अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी दाखल होणाऱ्या विद्यार्थिनींची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना आणण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सर्वच संवर्गातील विद्यार्थिनींची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. उत्तम अभियंता होऊन देश आणि राज्याच्या पायाभूत सुविधांची निर्मिती, विकास आणि पुनर्निर्माणात महत्वाचे योगदान देण्यात महिला अभियंत्यांचा सहभागही वाढत आहे.
आणखी वाचा : दिवाळीसाठी ग्रीटिंग कार्ड मिळाले नाही म्हणून तिने…; लॉकडाउनमधील गैरसोयीतून सुचलेल्या कल्पनेने काय केले पाहा
तंत्रशिक्षणामध्ये आणखी महिलांची संख्या वाढावी यासाठी विविध योजना शासनामार्फत राबवण्यात येतात. यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे प्रगती शिष्यवृत्ती योजना. या अंतर्गत दरवर्षी ५० हजार रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं. यामधून शिक्षण शुल्क, संगणक खरेदी, पुस्तके, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर अशा सारख्या बाबींचा खर्च भागवता येऊ शकतो. या खर्चाचा कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नसते. हे अर्थसहाय्य पदवी अभ्यासक्रमासाठी चार वर्षे आणि पदविका अभ्यासक्रमासाठी तीन वर्षे दिले जातं. ही योजना अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची आहे.
आणखी वाचा : सतत सॉफ्ट पॉर्न पाहणाऱ्यांच्या दृष्टीने बलात्कार साधा गुन्हा?
प्रत्येक राज्यासाठी शिष्यवृत्तींची संख्या ठरविण्यात येते. त्याअनुषंगाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या ५५३ आणि पदविका अभ्यासक्रम मिळालेल्या ६५० महाराष्ट्रातील विद्यार्थींनींना याचा लाभ दिला जाईल.
अटी आणि शर्ती
(१) या योजनेचा लाभ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद़ेची मान्यता मिळालेल्या शैक्षणिक संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींनाच दिला जातो.
(२) संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
(३) विद्यार्थिनीस अभियांत्रिकी पदवी किंवा पदविकेच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळालेला असावा किंवा थेट दुसऱ्या वर्षात नव्याने प्रवेश मिळालेला असावा.
(४) मागील वर्षी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थिनींना दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करणं आवश्यक आहे.
(५) एका कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
(६) या शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी पात्रता परीक्षेमधील (सीईटी/जेईई) गुणच ग्राह्य धरले जातात. त्यासाठी १२वी किंवा समकक्ष परीक्षेतील गुणांच्या टक्केवारींचा आधार घेतला जातो.
आणखी वाचा : वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?
(७) या शिष्यवृत्तीला राखीव जागांचे नियम लागू आहेत. त्यानुसार संबंधित सवंर्गातील विद्यार्थिनींची गुणवत्तेनुसार निवड केली जाते.
(९) अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्ग संवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या खुल्या संवर्गातील विद्यार्थिनींना दिल्या जातात.
(१०) राखीव संवर्गातील विद्यार्थिनींचा क्रमांक खुल्या गुणवत्ता यादीत लागत असल्यास, तिचा समावेश याच यादीत केला जातो.
(११)अभियांत्रिकी पदवी/ पदविकेच्या दुसऱ्या वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास किंवा परीक्षा न दिल्यास, ही शिष्यवृत्ती पुढे चालू ठेवली जात नाही.
आणखी वाचा : करिअर : विद्यार्थिनींच्या विदेश शिक्षणासाठी नरोत्तम सेखसारिया शिष्यवृत्ती
अर्ज प्रक्रिया
(१) अर्हता प्राप्त विद्यार्थिनींना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
(२) ज्या संस्थेत संबंधित विद्यार्थिनीने प्रवेश घेतला असेल, त्यासंस्थेने या अर्जाची ग्राह्यता तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून या अर्जाची ग्राह्यता दुसऱ्यांदा तपासली जाते.
महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी, तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केली जाते. या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात भरली जाते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२
संपर्क
संकेतस्थळ-www.aicte-india.org
आणि http://www.scholarships.gov.in