डॉ. नागेश टेकाळे
नवीन घर म्हटले की दिवाणखाना आलाच. त्यामध्ये बांबूचा सुरेख सोफासेट, एक लाकडी शोकेस, बांबूच्या पट्ट्यांचे सुबक पडदे, मध्यभागी चहाचा एक लहान लाकडी टेबल, कोपऱ्यात एखादी झाडाची कुंडी, भिंतीवर छानसे निसर्गचित्र व सोबत प्रत्येक तासाला विविध पक्ष्यांचे आवाज करणारे तेवढेच सुंदर घड्याळ आणि खिडकीजवळ ठेवलेले काचेचे गोलाकार भांडे, त्यामध्ये असलेली सुरेख, छानशी आकर्षक बाग… वास्तूमधील या सजावटीवरून हा घरमालक नक्कीच पर्यावरणावर नितांत प्रेम करणारा असणार, याची तुम्हास खात्री पटलीच असेल. दिवाणखान्यातील इतर सजावट जरी तुमच्या ओळखीची असली तरी त्या खिडकीजवळचे ते गोलाकार काचेचे भांडे व आतील सुंदर बाग हा काय प्रकार आहे, हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असणार, हे आहे टेरॅरियम म्हणजेच बॉटल गार्डन.
२१ व्या शतकामधील उभरत्या उद्यानशास्त्राच्या शाखेवर उमललेले हे एक निसर्गाचे देखणे रूप. हे रुपडे नुसते पाहण्यासाठी नव्हे तर उद्योगनिर्मितीमध्येसुद्धा तुम्हास भरपूर पैसा मिळवून देऊ शकते हे सांगूनही विश्वास ठेवणे कठीण, म्हणून प्रत्यक्ष कृतीतूनच अनुभव घेणे जास्त योग्य. टेरॅरियम आपणास घरच्या घरी सहज तयार करता येऊ शकते. यासाठी हवे एक पसरट गोलाकार काचेचे भांडे. आकार २ ते ५ लिटर पानी बसेल एवढा असावा. भांड्याच्या तळाशी २-३ इंचीचा खतमिश्रित लाल मातीचा थर पसरावा. हे भुसभुशीत मातीचे मिश्रण बुरशीनाशक औषधाने ओलसर करून घ्यावे आणि नंतर यामध्ये सावलीत वाढणाऱ्या लहान वनस्पतींची रोपे हलक्या हाताने खोचून लावावी. ३-४ पेक्षा जास्त वनस्पतींची गर्दी करू नये. टेरॅरियमसाठी लागणाऱ्या विविध वनस्पती कुठल्याही रोपवाटिकेत सहज उपलब्ध असतात. या वनस्पती लावण्यापूर्वी त्या बुरशीनाशक पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. वनस्पती लावल्यानंतर प्रत्येकास काही थेंब मोजके पाणी द्यावे. आतील मिश्रणावर काही रंगीत खडे, एकदोन शंखशिपले अथवा लहान प्राणी ठेवावेत, बाटलीचे झाकण बंद करावे व तिला खिडकीमध्ये अथवा चांगला उजेड येत असेल अशा ठिकाणी ठेवावी.
खिडकीमधून झिरपणारा सूर्यप्रकाश टेरॅरियमसाठी उत्तम. दिवाणखान्यात योग्य जागेवर ठेवलेले टेरॅरियम दोन आठवड्यांत स्थिर होते. सूर्यप्रकाश भांड्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. टेरॅरियमसाठी सावली व आर्द्रतेमध्ये वाढणाऱ्या नाजूक निरोगी वनस्पती लागतात. बंद काचेतील या बागेस कुठलेही खत अथवा पाणी लागत नाही. ही बाग नेहमी भांड्याच्या अर्ध्या उंचीएवढी असावी. या बागेत फुले येणाऱ्या वनस्पती लावल्या जात नाहीत. वनस्पती जमिनीतून पाणी आणि मूलद्रव्ये शोषून घेतात. शोषलेले पाणी बाष्पीभवन क्रियेतून बाहेर टाकले जाते, हे बाष्परूपी पाणी काचेच्या आतल्या पृष्ठभागावर जमा होऊन पाण्याच्या रूपात पुन्हा खालच्या मातीमध्ये जाते.
टेरॅरियममध्ये आपणास वनस्पतीचे कर्बपृथ:करण आणि श्वासोच्छ्वासाच्या क्रियेमधील कर्बवायू व प्राणवायू यांच्या देवघेवीचा उत्कृष्ट समन्वय पाहावयास मिळतो. म्हणूनच या भांड्याचे झाकण न उघडताही टेरॅरियम दोन ते तीन वर्षे अशाच छान हिरव्या विविध रंगांच्या पानामधून तुमच्या घरचा आनंद द्विगुणित करते. काचेच्या भांड्यातील ही आकर्षक बाग घरामध्ये एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हाताने उचलून सहज नेता येते. मात्र त्याचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करू नये.
टेरॅरियम ही खास दिवाणखान्यासाठीच निर्माण केलेली काचेच्या बंद भांड्यामधील सुंदर बाग आहे. या बागेचा बाहेरच्या हवेशी अथवा वातावरणाशी काहीही संबंध नसतो. म्हणूनच यास काचेमधील बंदिस्त बाग असेही म्हणतात. टेरॅरियम हे स्वावलंबी, स्वबळावर जगणाऱ्या वनस्पती उद्यानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, म्हणून यास घरातील हरितगृह असेही म्हणतात. याची निर्मिती व त्याचे निरीक्षण हा घरातील बच्चेकंपनीसाठी पर्यावरणसंवर्धनाचा उत्कृष्ट धडा आहे.
महानगरामधील अनेक बंगले आणि गृहसंकुलातील सदनिकांमध्ये अंतर्गत राजवटीसाठी टेरॅरियमचा वापर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. मुंबईतील अनेक मॉल्समध्ये ‘गार्डन शॉप’ आहेत, तेथे विविध आकाराची टेरॅरियम ग्राहकांना कायम खुणावत असतात. विविध प्रदर्शनामध्येसुद्धा त्यांचा वेगळा स्टॉल पाहावयास मिळतो. चारपाचशे रुपयांत तीन वर्षे घरात टिकणारी बाग अनेकांना हवीहवीशी असते, ती केवळ तिच्या आतमध्ये असलेल्या हिरवाईमुळेच.
स्वत: बंदिस्त जागेत कोंडून घेऊन इतरांना नजरसुख देणारी ही आगळीवेगळी सुंदर बाग नातेवाईक आणि मित्रमंडळींना प्रसंगानिमित्त भेट देण्यास उत्तम तर आहेच, पण वास्तुशांतीसाठी घरमालकास यापेक्षा अनोखी सुंदर भेट दुसरी कोणती असणार?
nstekale@rediffmail.com