अनेक स्त्रिया, मुलींना लघवीच्या ठिकाणी खाजण्याचा त्रास होतो. मात्र संकोचामुळे त्या ते सहन करत राहातात. मात्र असं दुर्लक्ष महागात पडू शकतं. त्यापेक्षा  वेळीच उपाय करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्री-रोग तज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी किमान १० टक्के स्त्रिया मला लघवीच्या ठिकाणी किंवा ‘खालच्या अंगात’ खाजतंय अशी तक्रार घेऊन येत असतात. यापैकी बऱ्याच स्त्रियांची अपेक्षा डॉक्टरांनी या त्रासासाठी एखादी गोळी आणि मलम लिहून द्यावं अशी असते. काही डॉक्टर्स तसं त्या स्त्रियांना गोळ्या आणि मलम लिहून देतात देखील. एवढंच काय, काही स्त्रियांमध्ये, या प्रकारच्या उपचाराने त्रास कमी होतो, पण काही दिवसांनंतर पुन्हा सुरु होतो. मग ती स्त्री डॉक्टरकडे न जाता तेच मलम मेडिकलच्या दुकानात जाऊन घेऊन येते आणि काही दिवस त्याचा वापर सुरु ठेवते. अशा अर्धवट पद्धतीच्या उपचाराने त्रास पूर्णपणे बरा होत नाही.

हा सगळा प्रकार घडतो तो संकोचामुळे. ही ‘त्या’ ठिकाणी खाजण्याची डॉक्टरकडे तक्रार घेऊन जाण्यास स्त्रियांना संकोच वाटतो. काही स्त्रिया आपल्याला असा त्रास होतो आहे हे आपल्या पतीला देखील सांगत नाहीत असा आमचा अनुभव आहे. बऱ्याचदा या तक्रारीचं कारण साधं इन्फेक्शन असू शकतं, पण क्वचित प्रसंगी ही तक्रार मोठ्या आजाराचं लक्षण देखील असू शकतं, म्हणून या तक्रारीकडे संकोचापोटी दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचा >>> सहमतीने घटस्फोटाकरता प्रत्यक्ष हजेरी आवश्यक नाही

वास्तविक पहाता काही स्त्रियांना त्यांच्या बाह्य जननेंद्रिय, खाजतंय, की आग होतेय, की दुखतंय हे नेमकं सांगता येत नाही. लघवीच्या ठिकाणी खाजतंय म्हणजे बाह्य जननेंद्रियाच्या नेमक्या कोणत्या  भागात  खाजण्याचा त्रास होतोय हे विचारून अथवा तपासत असताना डॉक्टरांना खात्री करून घ्यावी लागते. खाजण्याचा त्रास हा फक्त बाह्य जननेंद्रियापुरता मर्यादित आहे की शरीराच्या अन्य जागीही खाज येतेय? हे विचारावं लागतं. स्त्रियांच्या बाह्य जननेंद्रियामध्ये, मॉन्स पबिक, शिश्निका (clitoris), योनिद्वार किंवा vulva (त्यात लेबिया मेजोरा आणि मायनोरा हे दोन भाग), योनीमार्गाचा (vagina) सुरुवातीचा भाग यांचा समावेश असतो.

खाजण्याचा त्रास हा सहसा रात्रीच्या वेळेस, अंथरुणावर पडल्यानंतर झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात असतो, त्या मागचं कारण म्हणजे त्यावेळेस लक्ष विचलित करणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टी घडत नसतात, असं सांगितलं जातं. जवळपास ८० टक्के स्त्रियांमध्ये  बाह्य जननेंद्रिय खाजण्याचा त्रास हा दोन प्रकारच्या जंतू संसर्गामुळे होतो. एक म्हणजे ट्रायकोमोनास (Trichomonas) आणि दुसरं म्हणजे  फंगल (fungal) इन्फेक्शन. या खाजण्याच्या त्रासासोबत बऱ्याचदा त्या स्त्रीला श्वेत प्रदर किंवा व्हाईट डिस्चार्जचा (white discharge) त्रास असू शकतो. खाजण्याच्या त्रासाशी व्हाईट डिस्चार्जच्या प्रमाणाचा काही संबंध असतोच असं नाही. व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण कमी असताना देखील खाजण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. दोन्ही पैकी कोणतं कारण आहे याचं निदान योनीमार्गातील व्हाईट डिस्चार्जची तपासणी लॅबोरेटरीमध्ये करून करता येते. त्याप्रमाणे योग्य ती औषधी आवश्यक त्या कालावधी पर्यंत घेतली की हा त्रास कमी होऊ शकतो.

हेही वाचा >>> निसर्गलिपी : इनडोअर – आऊटडोअर झाडांची रचना

लैंगिक दृष्टीने सक्रिय असलेल्या स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे, त्या स्त्रीच्या पतीला  देखील ठराविक कालावधीसाठी औषध देणं गरजेचं असतं. त्रास कमी होईपर्यंत (सहसा दोन आठवड्यासाठी) शारीरिक संबंध बंद ठेवण्याच्या  सल्ला डॉक्टर देतात. फक्त पत्नीवर उपचार केल्यास तिचा त्रास कमी होतो पण, शारीरिक संबंध आल्यानंतर पुन्हा त्रास सुरु होऊ शकतो. पतीच्या लिंगात किंवा शिश्नात देखील हे जंतू असू शकतात, त्यावर एकत्रितपणे उपचार केल्याशिवाय हा त्रास पूर्णपणे बरा होत नसतो. 

उर्वरित २० टक्के स्त्रियांमध्ये खाजण्याचा त्रासामागचं कारण शोधणं जरा कठीण असतं. स्त्रियांच्या बाह्य जननेंद्रियांच्या भागवरची खाज उपचार केल्यानंतर तेवढ्यापुरती बरी होणं आणि त्रास अधून, मधून पुन्हा होणं हे मधुमेह झाल्याचं लक्षण असू शकतं. रक्तातील साखरेचं प्रमाण तपासल्यास अनपेक्षितपणे ते वाढल्याचं आढळून येऊ शकतं. आपल्याला मधुमेह झाला आहे आणि त्यामुळे हा त्रास नीट कमी होत नाही हे लक्षात येतं.

बाह्य जननेंद्रियाच्या ‘सोरियासिस’ या त्वचेच्या आजारामुळे देखील फक्त ‘खालच्या’ अंगात खाजण्याचा त्रास होऊ शकतो. अल्पशा प्रमाणात बाह्यजनेंद्रियाच्या भागावर खाजण्यामागे मानसिक ताण हे देखील कारण असू शकतं. त्याला न्यूरोडरमटाय टीस  (Neurodermatitis ) असं म्हणतात. नवीन जमान्यात काही तरुणी फॅशनच्या नावाखाली अतिशय टाईट अंडरवेयर (अंतर्वस्त्र) परिधान करतात. त्यामुळे शरीराच्या ‘त्या’ भागाला आवश्यक हवा मिळत नाही. घाम येण्याने ‘त्या’ जागेचं  वातावरण ओलं राहतं, त्यामुळे कँडिडा या फ़ंगल इन्फेक्शन होण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊन खाजण्याचा त्रास सुरु  होतो. त्यासाठी अंतर्वस्त्र थोडीशी सैल वापरावीत, शक्य झाल्यास ती दिवसातून वेळेस बदलावीत. तसेच अंतर्वस्त्र जर नीट धुतली जात नसली किंवा ज्या साबणाने धुतली जातात त्यातील डिटर्जन्टची ऍलर्जी असेल तरी देखील खाजण्याचा त्रास होऊ शकतो.

लेबिया किंवा भगोष्ठ (बाह्य जननेंद्रियाचा एक भाग) ज्याला योनिद्वार किंवा vulva म्हटलं जातं, त्या भागाचा कर्करोगाची  सुरुवात खाजण्यानेच होत असते. याचा अर्थ स्त्रियांनी ‘खालच्या’ भागात खाजायला लागल्यास लगेच आपल्याला कर्करोग होईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही. परंतु या खाजण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करावा.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.) atnurkarkishore@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Causes of vaginal itching itching in urinary part of female zws