माधुरी दीक्षित- नेने
तरुणपणीची माझी आवडनिवड, माझा ‘फोकस’ आतापेक्षा फारच वेगळा होता. माझ्या बदललेल्या आवडीनिवडी, जीवनाकडे पाहाण्याच्या दृष्टीत पडलेला फरक मलाच अचंबित करतो. माझ्या लहानपणी मी, माझ्या दोन मोठ्या बहिणी, भाऊ आणि आई-बाबा असं सहा जणांचं कुटुंब तेव्हा मुंबईत अंधेरीला राहात असे. त्या काळात आम्हा बहिणींना शास्त्रीय नृत्य शिकवण्यासाठी घरी शिक्षक येत असत. माझी आई (स्नेहलता दीक्षित) ही रत्नागिरीजवळच्या लहान गावात वाढली. तिला तिच्या लहानपणी नृत्याची खूप आवड होती, पण ‘खानदानी कुटुंबातल्या मुली नृत्य शिकत नाहीत’ असं म्हणून नृत्य शिकण्यास घरातून मज्जाव होता. शेवटी कशीबशी तिला संगीत शिकण्याची परवानगी मिळाली. तिचा आवाज सुरेल आहे.
आणखी वाचा : विधवांनीच का हे सहन करायचं? आणि आणखी किती काळ?
मुंबईत स्थायिक झाल्यानंतर मात्र आपल्या दोन लेकींना (भारती आणि रूपा) नृत्य शिकवायचं तिनं ठरवलं. बहिणींचं पाहून पदन्यास करणारी मीही कथक शिकू लागले. माझ्या आईला खरंतर तिची अधुरी स्वप्नं, अपूर्ण महत्वाकांक्षा तिच्या लग्नानंतर पूर्ण करता आल्या असत्या, कारण आमचे बाबा ‘लिबरल’ होते. पण आईनं तिच्या स्वप्नांकडे पाठ फिरवली आणि आपल्या तीन मुली, एक मुलगा, पतीचा व्यवसाय घडवण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं. तिनं प्रयत्न केले असते, तर तिला तिचं करिअर गाण्यात करता येऊ शकलं असतं, असं मला वाटतं. हा तिचा त्याग मोठा आहे. जेव्हा आम्हाला फिल्मी जगताची माहिती नव्हती तेव्हा माझ्या करिअरच्या सुरूवातीला आई सतत माझ्याबरोबर असे. ती सेटवर बसून राही, प्रवासानं थकून जाई, पण माझ्या करिअरसाठी तिनं स्वत:ला झोकून दिलं. मला माझ्या चित्रपटांनी, भूमिकांनी नाव दिलं, पण त्यामागे माझ्या आईचा त्याग आहे आणि तिला बाबांचा पाठिंबा होता.
आणखी वाचा : उपयुक्त : …अशी करा बाह्यांची फॅशन!
पुढे मी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला आणि आधी डेनवर (अमेरिका) इथे स्थायिक झाले. लग्नानंतर माझा ‘देवदास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या प्रीमियरसाठी मी मुंबईत आले. अनेक निर्मात्यांकडून विचारणा होऊ लागली, ऑफर्स येऊ लागल्या, मला तोपर्यंत मातृत्वाची चाहूल लागली होती. मी आरिन आणि नंतर रायन अशा दोन मुलांची आई झाले. तरीही मुंबईतून मला चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. मग आम्ही मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यावर आरिन आणि रायन यांना मुंबईतलं हवामान मानवत नव्हतं, त्यांना सारखी सर्दी व्हायची. पण एका वर्षात या तक्रारी मिटल्या, मुलं मुंबईत रमू लागली. मी काही निवडक चित्रपट स्वीकारले. लग्नानंतर- विशेषतः मातृत्वानंतर मी खूप किंवा पूर्णवेळ काम केलं नाही. मुलांना घडवणं म्हणजे त्यांना जेवूखाऊ घालणं, ती वेळेवर अभ्यास करतात हे पाहणं, इतकंच मर्यादित नाही. त्यांच्यापाशी बसून त्यांना जाणून घेतलं पाहिजे, मुलं ‘टीनएजर’ होतात तेव्हापासून तुम्ही त्यांचे पालक नाही, तर मित्र होणं गरजेचं आहे. म्हणूनच त्यांच्या आवडीचा इंग्लिश चित्रपट एकत्र बसून पाहाणं, कॅरम आणि बुद्धिबळ खेळणं, त्यांच्या मित्रमैत्रिणींचं ‘सर्कल’ कोणतं आहे हे समजून घेणं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी आणि श्रीराम आम्ही दोघांनी मुलांच्या वाढत्या वयाचा विचार करून त्यांना नेहमी मित्रत्वाच्या नात्यानं वागवलं. मी जरी शूटिंगमध्ये व्यग्र असले, तरी मोबाईलवरून मुलांच्या कायम संपर्कात असते.
आणखी वाचा : वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?
मुलं जशी मोठी होतात, तशी ती ‘रेबेल’ होतात! कधी स्वतःच्या मित्रांमध्येच रमतात. अर्थात त्यांनी कुटुंबातही वेळ घालवला पाहिजे असं माझं मत. कुटुंबाबद्दल त्यांना आपलेपणा, प्रेम वाटलं पाहिजे. आम्ही बहुधा रविवारी सगळे मिळून स्वयंपाकघरात चायनीज किंवा मेक्सिकन डिश बनवतो. आमच्याकडे सगळ्यांना साबुदाणा खिचडी आवडते. मग आम्ही ती सगळे मिळून बनवतो. यात हेतू असा, की मुलं आणि पालक यांच्यात सुसंवाद घडला पाहिजे. मी जेव्हा अमेरिकेत होते, तेव्हा आम्ही चौघांनी एकत्र ‘मार्शल आर्टस्’ कोर्स करून प्रमाणपत्र घेतलं होतं. आरिन आणि रायन दोघांनाही ते शिकताना खूप मजा आली. अगदी लहान असल्यापासून मुलांना ‘तायक्वोदो’ शिकवून ‘फिटनेस’बद्दल त्यांना जागरूक केलं. चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात असतानाही व्हॉटस्ॲपवर मी कुटुंबाच्या संपर्कात असते. आता परवाही चित्रपटाच्या निमित्तानं मुलाखती सुरू असताना दुसरीकडे आरिन दुपारी जेवला की नाही, त्याचं काय चालू आहे, याचं आमचं चॅटसुद्धा चालू होतं. असं करत मी नेहमी घर आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये अशा पद्धतीनं काम केलं.
आणखी वाचा : Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगावर वेळीच करता येईल मात; जाणून घ्या प्राथमिक लक्षणे आणि तज्ज्ञांचा सल्ला
रायननं त्याचे केस अगदी ‘हिप्पी’सारखे वाढवले होते. मी त्याला म्हटलं, “शी, किती वाढवलेस हे केस! हेअरकट करून टाक.” त्याचं म्हणणं होतं, की “ममा, माझे केस हा हल्लीचा ट्रेंड आहे! ते ‘कूल’ दिसतं.” मग मी आणि श्रीराम त्याला यावर काही बोललो नाही. मुलांवर फार बंधनं घालू नयेत, पण तरीही त्यांच्यावर लक्ष असलं पाहिजे या मताचे आम्ही दोघं आहोत.
आणखी वाचा : स्तनपानाचे फायदे आई आणि बाळालाही!
घर, मुलं आणि माझं काम हे मला घरात मदतनीस असल्यामुळे शक्य झालं. मुलं वाढत्या वयाची असताना मुलंच माझी ‘प्रायोरिटी’ होती. ती शाळेत गेली की मी बाहेर पडत असे. तेव्हा मी फार प्रोजेक्ट्स घेतले नाहीत. कधी चित्रपट हिट झाले, तर कधी ‘कलंक’सारखा मल्टीस्टारर चित्रपट फ्लॉपदेखील झाला. अभिनय असो, वा चित्रपट; यश-अपयश ऊन सावलीसारखं येत असतं. अभिनय-नृत्य हे माझं ‘पॅशन’ आणि माझा व्यवसाय आहे. घर-संसार सांभाळून मी माझं करिअर करू शकत असेन तर मी ते का करू नये! मुख्य म्हणजे माझ्या आईचा मला पूर्ण पाठिंबा होता. ती मला म्हणाली, की “आमचा काळ वेगळा होता. तेव्हा मुलांसाठीची पाळणाघरं फार नव्हती, शिवाय या संकल्पनेवर लोकांचा फार दृढ विश्वास नव्हता. तू घरी मदत करण्यासाठी स्टाफ ठेवू शकतेस. त्यामुळे तू आपलं करिअर करावंस.” माझ्या सासूबाईंचंही हेच म्हणणं होतं. मुळात मी मुंबईत जाऊन करिअरलाही प्राधान्य द्यावं हे त्यांचं मत होतं. श्रीराम यांच्या आई अमेरिकेत कित्येक वर्षांपासून ‘इस्टेट एजन्सी’ चालवतात, जो आपल्याकडे मात्र पुरूषप्रधान व्यवसाय समजला जातो. अशा माझ्या दोन्ही आईंनी मला पूर्ण प्रोत्साहन-पाठबळ दिलं. त्यामुळे दोन मुलांच्या मातृत्वानंतरही माझ्या पंखांना उडण्याचं आणखी बळ मिळालं.
आणखी वाचा : किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?
आता माझा थोरला मुलगा बारावी उत्तीर्ण होऊन अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेला आहे. धाकटा मुलगाही त्याच वाटेवर आहे. मुलांचं शिक्षण, त्यांचं करिअर याची आबाळ होऊ न देता माझं करिअर, घर यांचा समतोल मी सांभाळू शकले, याचं श्रेय श्रीराम, माझी आई आणि सासूबाई या सगळ्यांचं.
आजच्या युगात स्त्रियांनी आपलं ‘पॅशन’ जगावं, हवं ते करिअर जरूर करावं. थोडा संयम मात्र हवा. काही अडचणी येतात, पण त्या दूरसुद्धा होतात. आत्मविश्वासानं पुढे जा, इच्छा तिथे मार्ग दिसतोच! माझा ‘मजा मा’ हा नवा चित्रपटही प्रत्येक स्त्रीनं स्वतःची वेगळी ओळख वेगळी निर्माण करावी, हेच सांगतो.
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच
हल्ली वेब कॅम, मोबाईल फोन, व्हिडिओ कॉल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आपलं करिअर आणि घर-संसार सांभाळताना आपल्याबरोबर आहेत. मी वयाच्या सतराव्या वर्षापासून ‘ग्लॅमरस’ विश्वात वावरले. पण माझ्या आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी बळकट होती. शिस्त, मोठ्यांचा आदर करणं, अशा गुणांचा दैनंदिन जीवनात विसर न पडू देता मी पुढे गेले आणि तेच संस्कार मुलांवर प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला. माझं संचित हेच आहे. घर, मातृत्व आणि करिअर यांचा मेळ मी योग्य साधलाय याची मला खात्री वाटते.
शब्दांकन- पूजा सामंत
samant.pooja@gmail.com