पलीकडच्या कप्प्यात हाऊस प्लांट गाईड वाट पाहात होतं, त्यांच्या शेजारी ऑल इंनडोअर प्लांट गाईड विसावलं होतं, त्यांचं कप्प्यात स्वीय शेती हे ग्रंथाली ज्ञानयज्ञ मधील सुंदर पुस्तक होतं, तर पलीकडे बाग एक जगणं होतं. मारूती चितमपल्ली यांच्या नवेगाव बांधाचे दिवस आणि त्यातील मोर खुणावत होती तर श्री. द. महाजनांचे आपले वृक्ष साद घालत होते. वनस्पतीतील विज्ञान, ग्रामपुनर्चनेचे प्रयोग, जोहड जलनायक ही सगळी मंडळी माझीच जणू वाट पाहात होती. हिडन लाईफ ऑफ ट्रीज् एका बाजूला होतं, तर माणूस आणि झाडं हे निळू दामले सरांचं आवडत पुस्तक दुसऱ्या बाजूला. विपुलाचं सृष्टी, बखर रानभाज्यांची अशी किती नावं सांगू. माझ्याभोवती एक निसर्गग्रंथ संमेलनच भरलं होतं.
खरं तर कोणतीही गोष्ट आवरायला आपल्याला तितकीशी आवडत नाही. मग ते जेवणानंतरचं टेबल आवरणं असो की एखादं कपड्यांचं कपाट असो. एकंदर आवराआवरी हे तसं कंटाळवाणंच वाटतं. पण पुस्तकांचं कपाट हे याला अपवाद असावं.
या आवराआवरीत किती गोष्टी नव्याने हाताशी लागतात. काही पुस्तकं पुन्हा वाचायची म्हणून बाजूला निघतात तर काही अरेच्चा! हे पुस्तक आपण घेतलंय वाटतं ! अशी आश्चर्यात पाडतात. माझ्या पुस्तक संग्रहात झाडं, फुलं, पानं अशा सगळ्या मंडळींची मोठीच गर्दी आहे. त्यासंबंधी अनेक पुस्तकं आहेत. बागेत काम करताना ,झाडांची देखभाल करताना मला जितका आनंद होतो तेवढाच आनंद ही पुस्तके हाताळताना होतो.
आजच्या या लावा-लावीमध्येसुद्धा परत एकदा मागच्यावेळी झालं तसंच झालं. प्रत्येक पुस्तक काढून ते मऊ कपड्याने पुसून मी एक एक करून ओळीने मांडत होते आणि परत एकदा त्यात रमत होते. मध्यंतरी ‘भाई एक कविता हवी आहे’.
हा अतिशय सुंदर कार्यक्रम पाहिला. पाहिला म्हणणं तितकसं बरोबर होणार नाही खरं तर अनुभवला.
यात सुनीताबाईंनी शोध घेतलेल्या कवितेचा सुंदर प्रवास आहे. त्या शोधादरम्यान त्यांची नव्याने होत असलेली जुनी पुस्तकं भेट इतकी तरलपणे उलगडत जाते की नकळत आपण त्यात हरवून जातो.
आज तसाच काहीसा अनुभव मी ही घेत होते. शहरी शेतीच्या वर्गात दिली गेलेली पुस्तकं हाती लागली, तशी गच्चीवर लावलेल्या पहिल्या वहिल्या पालकाचा फसलेला प्रयोग आठवला.उ साच्या चिपाडां पासून खत तयार करताना मुंग्यांनी भरून गेलेली गच्ची आठवली. नुसतं शिकून भागत नाही तर प्रत्येक बारीक गोष्ट कारणासहित समजून घ्यायला हवी हे लक्षात येऊन सगळी पुस्तकं परत वाचून काढलेली आठवली. कास पठारावर जाण्याआधी वाचलेली कासच्या फुलांवरली पुस्तकं. इंगळहळीकर सरांचं अत्यंत आवडतं ‘आसमंत’. प्रा हेमा साने यांचं ‘कमळ’, अ. बा पाटील सरांचं ‘बोन्साय’. उमेश मुंडल्ये सरांचं ‘देवराई’. अर्चना जगदीश यांचं ‘नागालँडच्या अंतरंगात’. माधव गाडगीळ सरांचं आत्मचरित्र…
‘एक होता कार्व्हर’ आणि पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्याबद्दल अगदीं पहिल्याने ओळख झाली ती विणाताई गवाणकरांची पुस्तकं. मॅजेस्टिकच्या पुस्तक दालनात हाती लागलेलं वनस्पतींच आश्चर्य कारक जग हे जुनं पुस्तक. एका काडातून क्रांती घडवणाऱ्या मासानोबु फुकुओका यांचं अनुभव कथन…
ऋतूरंग दिवाळी अंकातील निसर्ग विषयक लेखांचं संकलन असलेले निसर्गाच्या छायेत हे अत्युत्तम पुस्तक.
कांचन प्रकाश संगीत यांचं हरितायन. रश्मी कशेळकर या जीवलग सखीचं भुईरिंगण, निर्मला मोनेंचं घरं कौलारु.
बागजशी बहरत जाते आणि आपल्यात आंतरिक आनंदाला नवे धुमारे फुलते, तद्वतच ही पुस्तकांची बाग पाकळी दर पाकळी उमलत होती.
पलीकडच्या कप्प्यात हाऊस प्लांट गाईड वाट पाहात होतं, त्यांच्या शेजारी ऑल इंनडोअर प्लांट गाईड विसावलं होतं, त्यांचं कप्प्यात स्वीय शेती हे ग्रंथाली ज्ञानयज्ञ मधील सुंदर पुस्तक होतं, तर पलीकडे बाग एक जगणं होतं. मारूती चितमपल्ली यांच्या नवेगाव बांधाचे दिवस आणि त्यातील मोर खुणावत होती तर श्री. द. महाजनांचे आपले वृक्ष साद घालत होते. वनस्पतीतील विज्ञान, ग्रामपुनर्चनेचे प्रयोग, जोहड जलनायक ही सगळी मंडळी माझीच जणू वाट पाहात होती. हिडन लाईफ ऑफ ट्रीज् एका बाजूला होतं, तर माणूस आणि झाडं हे निळू दामले सरांचं आवडत पुस्तक दुसऱ्या बाजूला. विपुलाचं सृष्टी, बखर रानभाज्यांची अशी किती नावं सांगू. माझ्याभोवती एक निसर्गग्रंथ संमेलनच भरलं होतं. हे सगळं सगळं कितीदा तरी वाचलं होतं. अनेक गोष्टी समजून घेतल्या होत्या तरीही परत वाचावं वाटत होतं.
आवरणं तर केव्हाच बाजूला पडलं होतं.मी त्या पुस्तक पसार्यात स्वतःला हरवू दिलं, रमू दिलं.
माझ्या झाडांमध्ये रमताना जशी मी हरवून जाते तशीच आज या हिरव्या लेखांच्या बागेत हरवून गेले होते.
टिंग !टिंग! मेसेज आल्याची सूचना मोबाईलने दिली. सवयीने मेसेज उघडून बघितला. आमच्या लट्टू सरांच्या नवीन पुस्तकाच प्रकाशन होणारं होतं. त्याचं आग्रहाचं बोलावणं होतं. सरांच आय लव्ह फ्रूटस् आणि जोडीला इतर दोन लेखकांची सुंदर पुस्तकं असा भरगच्च कार्यक्रम होता. विलक्षण आनंद झाला. समारंभाची तारीख टिपून घेतली. जाणं नक्की केलं. जायला तर हवंच कारण आता तीन नवीन हिरवे मित्र माझ्या संग्रहात येणार होते. त्यांचा विचार करत करतच मी काढलेली सगळी पुस्तकं लावायला घेतली, येणाऱ्या पुस्तकांसाठी जागा करायची होतीच ना?