डॉ.शारदा महांडुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी प्राचीन काळापासून वेलचीचा वापर आहारीय पदार्थांसोबतच औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. मराठीत ‘वेलची’ किंवा ‘वेलदोडे’, हिंदीमध्ये ‘छोटी इलायची’, संस्कृतमध्ये ‘एला’, तर इंग्रजीमध्ये ‘कार्डमम’, तर शास्त्रीय भाषेत ‘इलेट्टारिआ कॅरडामोमम’ (Elettaria Cardamomum) या नावाने ओळखली जाणारी वेलची ‘झिंझिबरेसी’ या कुळातील आहे.

वेलचीचे रोप हे हळदीच्या रोपाप्रमाणे सहा ते नऊ फूट उंच वाढते. त्याची पाने एक ते दोन फूट लांब, तीन इंच रुंद व खालील बाजूने मखमलीसारखी मऊ असतात. त्याची फुले लालसर पांढऱ्या रंगाची व सुगंधी असतात. त्याची लागवड करताना वेलचीचे बी लावले जाते. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये वेलचीची लागवड केली जाते. याच्या वाळलेल्या फळांच्या आत काळ्या रंगाच्या बारीक बिया असतात. त्या बिया म्हणजेच वेलची होय. वेलची ही अत्यंत सुगंधी असल्याने तोंडाची दुर्गंधी दूर करून मुखशुद्धीसाठी वेलचीचा वापर केला जातो. स्वयंपाक, मिठाई, सरबत वा मुरांबा, मसाले व आयुर्वेदिक औषधांमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : वेलची तिखट अग्निप्रदीपक, लघु व रूक्ष आहे. ही सुगंधी असल्याने हृदयासाठी हितकारक, दीपक, पाचक, वातहारी, उत्तेजक असून, दाहनाशक व पोटदुखीनाशक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : वेलचीमध्ये कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ, ऊर्जा, ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, लोह, सोडियम, पोटॅशिअम, रिबोफ्लेविन, थायमिन, झिंक ही सर्व घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१) अति उच्च रक्तदाब, हृदयरोग या विकारांवर वेलचीचा चांगला परिणाम दिसून येतो. वेलचीपूड व मध यांचे दिवसातून दोन वेळा चाटण केल्यास छातीत होणारी धडधड कमी होऊन हृदयाचे ठोके नियमित पडतात.

२) वेलचीमध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी होण्यास मदत होते.

३) मानसिक ताणतणाव निर्माण होऊन जर नैराश्य जाणवत असेल, तर अशा वेळी दुधामधून वेलचीपूड व खडीसाखर घ्यावी. याने मेंदूवरील ताण कमी होऊन नैराश्यावस्था कमी होते.

४) सौंदर्यविकारांमध्येही वेलचीपासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर केला जातो. याने त्वचेवरील काळे डाग, रक्तदूषित होऊन होणारे विकार, तारुण्यपीटिका कमी होतात.

५) भोजनानंतर मुखशुद्धी म्हणून वेलची खावी किंवा पानांच्या विड्यातून वेलची खाल्ल्यास मुखदुर्गंधी दूर होते व घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

६) विविध दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, सरबत यामध्ये वेलचीचा वापर करावा. याने पदार्थ रुचकर होऊन त्या पदार्थांचे पचन सुलभरीत्या होते.

७) अपचन, आम्लपित्त, भूक मंदावणे, पोटदुखी, गॅसेस या सर्व विकारांवर वेलचीपूड, आवळा सरबत किंवा लिंबू सरबतामध्ये टाकून घेतल्यास वरील लक्षणे कमी होतात.

८) लघवीला जळजळ होत असेल, तसेच हातापायांची आग होत असेल किंवा संपूर्ण शरीरामध्ये उष्णता जाणवत असेल तर अशा वेळी आवळ्याच्या रसाबरोबर वेलचीचे सेवन करावे. याने उष्णतेचा त्रास कमी होईल.

९) वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने वेलचीच्या बिया, बदाम, जायपत्री, साखर आणि गायीचे लोणी एकत्र करून सकाळच्या वेळी नियमित घेतल्यास सप्तधातूंची पुष्टी होते.

१०) वंध्यत्व असणाऱ्या पुरुषांनी वेलची, बदाम, अक्रोड, खडीसाखर दुधामध्ये टाकून नियमित सेवन केल्यास शुक्रजंतूंचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शीघ्रपतन, शुक्रधातू पातळ असणे या तक्रारी दूर होतात.

११) कोलकाता येथील ‘चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’मध्ये आतडे व गुदमार्गाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये वेलचीचा उपयोग औषध स्वरूपात केल्यास रुग्णांची व्याधी प्रतिकारशक्ती वाढून आजार आटोक्यात राहण्यास मदत होते, हे सिद्ध केले आहे.

सावधानता : गर्भावस्थेमध्ये गर्भवतीने वेलचीचे अति प्रमाणात सेवन केल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते म्हणून अगदी अल्प मात्रेतच वेलचीचे सेवन करावे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cardamom effective against heart disease asj
Show comments