वर्षानुवर्षे मुलींना जगाची समज येण्याआधीच लग्नाच्या बंधनात अडकवले जायचे. बालविवाहाची प्रथा जरी बहुतांश ठिकाणी बंद झाली असली, तरीही राजस्थानच्या काही भागांमध्ये या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. समाजाच्या अशाच विचारांचा सामना रुपा यादव हिलादेखील करावा लागला होता. आयुष्यात कोणत्याही गोष्टींची थोडीफारदेखील समज येण्याआधीच, आठ वर्षांच्या कोवळ्या वयातील रुपाचे लग्न लावून देण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमधील करीरी या एका छोटाश्या गावातील बालवधू बनलेल्या रुपाने मात्र आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यात असंख्य अडथळ्यांचा सामना केला आहे. प्रत्येक अडचणींवर मात करून अखेरीस रुपा एक यशस्वी डॉक्टर बनली. कोण आहे रुपा यादव आणि काय होता तिचा डॉक्टर बनण्याचा प्रवास पाहू.

डॉक्टर रुपा यादवचा खडतर प्रवास

राजस्थानमध्ये गौना परंपरेनंतरच लहान वयात लग्न झालेली वधू सासरी संसार थाटण्यासाठी जाते. ही त्या जोडप्यांसाठी आयुष्याची नवी सुरुवात असली, तरीही मुलींच्या मनात असणाऱ्या स्वप्नांचा शेवट असतो. मात्र, रुपाच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी होती. रुपाने तिच्या कुटुंबीयांच्या, खास करून तिच्या मेव्हण्याच्या पाठिंब्याने आपले शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा : Sara Milliken : “सौंदर्य हे प्रत्येक आकारात, रंग-रूपात…” प्लस साईज मॉडेलचे ट्रोलर्सना चोख उत्तर!

घरच्यांचा पाठिंबा असला तरीही रुपाला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. आर्थिक समस्या डोक्यावर असताना, समाज आणि त्यांच्या विचित्र नजरांचादेखील रुपाला आणि तिच्या कुटुंबीयांना सामना करावा लागत होता.

आपले शिक्षण पूर्ण करत असताना रुपाने मातृत्वाचादेखील स्वीकार केला होता. कष्टदायी आणि अत्यंत त्रासदायक गरोदरपणात तिने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. इतक्या गंभीर समस्यांचादेखील रुपाने हसून सामना केला. कोणतीही गोष्ट तिला तिच्या स्वप्नपूर्तीपासून रोखू शकणार नव्हती, याची प्रचिती २०१७ च्या NEET परीक्षेत आली. रुपा यादवने २०१७ साली NEET राष्ट्रीय पात्रता / प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली होती. केवळ दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश प्राप्त केले होते.

रुपाने, तिच्या दहावी आणि बारावीच्या वर्गात तब्ब्ल ८४ टक्के इतके गुण प्राप्त केले होते. त्यानंतर रुपाने बीएससीसाठी प्रवेश घेतला. B.sc च्या जोडीने रुपाने AIPMT या स्पर्धा परीक्षेत भाग घेतला. या परीक्षेत तिला अखिल भारतीय २३,००० क्रमांक मिळाला होता.

“मला एका चांगल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यात जरी यश मिळाले नसले, तरीही AIPMT मध्ये मिळवलेल्या उत्तम गुणांमुळे माझ्या पती आणि मेहुण्यानी मला कोटामध्ये एमबीबीएसच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी जाण्यास प्रोत्साहन दिले”, असे रुपाने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले असल्याचे इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : शेतकऱ्याची लेक, अकरावीत अनुत्तीर्ण; मात्र MPPSC परीक्षेत जिद्दीमुळे पटकावला ६ वा क्रमांक! पाहा तिचा प्रवास…

तिसरीत शिकणारी रुपा आणि तिची बहीण रुक्मा यांचे लग्न अनुक्रमे, १२ वर्षांच्या शंकरलाल आणि त्याच्या मोठ्या भावाशी लावून देण्यात आले होते.

रुपाचा मेहुणा आणि तिचा नवरा हे दोघेही शेती करत असे. शेती करत त्यांनी रुपाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले; वेळ पडेल तेव्हा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी रिक्षा चालवली. गावकऱ्यांच्या टोमण्यांना, वाईटसाईट बोलण्याकडे लक्ष न देता हे सर्व त्यांनी केले.

नवरा, मेहुणा, कुटुंबाच्या उत्तम साथीने आणि अर्थात स्वतःच्या महेनतीने आज रुपा यादव ही एक यशस्वी डॉक्टर बनली आहे. तिचा हा प्रवास प्रत्येक कुटुंबाला आणि व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे.

रुपा आणि तिच्या कौतुकास्पद कुटुंबामुळेच अनेकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मेहेनत करण्यासाठी बळ मिळत असते. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफाट परिश्रम आणि निरनिराळ्या अडथळ्यांना, संकटांना सामोरे जावेच लागते. मात्र, ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी हिंमत, चिकाटी, जिद्द आणि परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child bride rupa yadav worked hard and achieved her dream of being a doctor check out her inspiring journey in marathi chdc dha