– स्मिता जोशी

“वैदेही, तुझ्या राजूने आमच्या सोनूला मारले आहे. खेळताना मुले दंगा करतात, आपण दुर्लक्ष करतो, पण हल्ली त्याचं हे वागणं वाढत चाललंय. परवा शेजारच्या मन्यालाही त्याने यापेक्षा जास्त मारले होते. जरा लक्ष ठेव त्याच्याकडे. अशाच लहानसहान गोष्टींतून मुलं गुन्हेगारीकडे वळतात…”

“काकू, अहो, काहीतरीच काय बोलताय? तो लहान आहे अजून. त्याला काही कळत नाहीये आणि त्याचा संबंध तुम्ही कुठेही जोडताय.” “लहान वयातच मुलं हे शिकतात. तुला राग येत असेल तर मी सांगणं बंद करते, पण तू किती जणांना गप्प बसवणार आहेस? सोसायटीतील सर्वांच्या राजूबद्दल तक्रारी आहेत. रोजच तो काहीतरी उद्योग करत असतो. बापाविना पोर वाढतंय. त्याला बापाच्या धाकाचीही गरज आहे, असं सोसायटीतील लोक म्हणतात…”

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे

“सोसायटीतील लोकांना माझ्याकडे येऊ देत. मग मी त्यांना उत्तर देईन काकू… आणि माझ्या मुलाचं मी पाहून घेईन. तुम्ही कुणीही लक्ष घालण्याची गरज नाहीये. मी हात जोडते. तुम्ही निघा आता.” “हो निघालेच आहे. तुझ्याकडे मुक्कामाला आलेली नाहीये! ज्याचं करावं बरं, तो म्हणतो माझंच खरं! तू आणि तुझा मुलगा काय वाट्टेल ते करा.” जानकीकाकू बडबड करत वैदेहीच्या घरातून बाहेर पडल्या आणि तिनं धाडकन दार लावून घेतलं.

हेही वाचा – गच्चीवरची बाग: गरजेचे नैसर्गिक घटक…

“नसत्या उचापती करायला यांना सांगत कोण?… दुसऱ्यांच्या घरात डोकवायची सवयच लागली आहे यांना. बापाचा धाक पाहिजे म्हणे. का? आई का नाही सगळं करू शकत?” वैदेही स्वगतच बोलत होती. स्वतःशी बडबड करत एकीकडे तिचं खोली आवरणं चालू होतं. तिनं राजूला आवाज दिला, “राजू इकडे ये.”

तिनं तीन-चार हाक मारूनही राजू आला नाही म्हणून ती त्याला शोधू लागली. तर हॉलमध्ये राजू हातात मोबाईल घेऊन कार्टून बघत होता. तिनं पुन्हा आवाज दिला, तरीही तो जागचा हलला नाही. तिला अतिशय राग आला आणि तिनं त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्याच्या हातातून मोबाईल घेतल्यामुळे तो खूप चिडला. त्यानं टेबलावरील वस्तू खाली फेकून देण्यास सुरुवात केली आणि टेबलावरचा तांब्या वैदेहीच्या दिशेनं फेकून मारला. नशीब, त्याचा नेम चुकला. नाहीतर तिच्या कपाळाला जबरदस्त लागलं असतं. आता तर वैदेही खूपच चिडली. तिनं त्याला चांगलाच धपाटा मारला. शेवटी आजीमध्ये आली आणि तिनं राजूची सुटका करून दिली. आजीनं वैदेहीलाही आवरलं. तिला शांत केले.

“वैदेही, शांत हो. मुलांवर असा राग काढणं योग्य नाही.” “आजी, तू पाहिलंस ना, तो कसा वागला? मला मारायला निघाला… त्यानं किती आकाडतांडव केला. शेवटी हाही त्याच्या बापासारखाच तडकू निघाला. परिणामांचा कोणताही विचार न करता स्वतःचा हेका पूर्ण करणारा.” वैदेही आता रागात आहे आणि तिचा नवरा-विनयबद्दलचा तिचा राग अगदी उफाळून बाहेर येत आहे, हे आजीच्या लक्षात येत होतं.

हेही वाचा – नातेसंबंध: बॉयफ्रेंड ‘ममाज बॉय’ आहे का?

“वैदेही, राजूवर राग काढून काही उपयोग आहे का? तो असा का वागतोय, हे शोधण्याचा प्रयत्न कर. तुमच्या नवरा बायकोमध्ये वाद झालेत म्हणून तू माहेरी निघून आलीस, पण त्याला त्याच्या बाबांचीपण सवय आहे, त्याचाही सहवास त्याला हवासा आहे. ‘बाबा पाहिजे’ असं तो घरात बोलूही शकत नाही, कारण बाबांचे नाव घेतले की आई चिडते हे त्याला माहिती आहे. काय करावं, कसं वागावं हे त्यालाही कळत नाही. अनेक विचारांचे काहूर त्याच्या मनातही आहे. एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं, या नैसर्गिक भावना आहेत. त्याच्या भोळभाबड्या जगातसुद्धा काळज्या आहेत, ताणतणाव आहेत. म्हणून तो मोबाईलच्या कल्पनाविश्वात रमतो. त्याला नक्की काय हवंय हे तू त्याला जवळ घेऊन विचारलंस? त्यालाही बाबांची आठवण येत असेल, याचा विचार कधी केलास?… वैदेही, त्याला तुझा आणि त्याच्या बाबाचाही सहवास हवाय हे मी सांगू शकते, कारण मी पाहिलंय, की शेजारची सोनू जेव्हा आईबाबांबरोबर स्कूटरवरून बाहेर जाते, तेव्हा राजू एकटक त्यांच्याकडे पाहात असतो. तो शेजारचा छोटा मन्या बाबांशी खेळत असतो, तेव्हासुद्धा दुरून बघत उभा राहतो. मग नंतर त्याची चिडचिड सुरू होते. आता त्याचं रागात रुपांतर होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तो रागावून मारामारी करायला लागला आहे. त्याच्या मानसिकतेचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे.”

आजीच्या या सांगण्यावर वैदेही विचार करत होती. तिला माहिती होतं, की राजू रोज विनय ऑफिसमधून येण्याची वाट बघायचा, बाबा आल्यावर किमान तासभर त्याच्याशी दंगा-मस्ती करायचा, रात्री झोपतानाही त्याला बाबा लागायचा. पण विनयच्या शीघ्रकोपी स्वभावाचा वैदेहीला त्रास झाल्यामुळे ती त्याचं घर सोडून माहेरी निघून आली होती.

हेही वाचा – आहारवेद : रक्तवर्धक बीट

‘मला विनय नवरा म्हणून नको असला, तरी राजूला तो बाप म्हणून हवा असेल याचा विचारही मी केला नाही… मी माझं दुःख कुरवाळत बसले, पण त्या लहानग्याच्या मनात काय चाललं असेल, याचा विचारही केलेला नाही. त्याच्यावर खरोखरच मी अन्याय केला आहे.’ वैदेही विचार करू लागली. “आजी, तू म्हणतेस ते बरोबर आहे, राजू त्याच्या बाबापासून दूर झाल्यानंतर असा वागू लागला आहे. त्यालाही त्याचा बाबा हवाय, पण मी येथे आल्यापासून त्याला बाबाला भेटू दिलं नाहीये. विनयने किती वेळा मला फोन केले. त्यालाही राजूला भेटायचं आहे, पण मला त्याचा खूप राग आल्यामुळे मीच त्याला भेटू दिलेलं नाही.”

“वैदेही, संसार करताना या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणारच आहेत. पण त्यासाठी टोकाची भूमिका घेण्याची घाई कशाला करायची? त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा. तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यावर केवळ तुमचं नव्हे, तर राजूचं भविष्यही अवलंबून आहे. मुलांना या वयात आई-वडील दोघांच्याही सहवासाची भूक असते. स्पर्शाची गरज असते. दोघांकडून मिळणारं संरक्षणही आवश्यक असतं. आपल्यासोबत आपले आईबाबा आहेत यात मिळणारा आनंद त्यांना व्यक्त करता येत नाही आणि दोघांपैकी एक नसेल तर होणारे दुःख, नाराजीही त्यांना व्यक्त करता येत नाही. कधी कधी मुले अंथरूण ओलं करतात, नखं खातात, खोटं बोलायला लागतात, मारामारी करायला लागतात. आपल्या कृतीचा अर्थ त्यांना कळत नाही, पण ते मनातून अस्वस्थ झालेले असतात. काही मुलं अकाली प्रौढ होतात, मोठ्या आणि जबाबदार माणसासारखं वागायला लागतात. त्यांचं बालपण हरवून जातं. मुलांच्या कृतीतून पालकांनी त्यांचं मन वाचायला शिकायला हवं.”

आजीच्या म्हणण्यावर वैदेही विचार करू लागली. राजूच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा ती प्रयत्न करीत होती. त्याला त्याचं आनंदी बालपण मिळावं म्हणून आपला अहंकार सोडायला हवा, हे तिच्या लक्षात आलं आणि येत्या रविवारी विनयने राजूला भेटायला यावं, असा तिनं विनयला मेसेज केला. नातीचं मन आजीनं वाचलं होतं. ती शांत झालेली पाहून आजीलाही बर वाटलं. आजीनं तिच्या केसांवरून हात फिरवला. आजीचा तो स्पर्श तिला हवासा वाटला. आजीनं तिला जवळ घेतलं आणि वैदेहीनं स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.


smitajoshi606@gmail.com

Story img Loader