केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेसाठी उमेदवार फार सुरुवातीपासूनच प्रयत्न करत असतात. परीक्षेत उतीर्ण होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. इतर कोणत्याही क्षेत्रातील लोकांसाठी या परीक्षेची तयारी करणे आणि नंतर उर्त्तीण होणे खूप कठीण असते. पण, आज आम्ही तुम्हाला एका महिला IAS अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या करियरची सुरुवात एक अभिनेत्री म्हणून केली. पण, नंतर तिने UPSC सारख्या सर्वात कठीण परीक्षेत उर्त्तीण होऊन दाखवले.
अभिनेत्री झाली आयएएस अधिकारी
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या आयएएस एचएस कीर्तना यांची ही गोष्ट आहे. आयएएस अधिकारी होण्यापूर्वी त्यांनी चित्रपटांमध्येही यशस्वी कारकीर्द केली. असे असतानाही त्यांनी आपल्या जिद्दीने देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाल कलाकार म्हणून काम केलल्या एचएस कीर्तना यांना ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सहा प्रयत्न करावे लागले. पहिल्या पाच प्रयत्नांत त्या अपयशी ठरल्या, पण सहाव्यांदा त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्या या परीक्षेत यशस्वी झाल्या.
पाच अपयश पचवले अन् मेहनतीच्या जोरावर सहाव्या प्रयत्नात झाली यशस्वी
कीर्तना यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा UPSC CSE परीक्षा दिली, ज्यामध्ये त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. त्याच्या पुढच्या चार प्रयत्नांतही त्यांना यश आले नाही, पण त्यांनी धीर न सोडता मेहनत सुरूच ठेवली. अखेर २०२० मध्ये त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. याच मेहनतीच्या जोरावर त्या १६७ व्या रँकसह आयएएस अधिकारी बनल्या.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या एचएस कीर्तना आज आयएएस अधिकारी म्हणून देशाची सेवा करत आहेत. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली.
‘या’ मलिकांमध्ये केले बालकार म्हणून काम
पण, आयएएस अधिकारी होण्यापूर्वी एचएस कीर्तना यांनी कर्पुरडा गोम्बे, गंगा-यमुना, मुदिना आलिया, उपेंद्र, ए, कानूर हेग्गदती, सर्कल इन्स्पेक्टर, ओ मल्लीगे, लेडी कमिशनर, हब्बा, दोरे, सिंहाद्री, जननी, चिगुरु आणि यांसारख्या दैनंदिन मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. यानंतर त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रिय बालकलाकार बनल्या.
आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते केलं पूर्ण
डझनभर चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर कीर्तना यांना अभिनयासाठी अनेक ऑफर्स मिळाल्या, पण त्यांनी स्वत:ला ग्लॅमरस जगापासून दूर करत देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पाहणारे अनेक जण खूप मेहनत, प्रयत्न करूनही अपयशी ठरतात. यावेळी अनेक उमेदवार धैर्य गमावून बसतात, पण अभिनेत्री एचएस कीर्तना यांनी हिंमत न हारता प्रशासकीय सेवेत आपली कारकीर्द घडवली. त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले.
बालकलाकार ते आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, UPSC CSE ची तयारी सुरू करण्यापूर्वी, कीर्तना यांनी २०११ मध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा (KAS) परीक्षा दिली आणि यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली. ते क्लिअर केल्यानंतर त्यांनी दोन वर्षे KAS अधिकारी म्हणून काम केले आणि नंतर UPSC करण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली. मात्र, बालकलाकार ते आयएएस अधिकारी हा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. आपले स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि अखेर त्यांना यश मिळाले.