मंगळसूत्र, हिरवा चुडा, लाल कुंकू, जोडवी असे दागिने स्त्रियांसाठी सौभाग्याचं प्रतीक मानले जातात. विवाहित स्त्रीने तर हे सगळे दागिने घालावेतच, असा काही जणांचा अट्टहास असतो. पूर्वीच्या काळातील स्त्रिया तर एकदा का लग्न झालं की विवाहित स्त्री जे दागिने घालते ते कायमस्वरुपी घालायच्या. पूर्वीच्या स्त्रियाच कशाला आपल्या आईकडे पाहिल्यावरही कदाचित अनेकजणींना ते लक्षात येईलच. पण आजच्या तरुण पिढीचा या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
धावपळीचं जीवन, कामानिमित्त करावा लागणारा प्रवास किंवा वेस्टर्न लूकवर दागिने कसे परिधान करायचे? म्हणून बऱ्याच तरुण विवाहीत मुली मंगळसूत्रदेखील घालत नाहीत. अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये “मी हातातच मंगळसुत्र घालते” असं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक चर्चा रंगल्या. काही गृहिणींना अमृता फडणवीस यांची ही नवी फॅशन अजिबातच पटली नाही.
पण त्यांचं म्हणणं काही स्त्रियांना अगदी पटलं. आताच्या पिढीतील बऱ्याच स्त्रिया या हातात मंगळसूत्र घालताना दिसतात. ही नवी फॅशनच आता रुजू लागली आहे. मंगळसूत्र गळ्यात घालणं असो वा हातात ते घालणं अधिक महत्त्वाचं असं आताच्या तरुण पिढीतील काहींचं म्हणणं आहे. मंगळसूत्र एकदा का हातात घातलं की ड्रेस वेस्टर्न असो वा पारंपरिक त्यावर शोभून न दिसण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं त्यांचं म्हणणं…
सध्या मंगळसूत्राची फॅशन मात्र नवनवीन रूपानं पुढे येत आहे. स्त्रिया गळ्यात मंगळसूत्र घालत नसल्या तरी सेलिब्रिटी मंडळींच्या मंगळसूत्रांची फॅशन अगदी सर्रास फॉलो केली जाते. कतरिना कैफचा शाही विवाहसोहळा पार पडला. पण त्यानंतर चर्चा रंगली ती तिच्या मंगळसूत्राची. काळ्या मण्यांमध्ये डायमण्ड पेंडन्ट आणि अगदी नाजूक असं कतरिनाचं मंगळसूत्र होतं. तिच्या या मंगळसूत्राची डिझाइन अनेक स्त्रियांना आवडली.
हल्ली दोन वाट्या, मुहूर्तमणी असं घसघशीत मंगळसूत्र स्त्रियांना नको असतं. म्हणूनच की काय कतरिनासह सोनम कपूरच्या मंगळसूत्रालाही स्त्रियांनी पसंती दिली. सोनमचंही काळ्या मण्यांमधीलच मंगळसूत्र आहे. पण या मंगळसूत्राची खासियत म्हणजे तिच्या आणि पती आनंद आहुजाच्या राशीची चिन्ह यामध्ये आहेत. तसेच सोनमच्या मंगळसूत्रामध्ये सोलिटेअरचा हिरा देखील आहे.
दीपिका पदुकोणने देखील अंधेरी मधील एका दुकानामधून स्वतःसाठी खास मंगळसूत्र तयार करून घेतलं. काळ्या मण्यांमधील या मंगळसूत्रामध्ये अगदी छोटा हिरा आहे. तिच्या या मंगळसूत्राचा ट्रेण्ड तर अनेक स्त्रियांनी फॉलो केला. अभिनेत्री यामी गौतमच्या पारंपरिक पद्धतीच्या मंगळसूत्राने तर साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काळ्या मण्यांमधील यामीच्या मंगळसूत्राला हिऱ्यांचा टच देण्यात आला. एकूणच काय तर अलिकडे स्त्रिया मंगळसूत्राकडे फक्त सौभाग्याचं प्रतिक म्हणूनच नव्हे तर फॅशन म्हणूनही पाहत आहेत!