भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुव विल्मोर या नासाच्या अंतराळवीरांना घेऊन बोइंग कंपनीचे ‘स्टारलायनर’ हे यान ५ जून रोजी अंतराळात झेपावले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील अशी अपेक्षा होती. मात्र आता एक महिना होत आला असून अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतले नाही. त्यांच्या मार्गात अनेक अडचणी असल्याने ते परतू शकत नाहीत. परंतु, यामुळे सुनीता विल्यम्स यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
अंतराळवीर अवकाशात झेपावतात तेव्हा ते पृथ्वीपासून अगदी वेगळ्या वातावरणात जातात. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, रेडिएशन एक्सपोजर आणि अतंराळ स्थानकांचे मर्यादित भाग मानवी आरोग्यासाठी आव्हानात्मक असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. इकोनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील अहवाल दिला आहे.
अंतराळातील बदलांपैकी एक बदल म्हणजे द्रव पुनर्वितरण. गुरुत्वाकर्षण नसल्याने आपल्या शरीरातील द्रव शरीराच्या वरच्या भागाकडे सरकतात. यामुळे चेहऱ्यावर सूज येते. रक्तसंचय होतो, पायांमध्ये द्रवपदार्थाचे प्रमाण कमी होते. रक्ताचं प्रमाण कमी होऊन रक्तदाब नियमन बदलते. यामुळे ते भारतात परतल्यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वातावरणीय बदलामुळे त्यांना पृथ्वीवर आल्यानंतर चक्कर जाणवण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा >> सुनिता विल्यम्स यांच्यासह अंतराळ स्थानकात गेलेले नासाचे अंतराळवीर का परतले नाहीत? त्यांच्यासमोर काय अडचणी आहेत?
मायक्रोग्रॅविटीचा मस्क्यूकोस्केलेटल सिस्टमवरही प्रभाव पडतो. अंतराळात गुरुत्वाकर्षणाची कमतरता आल्यावर त्यांच्या पाय आणि पाठीत त्रास होऊ शकतो. मूत्रात कॅल्शिमच्या उच्च पातळीमुळे किडनी स्टोनचाही धोका संभावतो. तसंच, चयापचयावरही परिणाम होतो. अंतराळातील अंतराळवीरांना पृथ्वीच्या तुलनेत किरणोत्सर्गाच्या उच्च पातळीचा सामना करावा लागतो. या किरणोत्सर्गात गॅलक्टिक कॉस्मिक किरण आणि सौर कण घटनांचा समावेश आहे. त्यामुळे डीएनए नुकसान होऊन कर्करोग होण्याची शक्यता असते.
नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर परत कधी येणार?
अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळा भरारी घेतली. त्यांचे सहकारी बुव विल्मोर यांच्यासह बोइंगच्या स्टारलायनर अंतराळ यानातून ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’मध्ये (आयएसएस) पोहोचले. गेल्या महिन्यात ५ जून रोजी स्टारलायनर अंतराळात झेपावले. ‘आयएसएस’मध्ये राहून आठ ते १५ दिवसांत नासाच्या शास्त्रज्ञांची ही जोडगोळी पृथ्वीवर परतणार होती. मात्र आता तब्बल एक महिना होत आला असून हे दोन्ही शास्त्रज्ञ परतले नाहीत. त्यांच्या उपकरणांमध्ये समस्या झाल्या होत्या, मात्र नासा आणि बोइंग यांनी उपकरणांच्या समस्यांचे निवारण केल्यामुळे ते मार्गावर आले आहे. पृथ्वीवर अवतरणाच्या तीन तारखा जाहीर करण्यात आल्या, मात्र नासाकडून त्या रद्द करण्यात आल्या. या अंतराळवीरांना घरी कधी परत आणायचे हे ठरवण्यासाठी आता नासा सर्व तांत्रिक अडचणींचा उच्चस्तरीय आढावा घेत आहे. ‘‘दोन्ही अंतराळवीर अंतराळात अडकले नाहीत. त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी कोणतीही घाई नाही. प्रथम अधिकच्या चाचण्या केल्या जाणार आहे,’’ असे नासाचे व्यावसायिक क्रू कार्यक्रम व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले.