“ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद, आज तुमच्यामुळे माझी मुलगी पुन्हा माणसात आली. आज ती घरात खळखळून हसली. तिचं रुटीन सुरू झालं. तिच्याकडे पाहून आज मला खूप आनंद झाला. ज्या दिवशी तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, त्या दिवशी मी मनातून हललो होतो. माझी लाडकी लेक माझ्यापासून दूर जाणार, या विचारानं मी आतून संपलो होतो, पण दैवदयेने ती वाचली. माझी कियारा मला परत मिळाली.”
“तिनं असं का केलं? तिला स्वतःचं आयुष्य संपवावं असं का वाटलं? याबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न आणि शंका होत्या. पण तिला मी काहीही विचारलं नाही, ती स्वतःहून बोलेल असं वाटलं, पण ती काहीच बोलली नाही. स्वतःचा जीव वाचला त्याचा तिला आनंद आहे की दुःख आहे हेही कळतं नव्हतं म्हणूनच मी तिला घेऊन तुमच्याकडं आलो. तुमच्याशी ती मनमोकळं बोलली, तेव्हा तुम्ही तिला काय समजावून सांगितलं माहीत नाही पण तेव्हापासून तिच्या वागण्यात बदल होऊ लागलाय. तिचं स्वतःच्या कोषात राहणं कमी झालं. हळूहळू घरात सर्वांशी ती बोलू लागली. तिच्या भावाशी आज ती धमाल करताना अगदी नॉर्मल वागत होती. तिच्या वागण्यात बदल झालाय. तिला जे काही तुम्ही समजावून सांगितलं त्याबाबत मनापासून धन्यवाद. पण आम्ही दोघं आज वेगळ्या कारणासाठी तुमच्याकडं आलो आहोत.”
“ताई, मला सांगा, आमचं कुठं चुकलं? आम्ही आईवडील म्हणून कुठं कमी पडलो म्हणून कियाराला हे कृत्य करावंसं वाटलं?” कार्तिक आणि यामिनी दोघेही सुनीतीताईंकडे आले होते. आपल्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला हे सत्य पचवणं त्यांना आवघड जातं होतं. सुनीतीताईंनाही त्यांच्याशी बोलयचंच होतं, पण ते दोघेही स्वतःहून हे विचारायला आले म्हणून त्यांनाही बरं वाटलं. त्यांनी दोघांशी बोलायला सुरुवात केली.
“कार्तिक आणि यामिनी, तुम्ही दोघांनीही अत्यंत कष्ट आणि मेहनत घेऊन मुलांना वाढवलं. स्वतःच्या हौसेमौजेला मुरड घालून मुलांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेतलीत. त्यांना हव्या त्या गोष्टी त्यांनी न मागताही त्यांच्यासमोर हजर करीत राहिलात. त्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आटोकाट प्रयत्न केलेत, पण मुलांना नक्की काय हवं असतं? त्यांच्या मनात काय चालू असतं? याचा विचार केला नाहीत. आपण करतो ते सर्व चांगलंच आणि मुलांच्याही चांगल्यासाठीच आहे याच विचारात तुम्ही होतात. आपलं काही चुकत असेल हा विचारही तुम्ही कधी केला नाहीत. ही महत्वाची चूक पालकांकडून होते. आपण सांगतो ते मुलांनी ऐकलंच पाहिजे यासाठी तुम्हीही अट्टाहास करत राहिलात. कधी धाक दाखवून तर कधी इमोशनल ब्लॅकमेल करून.’ तू हे ऐकलंस तरच तुला नवीन मोबाईल मिळेल, असं केलं नाहीस तर या वेळेस लॅपटॉप मिळणार नाही, एवढे मार्क मिळाले तरच बाईक मिळेल,’ असं केल्यामुळे मुलांना त्यांची निर्णयक्षमता वापरता येत नाही. आईवडील म्हणतील तसंच वागायचं ही सवय त्यांना लागली आहे. कियारा आत्तापर्यंत तुमच्या छत्रछायेत होती, आता शिक्षणाच्या निमित्तानं तिला एकटं हॉस्टेलवर राहावं लागलं. अनेक निर्णय स्वतःचे स्वतः घ्यावे लागले त्यामध्ये मिळालेलं अपयश ती पचवू शकली नाही. मी सर्वांपेक्षा मागे पडत आहे, मी यांच्यासारखी हुशार कधीच होऊ शकणार नाही या विचारांमुळे ती नैराश्यात गेली आणि या भावनांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य तिच्याकडं नसल्यानं तिनं हे कृत्य केलं होतं. आता ती व्यवस्थित आहे, पण तुम्ही दोघांनीही तुमच्या वागण्यात बदल करायला हवा.”
हेही वाचा – स्त्री आरोग्य: उपवास करताय? करा, पण आरोग्य सांभाळून…
“प्रत्येक वेळी मुलांना बंधनं घालून चालत नाही, त्यांच्या वैचारिक शक्तीला, निर्णयशक्तीला चालना देणं महत्वाचं असतं. फक्त कधी कधी पोषक पालक होतानाही मुलांना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं तर मुलांवर काहीच बंधन राहात नाहीत त्यामुळे मुलांना शिस्त लावताना कधी कन्ट्रोलिंग पॅरेंट तर कधी नर्चरिंग पॅरेंट व्हावं लागतं फक्त कोणता रोल कधी करायचा ते ठरवावं लागतं. आपल्या आयुष्यातही असं शिफ्टिंग महत्वाचं असतं. कोणत्याही नात्यामध्ये बंधनंही चांगली नाहीत आणि काहीच न बोलता जे आहे जसं आहे तसं चालू ठेवणंही चांगलं नाही. सुवर्णमध्य साधता यायला हवा.” सुनीतीताई आयुष्यातील फक्त पालकत्वाबाबतच नाही तर नात्यातील व्यवहाराबद्दलही बोलत होत्या. कार्तिक आणि यामिनीला कियाराच्या बाबतीत आपलं काय चुकलं ते समजलं, तसंच सुनीतीताईंकडून यापुढं तिच्याशी कसं वागायचं याचे धडेही मिळाले.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)