नीलिमा किराणे 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुझा नेमका काय चॉइस आहे ऋजु? कधी आईचं तपशीलवार सांगणं हवंय, कधी त्यातच ड्रामा दिसतोय. बाबांच्या  कमी बोलण्याबद्दल नेहमी तक्रार, आता त्यांच्या नेमक्या बोलण्याचं कौतुक. म्हणजे तुझ्या तेव्हातेव्हाच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी बोलायचं का? दोघांचे स्वभाव पूर्वीपासून तसेच आहेत. तू आता परदेशी आल्यानंतर तिकडची माहिती कळली नाही, तर तुला दूर पडल्यासारखं वाटतं आणि तक्रारी ऐकल्या की लांब राहिल्याबद्दल गिल्टी वाटतं, हा प्रॉब्लेम तुझा आहे. तुला कनेक्टेडपण वाटायला पाहिजे आणि चिंता, अस्वस्थतापण नको.

 “हॅलो आई, काय चाललंय?”

ऑफिसला जाण्यासाठी कॅबमध्ये बसल्यावर ऋजुताने नेहमीप्रमाणे फोन लावला. भारतात राहणाऱ्या आई-बाबांशी बोलण्याची ही तिची ठरलेली वेळ. घरातल्या लहानमोठ्या घडामोडी, नातलगांची ख्यालीखुशाली आईकडून तपशीलवार कळायची. त्यामुळे ऋजुला सर्वांशी कनेक्टेड असल्यासारखं वाटायचं. बाबा कधीतरी फोन घ्यायचे. त्यांच्या पहिल्या ‘हॅल्लो’ तूनच त्यांना वाटणारी ओढ तिच्यापर्यंत पोहोचायची. ‘‘तू बरी आहेस ना? काही अडचण नाही ना?’’ एवढं ते आवर्जून विचारायचे, पण पुढे बोलायला सुचायचं नाही. मग काहीही बोलायचे. एकदा तर म्हणाले, “अगं, ती जान्हवीची मुलगी बोर्डात पहिली आलीय बरं का…”

“कोण जान्हवी?”

“तुला माहीत नाही? त्या xxxxx मालिकेतली?

“अहो बाबा, तुमची तब्येत कशी आहे? काका, आत्या कुणाची काय बातमी? हे काही तुम्ही सांगतच नाही. मी काळजीने एवढ्या लांबून फोन करते आणि तुम्ही त्या जान्हवीबद्दल नाहीतर राजकारणाबद्दल बोलता.” ऋजु वैतागायची.

“अगं, माझ्या तब्येतीत नवीन काय? नेहमीची औषधं चालू आहेत. तुझी आई सांगते तशा बातम्या काही मला सांगता येत नाहीत आणि लक्षातही रहात नाहीत बुवा.” असं म्हणायचे.

आज आईकडे नवीन बातमी होती. 

“आपल्या घरासमोरचा रस्ता डांबरी होतोय बरं का ऋजु. काम सुरू झालंय.”

“वॉव. वीस वर्षांनी तपश्चर्या फळाला आली तर. त्या गल्लीतल्या एवढ्याशा रस्त्यासाठी किती अर्ज केलेत  नगरपालिकेत.”

ऋजूला बरं वाटलं. पण दोन दिवसांनी आई तक्रारी करत म्हणाली,

“अगं, रस्त्याच्या कामामुळे पुढचं गेट बंद झालंय. गाडी बाहेर काढता येत नाही. रस्त्याची लेव्हल वाढणार आहे. डांबराचा धूर इतका, खोकतेय मी दोन दिवस. रस्ता अडल्यामुळे भाजीवालेपण येईनात इकडे…” 

“अगं, त्या मुकादमाला सांगा ना गाडी जाण्यासाठी उतार करून द्यायला.., जास्तीची भाजी घेऊन ठेव, नाहीतर उसळीचं भिजव… मास्क बांध….”

ऋजुतानं बरेच सल्ले दिले. मग तिलाच वाटलं, “जाऊ दे, आपण तरी इतक्या लांबून उंटावरून शेळ्या कशाला हाकतोय?” पण आईच्या तक्रारी आणि लांबलचक तपशीलामुळे ऋजु खूप वेळ काळजीने अस्वस्थ होती.  

दोन दिवसांनंतरचा फोन बाबांनी उचलला. “रस्त्याच्या कामाचा खूप त्रास होतोय का बाबा?” तिनं विचारलं.

“त्रास कसला? मस्त झालाय रस्ता. त्यांनी गाडीसाठी छान उतारपण करून दिलाय.”

“धुराचा त्रास झाला ना? अडकून पडलात २-३ दिवस?

“छे ग. गाडी काढता आली नाही, त्यामुळे चालत जाऊन पुढे रिक्षा करावी लागली तेवढंच. धूर दोन दिवस होता मधूनमधून. तेवढा त्रास तर होणारच ना, वीस वर्षांनी रस्ता झालाय, हे महत्त्वाचं.”

ऋजु नवलाने ऐकत राहिली. तोच प्रसंग, पण आईचं केवढं ड्रामाटायझेशन आणि बाबांचं किती थोडक्यात, सहज घेणं. एखाद्या गोष्टीकडे कसं पाहायचं, हा चॉइस ज्याचा त्याचा असतो खरा.

रस्त्याच्या कामाचा त्यांना त्रास झाला नाही हे कळल्यावर आपली अस्वस्थता क्षणात संपली हे जाणवून ऋजु चमकली. तुझा नेमका काय चॉइस आहे ऋजु? कधी आईचं तपशीलवार सांगणं हवंय, कधी त्यातच ड्रामा दिसतोय. बाबांच्या  कमी बोलण्याबद्दल नेहमी तक्रार, आता त्यांच्या नेमक्या बोलण्याचं कौतुक. म्हणजे तुझ्या तेव्हातेव्हाच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी बोलायचं का? दोघांचे स्वभाव पूर्वीपासून तसेच आहेत. तू आता परदेशी आल्यानंतर तिकडची माहिती कळली नाही, तर तुला दूर पडल्यासारखं वाटतं आणि तक्रारी ऐकल्या की लांब राहिल्याबद्दल गिल्टी वाटतं, हा प्रॉब्लेम तुझा आहे. तुला कनेक्टेडपण वाटायला पाहिजे आणि चिंता, अस्वस्थतापण नको. आता तूच ठरव, अपेक्षेप्रमाणे आई-बाबांशी संवाद झाला नाही की मूडस्विंग होऊ द्यायचे, की दोघांचे स्वभाव समजून घेऊन आपल्या चिंतेची लेव्हल ठरवायची? चॉइस तुझा आहे. 

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatura article communication with parents effects of mother father relationship with child zws