“हॅल्लो स्विटीज, मी आहे आर.जे. ढिंच्याक आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा लाडका कार्यक्रम ‘चिल मार!’ गर्ल्स, नुकतीच आपण एक बातमी ऐकली असेल, की एका फॅशन डिझायनरचा डिव्होर्स झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला बँड-बाजासहित वाजतगाजत माहेरी आणली. म्हणजे बघा, किती मोठ्या जाचातून सुटल्याचा तो आनंद असेल? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत.
लग्नबंधन हे जेव्हा काटेरी विळखा होऊ पाहातं, तेव्हा त्यातून सुटका करवून घेतानाची भावना आणि सुटका झाल्यानंतर घेतलेला मोकळा श्वास याबद्दल बोलण्यासाठी आज इथे आल्या आहेत, श्रुती आणि निर्मिती. तर श्रुती, तुझा घटस्फोटाचा काय अनुभव होता?”
“मला माझ्या घटस्फोटासाठी फार मोठी लढाई द्यावी लागली आहे. त्या काळात प्रचंड मानसिक घुसमट, लोकांच्या कुत्सित नजरा आणि नकोनको त्या आरोपांना सामोरं जावं लागलं. म्हणून जेव्हा मला घटस्फोट मिळाला तेव्हा अक्षरशः पुनर्जन्म मिळाल्यासारखं वाटलं. आई-वडील आणि लहान भाऊ माझ्या पाठीशी होते म्हणून मी आज जिवंत आहे. नाही तर अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचार डोक्यात आला होता.”
“खरंच घरून असा पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे, पण डिव्होर्सनंतर माहेरी वाजतगाजत जाण्याबद्दल तुझं काय मत आहे? तुला स्वतःला ते कितपत रुचलं असतं?”
हेही वाचा… स्त्रीनं तिचं मत मांडलं की ती ‘पुरुषी’? अभिनेत्री बिदिता बागनं सांगितला तिचा अनुभव
“मला असं वाटतं, की ते एक प्रातिनिधिक चित्र आहे. एका अत्यंत क्लेशकारक काळातून सुटून आता मुलीच्या नवीन आयुष्याचं स्वागत आणि त्यामागील सहज स्वीकृतीची भावना अधोरेखित करण्याच्या उद्देशाने असं करत असावेत. मुलीला टोमणे मारणाऱ्या लोकांना त्यांच्या परीने दिलेलं हे एक उत्तर असावं असं बहुतेक. माझ्या बाबतीत म्हणायचं, तर माझा घटस्फोट ही माझी वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्याचा गाजावाजा करणं मला तरी नाही जमणार, पण हे ज्याचं त्याचं मत आहे.” “ निर्मिती, तुझं वैवाहिक आयुष्य कसं होतं? त्या नात्यातून बाहेर पडताना तुझ्या काय भावना होत्या? वाजतगाजत डिव्होर्स साजरा करण्याबद्दल तुझं मत?”
“माझं वैवाहिक आयुष्य हे एक भीतीदायक स्वप्न होतं. मला मनासारखं वागण्याची मुभा नव्हती, साधं शेजारी कुणाशी बोलण्याचीदेखील नाही. माझा अतिशय चांगला जॉब मला सोडावा लागला. मला माझ्या आवडीचे कपडेही घालता येत नव्हते. फोन करायची, माहेरी जाण्याची, साधं भूक लागली तर वेळेवर जेवण्याचीही परवानगी नव्हती. सुखी राहायचं तर अशा लग्नातून बाहेर पडणं हा एकमेव उपाय होता; पण त्यानं मला डिव्होर्ससाठी प्रचंड त्रास दिला. आई-बाबा माझ्या सुटकेची आतुरतेने वाट बघत होते. ज्या दिवशी मला घटस्फोट मिळाला त्या दिवशी आमच्या प्रेमाचे सगळे आप्त जमले आणि आम्ही खूप जोरात सेलिब्रेट केलं. म्हणून जर कुणी वाजंत्री लावून सगळ्या जगाला सांगत असतील तर ते मला बरोबर वाटतं. तो मुक्तीचा आनंद तसाच असतो हे मी अनुभवलं आहे. ”
“ मी आहे आर.जे. ढिंच्याक आणि आपण ऐकत आहात आपला फेव्हरेट कार्यक्रम, ‘चील मार!’ आत्ता आपण श्रुती आणि निर्मिती यांचे अनुभव ऐकले. कुठल्याही जोडप्याला आपला घटस्फोट व्हावा असं नक्कीच वाटत नाही; पण दुर्दैवानं लग्नसंबंध मोडण्याची वेळ आलीच तर आता मनाविरुद्ध तो कोंडमारा सहन केला जात नाही. पूर्वी एकदा का लग्न झालं, की स्त्रिया कितीही छळ, यातना आणि अत्याचार असू देत, लग्न मोडण्याची हिंमत करत नसत. आता बहुतांश स्त्रियांना आर्थिक स्वावलंबन मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. आवाज उठवण्याची क्षमता वाढली आहे. अशा वेळी मानेवरील जखमा देणारं सांसारिक जोखड झुगारून देऊन ती तिचं आयुष्य तिच्या इच्छेनुसार नक्कीच जगू शकते. फक्त तिच्या निर्णयात तारतम्य असावं इतकंच.” adaparnadeshpande@gmail.com