आयुष्यात पन्नशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो की, आपण आता लवकरच म्हातारे होणार, ही भावना समस्त स्त्री-पुरुषांना त्रस्त करीत असते. त्यामुळे साहसी खेळ खेळणे किंवा खेळाशी निगडीत एखादी साहसी कृती करण्याचे स्वप्न फार कमी या वयात लोक बघतात, पण मनात जिद्द असेल तर त्यासाठी वय हे अडथळा ठरत नाही, हे ५२ वर्षीय श्यामला गोली यांच्याकडे पाहून निश्चित समजते.
श्यामला गोली यांनी अलीकडेच विशाखापट्टणम ते काकिनाडा हा दीडशे किमी अंतराचा समुद्र पट्टा पोहून पार केला. आणि एक नवीन विक्रम विस्थापित केला. २८ डिसेंबरपासून रोज ३० किमी पोहत अवघ्या पाच ते सहा दिवसांमध्ये त्यांनी आपली ही मोहिम पूर्ण केली. या प्रकारची मोहिम पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहे.
हेही वाचा : वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!
श्यामला जरी पट्टीची पोहणाऱ्या असल्या तरी हे यश त्यांच्यासाठी दिसते तितके सहज नव्हते. त्यांच्या आयुष्याची कहाणी एखादया चित्रपटासारखी आहे. तेलंगणातील एका सर्वसामान्य कुटुंबात त्या वाढल्या. समाजशास्त्रात एम.ए.केल्यानंतर,पुढे ॲनिमेशनचा कोर्स करून स्वत:ची ॲनिमेशन कंपनी सुरू केली. नवऱ्याच्या साथीने अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले.
सारं काही सुरळीत सुरू असताना व्यवसायामध्ये नुकसान झाले. परिणामी त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांनी पोहायला सुरुवात केली. पोहता पोहता आपल्याला यात रुची आहे हे त्यांच्या लक्षात आले. पुढे २०१९ मध्ये त्यांनी पाटणा येथील खुल्या गंगा नदीच्या पात्राचे तेरा किमीचे अंतर पोहून पार केले. यानंतर त्यांचा हुरुप वाढला. पोहण्याच्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये भाग घेऊ लागल्या. त्यामध्ये त्यांना यशही मिळाले.
पुढे २०२१ मध्ये श्रीलंका येथील पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या पावणे चौदा तासांत पोहून त्यांनी नवा विक्रम स्थापित केला. हा टप्पा पार करणाऱ्या त्या जगातील द्सऱ्या महिला ठरल्या आहेत. तर तेराव्या जलतरणपटू आहेत. पाल्कच्या यशाने त्यांच्यात चांगलाच आत्मविश्वास निर्माण झाला. आता पुढे काय हा विचार करीत असतानाच, त्यांना विशाखापट्टणम् ते केकीनाडा हा समुद्रीय पट्टा खुणावू लागला. या प्रकारच्या समुद्रीय पट्ट्यात पोहणं हे खूप आव्हानात्मक असतं, पण त्यांनी मनाशी निर्धारच केला होता.
हेही वाचा : पडदा प्रथा न पाळणे ही क्रूरता कशी?
यासाठी आवश्यक तो सराव करीत त्यांनी २८ डिसेंबर २०२४ मध्ये आपल्या या मोहिमेला सुरुवात केली. सारं जग नवीन वर्षाचा आनंद कसा साजरा करायचा यात गुंतले होते आणि श्यामला मात्र आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करीत होत्या.
या मोहिमेत त्यांच्याबरोबर चौदा जणांची टीम कार्यरत होती. त्यात डॉक्टर्स, स्कुबा ड्रायव्हर अशी अनेक मंडळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात होती. समुद्रात पोहणं हे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं.
या मोहिमेतल्या अनुभवांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, वाटेत येणाऱ्या डॉल्फिनबरोबर पोहताना खूप धम्माल येत होती तर कधी जेलीफिश त्रास देत होते. त्याचबरोबर लाटांचा लहरीपणा, बदलते हवामान या साऱ्या गोष्टींमध्ये पोहणाऱ्याचा अगदी कस लागला. परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात आहे असं वाटत असताना, मला माझ्या योगा आणि ध्यानाचा खूप फायदा झाला. कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या ध्येयाकडे पोहचणार आहे, हा विश्वास मला मिळाला. खरोखरीच माझ्या या मोहिमा मला नुसतचं यश देत नाही, तर आयुष्याकडे अधिकाधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवितात.
हेही वाचा : कोनेरू हम्पी… जलद बुद्धिबळाची विश्वसम्राज्ञी
आज मागे वळून जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे पाहते, तेव्हा जाणवते की, मी यशाचे जितके उंच शिखर बघितले आहेत तितकाच अपयशाचा तळही अनुभवला आहे. पण हे अपयश आले नसते तर मला माझ्यात दडलेले पोहण्याचे प्रेम कधी सापडलेच नसते.
खरोखरीच श्यामला गोलींचा जीवनप्रवास पाहिल्यानंतर एक गोष्ट सहजपणे जाणवते की, यशस्वी होण्यासाठी वयाचे बंधन नसते. हवी असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती- कोणत्याही वयात यशाला भिडण्याची.