फर्न म्हणजे नेचे. वनस्पतीशास्त्राप्रमाणे टेरीडोफायटा या गटात मोडणारी, अपुष्प वनस्पतींच्या गटातली, पण तरीही अधिक सुधारीत अशा प्रकारातली वनस्पती. जंगलात सावलीच्या जागी वाढणारी, थंडाव्यासाठी आसुसलेली ही नेहमी सदाहरित आणि तजेलदार असते. घरातील कमी उन येणारा, थंड असा एखादा कोपरा शोधून जर नेचे वर्गीय वनस्पती लावल्या तर तिथली शोभा द्विगुणित होते.

अनेक गोष्टींशी आपल्या अनेक आठवणी निगडीत असतात. मग ते गाव असून दे, घर असू दे की एखादं झाड असू दे. नुसत्या आठवणीनेसुद्धा आपण त्यात हरवून जातो. मेडन हेअर फर्नची हिरवी गर्द पानं आणि काळीभोर दांडी बघितली की मला महाडचं घर आठवतं. थंडगार विहीर, त्या विहिरीच्या आतल्या बाजूला भिंतीवर वाढलेली ती नेच्याची झाडं, त्यांच्या लांब दांड्या आणि ती मिळवण्यासाठी केलेली धडपड. धडपड का, तर या इवल्या झाडापासून गुलाबाचे फूल करायचं. विहिरीवर वाकून, स्वतःला सांभाळत त्या काळ्या दांड्या खुडायच्या, फ्रॉकच्या घेरात जमा करायच्या आणि मग एकामागून एक पटापट दांडीच्या खालच्या बाजूने पानं खेचत वर जात मस्त फूल बनवायचं. आमच्या मैत्रीणींमधे स्पर्धाच लागायची त्याची. त्यावेळी ते एक सहज मिळणारं झाडं होतं. ते फर्न आहे. त्याची वेगळी वैशिष्ट्ये आहेत असं काही काही माहिती नव्हतं तेव्हा. एक मात्र होतं, त्याची पोपटी पानं आणि काळी दांडी आवडायची मात्र खूप.

आज नर्सरीमध्ये विकायला असलेल्या एडि एंटम, नेप्रोलेपिस, स्टेग हॉर्न, फिशटेल अशा फर्नच्या जाती जेव्हा पाहते तेव्हा नकळत मन लहानपणी रानात, पडक्या भिंतीवर, नारळाच्या खोबणीत वाढलेल्या झाडापाशी जाऊन पोहोचतं. फर्न म्हणजे नेचे. वनस्पतीशास्त्राप्रमाणे टेरीडोफायटा या गटात मोडणारी, अपुष्प वनस्पतींच्या गटातली, पण तरीही अधिक सुधारीत अशा प्रकारातली वनस्पती. जंगलात सावलीच्या जागी वाढणारी, थंडाव्यासाठी आसुसलेली ही नेहमी सदाहरित आणि तजेलदार असते. घरातील कमी उन येणारा, थंड असा एखादा कोपरा शोधून जर नेचे वर्गीय वनस्पती लावल्या तर तिथली शोभा द्विगुणित होते.

नेच्याचे बरेचसे प्रकार असून नेचे हे वाढवायला सोपे, कमी कटकटीचे आणि जास्त देखभाल करावी न लागणारे असे आहे. थोडक्या जागेत भरगच्च असा परिणाम साधायचा असेल तर फर्नची निवड करायलाच हवी. कुंडीत, शिंकाळ्यांमध्ये फर्न उत्तम वाढतात. त्यांची गर्द हिरवी किंवा पोपटीसर पानं बागेला एक वेगळाच लूक देतात. सभोवती नीट निरीक्षण केले तर फर्नच्या बऱ्याचशा जाती सहज सापडतात. विशेषतः पावसाळ्यात फर्न जागोजागी उगवलेली असतात. थोडीशी झाडी असलेला प्रदेश, जंगलाच्या सुरुवातीच्या भागात, डोंगरावर, कडे कपारीत, खडकांच्या बेचक्यात, आर्किड प्रमाणेच झाडावर वाढणारी अशी फर्न्स आपण सहजी पाहू शकतो. तुलनेने कमी सूर्य प्रकाशाची गरज, ओलावा आणि खडकाळ अशी जमीन इतकी माफक अपेक्षा असणारा हा वानस मित्र शोभेसाठी म्हणून विमानतळ, प्रदर्शनाची ठिकाणे, मोठी सभागृहे इथे हमखास वापरला जातो. विमानतळावर लावली जाणारी झाडं जर बघितली तर त्यात साठ टक्के झाडं ही नेचेवर्गीयच असतात.

त्यांच्या उठावदार आणि सुखावणारा रंगामुळे ती मनाला थंडावा आणि आनंद देतात. आपल्या बागेत थोडीतरी फर्न्स हवीतच. त्याशिवाय बाग पूर्णच होणार नाही. नेप्रोलेपिस, फॉक्स टेल, फॅन शेप, कांगारू अशा काही प्रकारातली फर्न्स थोडा शोध घेतला तर सभोवती सापडतील, पण एडिएंटम, स्टेगहार्न, क्रोकोडाईल, रॅबिट फुट यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण फर्न्स शोधून मिळवावी लागतील. त्यांची विशेष काळजीही घ्यावी लागेल. एकदा ती रूजली आणि उत्तम वाढीला लागली की मात्र ती अनेक वर्षे विना कष्ट वाढतच राहतात.

माझ्याकडे असंच एक फर्न होतं. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी गडद हिरवी पानं होती त्याला. त्याची देठं किंवा आपण फांद्या म्हणू हवं तर ही चमकदार काळी आणि अंगावर बारीक लव असलेली अशी होती. याची बरीच वाढ झाली होती, इतकी की हँगिंग बास्केटला पूर्णपणे त्याने वेढून टाकले होते. जुनी झाली म्हणून बास्केट बदलायला गेले तर ती बदलणं ही शक्य होतं नव्हतं. त्याला मिळालेलं रूपही इतकं देखणं होतं की काही बदल करावा असं वाटतच नव्हतं. एकदोन पुष्प प्रदर्शनात ती हँगिंग बास्केट मी तशीच वापरून त्यात पुष्प रचना केली आणि त्याला नाव दिलं नेचरस् बास्केट दोन्ही वेळा मला त्यासाठी पहिलं बक्षीससुद्धा मिळालं. हिरव्यागार नैसर्गिक पुष्प पात्रातील ती रचना सगळ्यांनाच फार आवडली होती. या अशा फर्नसच्या वेगवेगळ्या जाती,त्यांची वैशिष्ट्ये आपण पुढील लेखात सविस्तर पणे जाणून घेणार आहोतच, तोवर तुम्ही सुद्धा फर्नसचा थोडा शोध घेऊन ठेवा.
mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader