लग्नाची मुलाकडची तयारी दाखवण्यासाठी विहीणबाई- म्हणजे यशच्या आईनं लताला व्हीडिओ कॉल केला होता. ‘सगळं कसं साग्रसंगीत सुरू आहे,’ असं सांगत असताना ‘तुमच्याकडूनही काही कमतरता नको,’ हेही त्या अप्रत्यक्षपणे सुनावत होत्या. त्या प्रत्येक शब्दाचं, लग्नाच्या तयारीचं ओझं मनावर असतानाच समोर टीव्हीवर आमिर खानची (एक्स) बायको किरण राव आमीरच्या मुलीच्या- ईरा खानच्या लग्नात छान नऊवारी साडी नेसून टेचात फिरताना दाखवत होते. सकाळपासून समाजमाध्यमांवरही तेच फोटो फिरत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“यांचं एक बरं आहे! या सेलिब्रिटींना कसलीच काळजी नाही! लग्न मुलीचं असो, वा मुलाचं सगळा भाव याच खाऊन जाणार… आणि आपण ‘वधूमाई’ बसलोय इथे! हे संपलं, ते संपलं, अजून किती तयारी? आता पुढे कसं? हा विचार करत!” स्वत:शी पुटपुटत लता मुलीच्या लग्नाच्या तयारीकडे वळली.

लताच्या लाडक्या सोनलचं लग्न ठरलं, तसं लता आणि तिचा नवरा रमेश हे मुलीच्या लग्नात काही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र काम करत होते, विचार करत होते. वयोमानाप्रमाणे असणाऱ्या कुरबुरींकडेही त्यांनी लक्ष देणं सोडून दिलं होतं. ‘गोळ्या घेतल्या का किंवा घ्या’ ही एकमेकांना आठवण करून देत त्यांच्या घरात लगीनघाई सुरू होती. खरं तर बोलणी ‘तुमचं तुम्ही पहा आमचं आम्ही पाहतो’ असं सांगत आटोपली होती. सोनलचं सासर खूप छान, असंच त्या वेळी वाटलं होतं. पण नंतर काहीच दिवसांत ‘हॉल हाच पाहिजे,’ यासाठी तिकडच्या लोकांचा सुरू झालेला हट्ट, ‘मुलीला तुम्ही अंगावर काय घालणार?’ असं विचारताना ‘काही दागिना रिपीट तर नाही होत ना, म्हणून विचारतोय,’ अशी केलेली मलमली पखरण, याचा अनुभव लतानं नुकताच घेतला होता. अर्धा खर्च मुलाकडचे करत होते खरे, पण प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप पाहता ‘हा अर्धा खर्च नाही केला तरी चालेल, पण आमच्या पध्दतीनं होऊ दे सारं,’ असं सांगावंसं वाटतं होतं लताला.

खर्चाचा भार तिकडच्यांनी उचलला म्हणजे आपला भार कमी होतो असं नाही. सोनलचं लग्न ठरलं तसं लतानं सुरूवातीला नवऱ्याकडे ‘सोनलबरोबर एखादा दागिना मलाही हवा, अगदी भरजरी नसली, तरी छान सुळसुळीत तलम साडी हवी,’ असा लाडिक हट्ट धरला होता. पण नंतरचा कामाचा धबडगाच एवढा होता, की ते बाजूलाच राहिलं होतं. आपल्या सुनेच्या कलानं तिला काय हवं ते विचारून घेणं, छोट्या नातवाला अंगठी, मानापानाच्या साड्या, घरात काय काय करता येईल, कोणासमोर फजिती नको म्हणून घरात हे हवंच, वेळात वेळ काढून पार्लरला जाणं, पार्लरमधला घटकाभराचा निवांतपणा अनुभवणं, हे सर्व लताला करायचं होतं. पण हे खयाली पुलाव मनात शिजत असताना प्रत्यक्षात सर्व घोडं पैसा आणि समोरचे काय म्हणताहेत, यावर येऊन अडत होतं.

सोनलला काही कमी पडायला नको म्हणून आपण आपली नव्या दागिन्याची हौस जरा बाजूला ठेवूया, आल्यागेल्या साड्यांमधली त्यातल्या त्यात चांगली, न नेसलेली साडीच आपण नेसू, जास्तीचा खर्च नको, असं म्हणत लता पुढच्या तयारीला लागली. घरात रंगबेरंगी झालेल्या भिंतीना नव्या कोटेड कागदाची ऊब दिली होती. सुनेला दागिन्यांनी मढवलं होतं, पण कमी वजनाच्या. नातवाला अंगठीच्या ऐवजी छान ड्रेस घेतला होता. घरातल्या खर्चाला लतानं यशस्वीपणे कात्री लावली होती. पण आपणही या किरण रावसारखी नऊवारी नेसून, विहीणबाईंसमोर मनावर कुठलंही दडपण न घेता मिरवावं, लग्नाचा आनंद घ्यावा, ही मनात जागृत झालेली इच्छा लताला सारखी खुणावत होती. ती पूर्ण होईल का? की एकीकडे कार्य निर्विघ्न पार पडावं याची चिंता करत, इकडेतिकडे कामं करत नाचण्यातच लग्नाचा दिवसही जाईल, याबद्दल या वधूमाईला खात्री वाटत नव्हती. ‘पाहू पुढे काय होतंय,’ असं म्हणत लतानं किरण रावची बातमी सुरू असलेली टीव्ही बंद केला आणि घरातलं आवरायला सुरूवात केली.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrities wedding kiran rao in ira khans wedding indian wedding preparations ritual expense and family responsibility dvr