कायदा हा समाजाकरताच असल्याने सर्व महत्त्वाच्या सामाजिक बाबींकरिता कायदेशीर तरतुदी आहेत. विवाह, वारसा हक्क यांचा त्यातच सामावेश होतो. कोणते विवाह ‘वैध’ कोणते ‘अवैध’ यासंदर्भात सुस्पष्ट कायदेशीर तरतुदी हिंदू विवाह कायद्यात आहेत. यापैकीच महत्त्वाची तरतूद म्हणजे ‘व्हॉईड मॅरेज’ अर्थात ‘निरर्थक विवाहा’ची. जे विवाह कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहेत, त्यांना निरर्थक विवाह असे संबोधण्यात येते. जोवर पती-पत्नी दोघेच असतात, तेव्हा लग्न कायद्याने निरर्थक ठरले तर गोष्टी तुलनेने सोप्या असतात, मात्र अशा विवाहातून अपत्य जन्मल्यास त्या बाळाच्या हक्कांचे काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्मदात्यांचा विवाह वैध किंवा अवैध-निरर्थक ठरणे, यात त्या अपत्याचा काहीही दोष नसतो. म्हणूनच अशा अपत्यांच्या हक्काबाबतदेखील स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या आहेत. हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६ अनुसार अशा अपत्यांना कोणत्याही वैध लग्नाच्या अपत्याप्रमाणेच औरस समजण्यात येते आणि त्यांना सर्व हक्क मिळतात- ज्यात पालकांच्या मालमत्तेत हक्काचादेखील सामावेश आहे.

हेही वाचा… टेनिसमधील नवी चॅम्पियन: ‘यूएस ओपन’ विजेती कोको गॉफ

अशा विवाहातील अपत्यांना पालकांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेत हक्क मिळतो, त्याचप्रमाणे पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतदेखील हक्क मिळतो का? हा प्रश्न अनेकानेक प्रकरणांमध्ये उपस्थित होत होता. या बाबतीत ठोस कायदेशीर तरतूद नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा विषय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केला होता. या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने नोंदवलेली निरीक्षणे आपण पाहू या-

१. निरर्थक विवाहातून जन्मलेले अपत्य हे हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम ३ मधील व्याख्येनुसारदेखील औरसच ठरेल, त्याला अनौरस म्हणता येणार नाही.

२. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम ६ नुसार एकत्र हिंदु कुटुंबातील प्रत्येक सदस्यास कौटुंबिक मालमत्तेत हक्क आणि हिस्सा आहे.

३. साहजिकच निरर्थक विवाहाच्या अपत्याला, त्याच्या पालकांना जो हक्क व हिस्सा मिळाला असता, तो किंवा त्यातील हक्क व हिस्सा मिळेल.

निरीक्षणे या खंडपीठाने नोंदविली आणि निरर्थक विवाहातून जन्मलेल्या अपत्यांना पालकांच्या स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेत हक्क आणि हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा केला.

हेही वाचा… … आणि दाढदुखी थांबली

अशा विवाहांतून जन्मलेल्या अपत्यांना आता त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतदेखील हक्क मागता येणार असल्याने त्यांच्याकरिता हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. या निकालाचा फायदा घेऊन अशा अनेक अपत्यांना आपला न्याय्य हक्क व हिस्सा मिळवता येण्याची शक्यता आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children who are from void voidable marriages have rights to claim parents properties dvr
Show comments