डॉ. नागेश टेकाळे
बाल्कनी हा शब्द सदनिकेशी जोडला तर तो जास्त उठून दिसतो. बाल्कनी म्हणजेच सज्जा. पूर्वी राजमहालास असे अनेक सज्जे असत आणि त्यांचा उपयोग राजघराण्यातील स्त्रिया दरबारातील विविध समारंभ अथवा बाहेरच्या मिरवणुका पाहण्यासाठी करत. बाल्कनीमध्ये बागनिर्मितीचा प्रयोग प्रथम फ्रेंच लोकांनी केला. पॅरिस शहरात आजही अशा हजारो बाल्कनीमधील बागा प्रवाशांना खुणावत असतात. युरोपमधील अनेक देशांचे हे वैशिष्ट्यच आहे. आपल्याकडेसुद्धा ही संकल्पना छानच रुजलेली आढळते. सध्याच्या काळात बहुतेक सदनिकांना एक तरी बाल्कनी असतेच. एकापेक्षा जास्त बाल्कनी असणारे खरंच भाग्यवान म्हणावेत.
बाल्कनीमध्ये बाग करण्यापूर्वी तेथे असलेली उपलब्ध जागा, हवा, उजेड, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता योग्य आहे का हे पाहावे. अरुंद बाल्कनीमधील बाग आनंदापेक्षा अडचण ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. बाग ही १/३ जागेपेक्षा मोठी असू नये. कुंड्यांचा आकार मध्यम असावा. संख्या मर्यादित व त्यांच्यामध्ये थोडे अंतर असावे. प्लास्टिक अथवा पत्र्याचे डबे बागेस बेढब स्वरूप आणतात. बाल्कनीमध्ये भरपूर सूर्यप्रकाश असेल तर विविध रंगांचे गुलाब, सदाफुली, गुलबक्षीसारखी विविध फुलझाडे लावावीत. अशा ठिकाणी रंगीत पाने असणारी छोटी झाडेसुद्धा शोभिवंत दिसतात. सूर्यप्रकाश कमी आणि उजेड खूप असेल तर सावलीत वाढणारी कुंडीतील शोभेची हिरवी पाने असणाऱ्या झाडांना प्राधान्य द्यावे. मात्र प्रकाश अतिशय कमी असेल तर बागेची संकल्पना टाळलेली बरी, कारण अशा ठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवणे म्हणजे डासांना आमंत्रणच.
हेही वाचा… मुलींसाठी गुलाबी रंग का वापरला जातो ? ‘पिंक’ रंग मुलांसाठी होता का ?
सध्या नवीन इमारतीमध्ये काचेचा वापर वाढत आहे आणि बाल्कनीसुद्धा त्यास अपवाद नाही. काचेमुळे इमारतीचे सौंदर्य वाढते पण त्याचबरोबर उष्णतासुद्धा. अशा वेळी फुलझाडांच्या कुंड्यांऐवजी टांगती शिंकाळीच (हँगिंग बास्केट्स) तेथे छान शोभून दिसतात. बाल्कनीमध्ये कॅक्टस किंवा तत्सम काटेरी वनस्पती टाळाव्यात. कट्ट्यास बाहेरच्या अथवा आतल्या बाजूने तारांचे ब्रॅकेट लावून त्यात लहान शोभिवंत कुंड्या ठेवता येऊ शकतात. त्याचबरोबर बाल्कनीच्या आकाराचीच जाड तार बांधून त्यावर सुंदर असा कृष्णकमळाचा अथवा गोकर्णाचा वेल सोडला तर बाल्कनी भरून गेल्यासारखी वाटते.
हेही वाचा… प्रियंका चतुर्वेदी सुंदर आहेत म्हणून खासदार आहेत का?
वृक्षकुळातील वनस्पती शक्यतो कुंडीमध्ये लावू नयेत. मात्र, गृहसंकुलाच्या बागेमध्ये त्यांचा प्रवेश नक्की असेल. तर असा प्रयोग जरूर करावा. बाल्कनीत पडणारा पानांचा कचरा परत त्याच कुंडीमध्ये टाकावा त्यामुळे झाडांना खत तर मिळतेच, पण त्याचबरोबर पाण्याचीही बचत होते. बाल्कनीतील बागेसाठी सिव्हिल काम करू नये. योग्य झाडांची आणि कुंड्यांची निवड करण्यासाठी आता शहरातील मॉलमध्ये गार्डन सेंटर उपलब्ध आहेत, त्याचबरोबर रोपवाटिकासुद्धा. खरेदीसाठी योग्य मार्गदर्शन येथे सहज मिळू शकते. कुंड्यांना पाणी घालण्यासाठी लहान झारीचा वापर करावा, पण खालच्या मजल्यावरील लोकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी.
हेही वाचा… World Breastfeeding Week :स्तनपान का करावे ? स्तनपानाविषयीच्या सोप्या टीप्स जाणून घ्या…
आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी भिंतीवर मातीचे ओघळ घेऊन उतरते. पाणी शक्यतो सकाळी घालावे आणि तेसुद्धा मोजकेच. बाल्कनीमधील बगीचा आणि डासांची उत्पत्ती कमी करण्यासाठी तेथे तुळस, गवती चहा, जिरॅनियम अशा सुगंधी वनस्पतींच्या ३-४ कुंडय़ा जरूर ठेवाव्यात. झाडांवर रोग दिसल्यास ते पान अथवा फांदी त्वरित कापून बंद कचराकुंडीत टाकावी. कुंड्यांसाठी कुजलेले खत अथवा गांडूळखत उत्तम. घरच्या बागेत रासायनिक खते आणि कीटकनाशक अजिबात वापरू नयेत.