व तिला द्यायचं का? की तिच्याशी डील करायला वेगळ्या पद्धतीचा विचार करायचा? नवीन बॉसशी तरी जमेल कशावरून? मग एकूणच आपल्या भीती हँडल करायला शिकायला हवंय का? यातलं तुला काय जमणार आहे ते ठरवून तशी कृती करण्याचा चॉइस तुझ्याकडे आहे. मग एक तर नवीन जॉब शोधण्यासाठी जोरदार मोहीम घेशील किंवा माणसांना हँडल कसं करायचं यावर काम करशील.”
“म्हणजे कोणता प्रश्न माझ्यासाठी सर्वात बेसिक आणि महत्त्वाचा आहे? हे ठरवण्याचा चॉइस मी करायचाय असं म्हणतो आहेस तू, हो ना?” इशिताने विचारलं. तिला ‘करेक्ट आहेस’ अशी खूण करत अंकितने कॉफीची ऑर्डर दिली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com