कलेचे विश्व अफाट आहे. यात जेव्हा आंतरराष्टीय स्तरावर एखाद्या कलाकाराला पुरस्कार मिळतो, तेव्हा त्याची कला ही लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचत असते. हा पुरस्कार मिळणं ही जशी त्या देशासाठी अभिमानाची बाब असते तितकीच ती त्या कलाकारासाठीदेखील असते. ‘सोव्हरीन एशियन आर्ट २०२५’ हा आंतरराष्टीय स्तरावरील मानाचा पुरस्कार जिंकून अर्पिता अखंदाने कलेच्या विश्वात स्वत:ची खास अशी मोहोर उमटविली आहे.
आपल्या हातात असलेल्या कलेच्या सहाय्याने जो प्रभावीपणे व्यक्त होतो तो खरा कलाकार. मग हातात असलेलं माध्यम, ते चित्रकलेचे असो वा कुंभार कलेचे किंवा विणकाम कलेचे, याच्याने काहीच फरक पडत नाही. मनात खदखदणाऱ्या भावना या सळसळत्या हाताने जेव्हा व्यक्त होतात, तेव्हा निर्माण झालेली कलाकृती ही खऱ्या अर्थाने जिवंत होत असते.
अर्पिता अखंदाची कलाकृती पाहिल्यानंतर नेमक्या याच भावना मनात येतात. कोण आहे ही अर्पिता? हिची ओळख करून द्यायची झाली तर कागदी विणकाम करून, आपल्यातील कलेला एक नवा आयाम देणारी हरहुन्नरी कलाकार.इंडियन आर्ट फेअरच्या नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेत तिच्या कलाकृतीला सोव्हरीन एशियन आर्ट २०२५ चा आतंरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत असा पुरस्कार प्राप्त झाला. यात तिने कागदी विणकाम करून आपल्या कलाकृती सादर केल्या होत्या.
आज ३२ वर्षीय असलेल्या अर्पिताचा जन्म ओडिशा राज्यातील कटक शहरातल्या एका कुटुंबात जन्म झाला. मुळातच कलेचा वारसा कुटुंबाला असल्यामुळे साहजिकच अर्पिताकडेदेखील तो आला. बांगलादेशची फाळणी झाल्यानंतर जी कुटुंबे भारतात स्थलांतरित झाली, अशा कुटुंबापैकी एक अर्पिताचे कुटुंब होते. भारतात परतल्यानंतर ठिकठिकाणी राहिल्यानंतर, अखंदा यांच्या कुटुंबाने कटक येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून आजी-आजोबांकडून फाळणीच्या गोष्टी ऐकत ती मोठी झाली.
आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली तरीही फाळणीच्या वेदनेची जखम अजूनही लोकांच्या मनात खोल आहे हे तिला कुठेतरी जाणविले. आणि वेळोवेळी तिने हे दु:ख आपल्या कलेतून मांडले आहे.
तिने चित्रकलेमधून बीएफए आणि एमएफएचे शिक्षण कलाभवन, विश्व भारती विद्यापीठ येथून पूर्ण केले. केवळ चित्रकला नाही तर कागदी विणकाम, फोटोग्राफी, परफॉर्मन्स आर्ट, व्हिडीओ मेकिंग अशा अनेक कलांवर तिचे प्रभुत्व आहे. या विविध माध्यमांचा उपयोग करून ती आपल्या कलेचे सादरीकरण करीत असते. कागदी विणकामात तर तिचा इतका हातखंडा आहे की, त्या नाजूक अशा कलाकृतीतून थेट ह्रदयाला भिडणाऱ्या आहेत.
या व्यतिरिक्त बॉडी ॲज ए मेमरी कलेक्टर’ हा तिचा सादरीकरणाचा प्रकार कलाक्षेत्रात अत्यंत लोकप्रिय आहे.या प्रकाराविषयी थोडक्यात सांगायचे झालं तर,आपल्या पैकी बहुतांश घरात आजी-आजोबांच्या काळातले काळ्या-पांढऱ्या रंगातील फोटो असतात.
त्याकाळी अप्रूप वाटणारे हे फोटो खूपच साधे असतात. म्हणजे नवरा-बायको पैकी कुणीतरी एक खुर्चीवर बसलेले असतात आणि शेजारी कुणीतरी उभे असते. हे फोटो जरी साधे-सरळ असले तरीही या प्रत्येक फोटोमागे प्रत्येकाची काही ना काही आठवण दडलेली असते. या अशा फोटोमागे दडलेल्या आठवणींचा विषय घेऊन नवनिर्मिती करायला अर्पिताला खूप आवडते. या तिच्या मेमरी कलेक्टरला तिचा स्वत:चा असा खास ‘टच’ लाभल्यामुळे ते अधिक जिवंत वाटतात.
२०१६ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भाग घेतला. २०१९ पासून ते आजतागायत अनेक प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अर्पिताच्या कलाकृती म्हणजे पारंपरिकता आणि काव्यात्मक स्पर्श यांचा एक अनोखा मिलाफ असतो, असे प्रशंसात्मक उद्गार यंदाच्या पुरस्कार समितीतील एका नामवंत परीक्षकाने काढले होते. आणि हे उद्गार खरोखरीच सार्थ आहे, हे आपल्याला तिच्या कलाकृती पहिल्यानंतर निश्चितच जाणविते. आपल्या कामाच्या निमित्ताने जेव्हा ती कर्नाटक येथील हम्पी येथे राहिली होती, तेव्हा तेथील नद्यांची तिला चांगलीच भुरळ पडली. या नद्या वाहत वाहत जेव्हा खडकांमधून पुढे जातात, तेव्हा या खडकांवर नदीच्या पाण्यामुळे काही विशिष्ट प्रकारचे आकार तयार झालेले दिसतात. या संदर्भात बरेच संशोधन करून या कलात्मक कामाचे रुपांतर तिने कागदी विणकामातून दाखविले.
डेनटरिक डेटा एलबी हे नाव तिने आपल्या या कलाकृतीला दिले आणि याच कलाकृतीला आंतरराष्टीय स्तरावरील सोव्हरीन एशियन आर्ट पुरस्कार प्राप्त झाला. या स्पर्धेसाठी जगभरातून अनेक मंडळींनी सहभाग घेतला होता. अंतिम ३५ स्पर्धकांमधून अर्पिताची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. अर्पिताला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे भारतीय कलाक्षेत्रासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे.