गर्भाशयाच्या मुखाचा (Cervix ) कर्करोग होऊ नये यासाठी HPV (Human Papilloma virus) नावाची लस दिली जाते. या लसीकरणाचा नेमका परिणाम साधण्यासाठी ही लस मुलींना तरुण वयात, लग्न होण्यापूर्वी देणं अधिक योग्य ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुण अविवाहित मुलींना ही लस देण्याबद्दल तिच्या आई-वडिलांच्या मनात संभ्रम आहे. लसीकरण वेळापत्रकात नव्यानेच समावेश करण्यात आलेल्या या लसीबद्दल माहिती मिळाल्यास त्यांचा संभ्रम दूर होईल. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यामागे नेमकं कारण काय याबद्दल यापूर्वी माहिती नव्हती. १९८० च्या दशकात या संदर्भात झालेल्या संशोधनात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्यूमन पिपिलोमा या विषाणू (व्हायरस)च्या संसर्गामुळे होतो असं सिद्ध झालं आहे. या विषाणूचं संक्रमण ‘शारीरिक संबंध’ आल्यानंतर होत असतं. HPV या विषाणूचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी HPV-१६ आणि HPV-१८ या विषाणूंचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने, (साधारण ७० टक्के) HPV-१६ आणि HPV-१८ या दोन प्रकारच्या विषाणूमुळे हा कर्करोग होतो, असं लक्षात आलेलं आहे. Human Papilloma विषाणूचं इन्फेक्शन झालेल्या सर्वच व्यक्तींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो असं नाही. संसर्ग झाल्यानंतर सहसा शरीरात असणारी प्रतिकार शक्ती विषाणूचा नायनाट करण्यासाठी सक्षम असते. पण काही कारणांमुळे विषाणू अनेक दिवस शरीरात वास्तव्य करून राहिल्यास कर्करोग होण्याची शक्यता वाढते. HPV ची लस दिल्यानंतर या विषाणूचं निर्मूलन करण्याची शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते. HPV व्हॅक्सिनच्या लसीकरणाचं वय मुलीच्या वयाच्या १० वर्षांपासून ते ४५ वर्षापर्यंत इतकं असलं तरी वयाच्या १२ ते १६ वर्षाच्या कालावधीत देणं जास्त योग्य.

हेही वाचा : ‘ग्रे डिव्होर्स’चा विचार करताय?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये किंवा प्रतिबंधित व्हावा यासाठी HPV लस मुलींना किशोरवयीन वयातच किंबहुना लग्नानंतर त्यांना पहिला ‘शारीरिक संबंधा’चा अनुभव येण्यापूर्वी दिलं जाणं आवश्यक आहे. ही लस इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध आहे. या लसीचे एकूण तीन ‘डोस’ दिले जातात. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस एक महिन्यानंतर आणि तिसरा ६ महिन्यानंतर दिला जातो. मुलीचं वय १५ वर्षापेक्षा कमी असल्यास दोन डोस देखील पुरेसे ठरतात. वयाच्या २६ वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्व मुलींना किंवा स्त्रियांना ही लस दिली जावी असं या लसीकरणाचं ‘लक्ष्य’ ठेवलं आहे. लस देण्यापूर्वी, लसीकरणाची आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्तीने या लसीच्या उपयुक्तता, सुरक्षितता आणि परिणाम याबद्दल सविस्तर माहिती त्या स्त्रीला किंवा मुलीच्या आई-वडिलांना दिली पाहिजे.

नियमित लसीकरणासोबत ही HPV लस द्यायला हरकत नाही. गर्भवतीला ही लस देण्यास मनाई आहे. जी स्त्री गर्भधारणा राहावी यासाठी नियोजन करत असेल तिने ही लस प्रसूती झाल्यानंतर घ्यावी. एखादी स्त्री आजरी असल्यास, (उदा. ताप, सर्दी, खोकला) तो आजार कमी होईपर्यंत लस देऊ नये. ही सध्या उपलब्ध असलेली लस फक्त HPV-१६ आणि HPV-१८ या दोन प्रकारच्या विषाणूमुळे होणारं इन्फेक्शनचं प्रतिबंधित करते हे लक्षात घेतलं पाहिजे. समजा ही लस देण्याअगोदर या विषाणूचं शरीरात संक्रमण झालं असल्यास, त्यावर उपचार म्हणून या लसीकरणाचा उपयोग होत नाही. ही लस घेतल्यानंतर, एखाद्या लाभार्थीला अंग खाजणे, चक्कर येणे अश्या प्रकारची सौम्य ‘रिअक्शन’ काही मिनिटांसाठी येऊ शकते. लस दिल्यानंतर किमान १५ मिनिटे त्या मुलीने किंवा स्त्रीने हॉस्पिटलमधे थांबावं, लगेच घरी जाण्याची घाई करू नये. एखाद्या स्त्रीला संभोगानंतर लगेच योनीमार्गातून रक्तस्त्राव होणं किंवा मेनोपॉजनंतर अधून-मधून रक्तस्त्राव होणं, हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. लस घेतल्यानंतर देखील असा त्रास झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरकडे जाऊन ‘आतून’ मधून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा : महिलांचा वारसाहक्क…

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे स्त्रियांचे मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण अजूनही आपल्या देशात खूप जास्त आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचं निदान अतिशय सुरुवातीच्या टप्प्यावर व्हावं यासाठी ‘पॅप स्मियर’ ही तपासणी केली जाते. HPV व्हॅक्सीन घेतल्यानंतर देखील ही तपासणी करणं आवश्यक आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा लैंगिक संबंधाच्या वेळेस होणाऱ्या Human Papilloma विषाणूच्या संक्रमणामुळे होतो असं सिद्ध झाल्यामुळे ही लस मुलांना किंवा पुरुषांनादेखील दिली गेली पाहिजे, या विषयावर संशोधन चालू आहे.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatura article on how to prevent from cervical cancer css