रोहित पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलं सहसा आपल्या आईवडिलांचा किंवा त्या त्या क्षेत्रातील आवडत्या व्यक्तीचा किंवा थोरामोठ्यांचा आदर्श घेतात. पण समाजात अशीदेखील काही उदाहरणं आहेत जिथे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आईवडिलांना आपल्या मुलांचा आदर्श घेतात. किंवा आपल्या मुलांकडून त्यांना आपलं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. आज आपण अशीच एक घटना पाहणार आहोत जिथे एक मुलगी आपल्या आईसाठी प्रेरणा बनली आहे.

ही कहाणी आहे आंध्रप्रदेशातील सुरगानी अंजनी देवी आणि दसारी निखिता देवी या मायलेकींची. आंध्रप्रदेशातील प्रकाशम् जिल्ह्यातील कोलालापुडी गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरगानी अंजनी देवी यांना लहानपणापासून खेळाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी ग्रॅपलिंग कुस्तीप्रकारात आंतरशालेय, जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेऊन अनेक पदके जिंकली होती. त्यांचे आईवडील वीरभद्रय्या आणि कोटेश्वरम्मा यांनी नेहमीच त्यांना खेळासाठी पाठिंबा दिला होता. पण दहावीची परीक्षा संपल्यावर डोक्यावरील वडीलांचे छत्र हरपल्याने आई व आजोबांनी त्यांचं लग्न दासरी हनुमंथा राव यांच्याशी लावलं. लहान वयातच संसाराची जबाबदारी अंगावर पडल्यानं त्यांचं ग्रॅपलिंग कुस्तीचं स्वप्न भंगलं.

हेही वाचा… गर्भपातास संवैधानिक हक्काचा दर्जा देणारे फ्रांस हे पहिले राष्ट्र…

क्रीडापट्टू बनण्यासोबतच अंजनी यांना एखाद्या सरकारी खात्यात नोकरी करावी अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी काही वर्षांनी आचार्य नागार्जून विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समधून बीए व इंग्रजीमधून एमएची पदवी मिळवली. त्या आधारावर त्यांनी ओंगोल नगरपालिकेत कम्मा पालेम प्रभाग सचिवालयाच्या कार्यालयात कल्याण सचिव (Welfare Secretary) म्हणून रूजू झाल्या. त्यांची मुलगी दासरी निखिता देव हीदेखील उत्तम खेळाडू आहे. आपलं स्वप्नं आपल्या मुलीनं पूर्ण करावं असं अंजनी यांना वाटत होतं. त्यामुळे तिला ग्रॅपलिंग कुस्तीचं प्रशिक्षण देता देता त्यांच्यातलं ग्रॅपलिंग कुस्तीपटू होण्याचं स्वप्न पुन्हा डोकं वर काढू लागलं आणि इथूनच त्यांच्या मनात अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायची इच्छा निर्माण झाली. आणि त्या पुन्हा नव्या जोमानं सराव सुरू करू लागल्या.

अलीकडेच २०२३ मध्ये हरियाणा येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकून या मायलेकींनी नवीन इतिहास रचला आहे. याआधी देखील त्यांनी आंध्रप्रदेशमध्ये सिनियर आणि ज्युनियर अशा जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता. तिथेही या मायलेकींनी सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती.

हेही वाचा… अपघात, १४ सर्जरी अन् मोडलेला संसार; तरीही जिद्दीने बनली IAS अधिकारी! पाहा प्रीतीची प्रेरणादायी गोष्ट

अंजनी देवी म्हणतात की, त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. अन् आईवडिलांचा देखील त्यांना पूर्ण पाठिंबा होता. शाळेत असताना जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये खूप पदके मिळवली होती. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नेतृत्व करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. परंतु वडिलांच्या निधनाने सर्वच काही बदललं. पण मुलीला प्रशिक्षण देता देता पुन्हा एकदा आपणही रिंगणात उतरण्याची इच्छा निर्माण झाली. माझी मुलगीच माझी प्रेरणास्थान आहे असं त्या अभिमानाने सांगतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatura article on surgani anjani devi and dasari nikitha devi mother daughter from andhra pradesh won medals in wrestling asj
Show comments