अपर्णा देशपांडे
आहना एका मोठ्या शहरात एका मोठ्या कंपनीत काम करणारी स्वतंत्र विचारांची मुलगी. कामातील व्यग्रता आणि ताण यामुळे तिला सध्या तरी कोणत्याही सीरियस रिलेशनशिपमध्ये पडायचं नव्हतं; पण तिचा रिकामा वेळ छान जावा ही तीव्र इच्छा होतीच. काही काळ पुरुष सहवास असावा असं वाटलं. त्यासाठी कुणी तरी ‘पार्टनर’ असावा या विचारात ती अधूनमधून पबमध्ये जात असे. एक दिवस तिथे तिला एक आकर्षक तरुण भेटला. दोघांनाही एकमेकांची नेमकी गरज समजली आणि कुठल्याही भावनिक बंधात पडायचं नाही, फक्त कॅजुअल नातं ठेवायचं हे एकमेकांना बजावून त्यांनी शारीरिक जवळीक साधली.
तिची मैत्रीण पृथाला हे पटत नसल्याने तिनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आहना ऐकणाऱ्यातली नव्हती. असं वागताना आपल्यात मानसिक बदल होतील. त्याचे परिणाम कसे असतील याचा विचार न करता तिने तो क्षण आनंदात घालवला होता. हे असं आणखी दोन-तीन वेळा झाल्यानंतर तिला त्या जवळिकीची नशा चढू लागली. तरुण तिला नावाने ओळखू लागले. तिच्याबद्दल चर्चा होऊ लागली; पण आता तिला फक्त शारीरिक पातळीवरचा व्यवहार जड जाऊ लागला. ती नकळत भावनेत गुंतू लागली. त्यावरून एकदा तर तिला अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तिनं तिची विश्वासार्हता गमावली होती. समाजमाध्यमावरही त्याची चर्चा झाली. त्याचा इतका परिणाम झाला की तिला तिची नोकरी गमवावी लागली. हा झटका तिच्यासाठी भयानक होता. आपण कुठल्या सुखाच्या शोधात कुठे वाहवत गेलो याची प्रखर जाणीव झाली आणि ती भानावर आली. आणि आता आपल्याला एक शांत, स्थिर आयुष्य हवं आहे हे उमजून तिने लग्नाचा निर्णय घेतला. चांगला तरुण भेटलाही लग्नासाठी; पण आपल्या भूतकाळातील या गोष्टी भावी पतीला सांगाव्यात की नाही हा संभ्रम जीवघेणा होता. सत्य लपवणं अनैतिक आणि सांगितल्यास लग्न मोडण्याची दाट शक्यता. शेवटी पृथानं पुढाकार घेतला आणि त्याला सगळं सांगितलं. त्याच्याही कानावर कुणकुण आली होतीच. त्यानं आहानाला तसं स्पष्ट विचारलं. तिनं कबूल केलं तेव्हा तो मागे हटला. तिला स्वीकारण्याची त्याच्या मनाची तयारी नव्हती.
आहनाला खूप काही शिकवणारा हा धडा होता. त्या दिवशी तिने एक खूणगाठ बांधली. जे झालं ते झालं, ते आता बदलता येणार नाही; पण यापुढे भविष्यात आपल्याला पश्चात्ताप होईल अशी कुठलीही कृती आपल्याकडून घडता कामा नये. तोंड लपवावं लागेल असं आपण काहीही करायचं नाही. आता तिला शांतपणे पुढच्या आयुष्याची मांडणी करायची होती, कारण तिचं करिअर दावणीला लागलं होतं.
कोवळ्या वयातील तरुण- तरुणींना एकमेकांच्या सहवासाची ओढ असते. अशीच एक नमिता आणि पूनीत ही तरुण जोडी. सहवास वाढला की नात्यात मोकळेपणा यायला लागतो. तसं त्यांच्यातही होऊ लागलं. गप्पा मारता मारता एकमेकांना टाळी देणं, प्रेमाने हलकीशी मिठी मारणं, गाडीवर चिटकून बसणं अशा प्रकारची अगदी सहज जवळीक साधली जाऊ लागली. पुढे मग मिळून सहलीला जाणं, चित्रपट बघणं हे करताना त्यांच्यात जरा जास्त सलगी होऊ लागली आणि त्याचं पर्यवसान म्हणजे, नमिता आणि पूनीत यांना एकमेकांबद्दल शारीरिक ओढ निर्माण होऊ लागली. कधी मिठी मारत चुंबन घेणं, कधी आनंदाने कवेत उचलून घेणं अशा कृती सहजपणे होऊ लागल्या.
“पुनीत, आपलं नेमकं नातं काय? कारण इतकी जवळीक मी इतर कुणाबरोबर नाही साधत.” नमिताने अखेर विचारलंच, तसा पुनीत म्हणाला, “कमॉन यार! आपण जस्ट हुकअप करतोय. तू लगेच मला तुझ्या आईकडे नको नेऊस हा!”
पुनीतचं हे म्हणणं नमिताला वास्तवात आणणारं ठरलं. तिने थांबून आपल्या नात्याचा विचार करायचं ठरवलं.
लेखिका डोना फ्रिटास यांनी आपल्या ‘द एंड ऑफ सेक्स’ या पुस्तकात लिहिलं आहे, “हुकअप संस्कृतीमधील तरुण मंडळी कायम असमाधानी, अतृप्त आणि संभ्रमात असतात. अर्थात सतत हुकअप करणारी तरुण मंडळी दीर्घकाळ टिकणारी नाती निर्माण करण्याचीही शक्यता असू शकते. मात्र त्या दोघांचं तसं नातं हवं.” त्यांच्या म्हणण्यानुसार ‘हुकअप’ हे वरवर सलगीपासून ते एका रात्रीच्या शारीरिक संबंधांपर्यंत असू शकतं; पण शाश्वत, आश्वासक नात्यात मिळणारा निर्मळ आनंद आणि स्थैर्य अशा नात्यांत कधीच मिळत नाही. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगू पाहाणाऱ्या आजच्या पिढीला यातला नेमका फरक समजला तर पुढे येणारी अनेक वादळं थोपवता येतील नाही का?
adaparnadeshpande@gmail.com