नीलिमा किराणे
पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट, जेव्हा प्रवासासाठी लाल एसटीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एक किर्रर्र अंधारी रात्र. बहुधा अमावास्या असावी. मिट्ट काळोख. एका छोट्याशा खेड्यातल्या शेतातून आम्ही चार-पाच मित्र-मैत्रिणी गावातल्या एका मित्राला भेटायला चाललो होतो. प्रयोगशील शेती करण्यासाठी गावी परत आलेल्या आमच्या या मित्राला अलीकडेच काही जण भेटून आले होते. ‘अरे, माळरानावर जंगलच वाढवलंय त्यानं’, ‘गावातल्या मुलांसाठी तंत्रशिक्षण विद्यालय काढलंय’ अशी भारावलेली वर्णनं ऐकल्यानंतर अपार उत्सुकतेनं आम्ही त्याला भेटायला निघालो होतो. फोन करून रस्ता, गाड्या विचारून घेतलेलं. ‘दिवसाउजेडी पोहोचा’, त्यानं बजावलं होतं. मात्र त्याच्या तंत्रशिक्षण विद्यालयाच्या पाटीपाशी आम्हाला उतरवून रडतखडत चालणारी लाल एसटी पुढे निघून गेली तेव्हा चांगलीच रात्र झाली होती…
आणखी वाचा : हम काले है तो क्या हुआ!
एसटीचे दिवे दिसेनासे झाल्यावर फक्त घनघोर काळोख आणि रातकिडयांची किरकिर उरली. वीजही गेली असावी, मिणमिणता दिवासुद्धा कुठे दिसेना. घर कुठे आहे? अंतर किती आहे? पत्ता नाही. त्या पाटीपासूनची पायवाट धरून आम्ही निघालो. ‘जंगल वाढवलंय, म्हणजे सापकाटा असणारच. पाठीवरच्या सॅक सावरत, आजूबाजूच्या झाडांच्या फांद्यांना स्पर्शपण होऊ न देता जपून चालत होतो. तर एकाला जीपच्या टायरच्या खुणा दिसल्या. ‘त्याचीच जीप असणार. हा टायरट्रॅक घरापर्यंत नेईल’ अशा अंदाजाने, एकमेव लुकलुकत्या टॉर्चच्या प्रकाशात, एकमेकांच्या हाताला, खांद्याला धरून, आम्ही ट्रॅकवर चालू लागलो. तशात टिटवीचा कर्कश्श आवाज आभाळभर घुमला आणि घाबरून एक जण बरळला, ‘बाप रे! वाघरंही असतील का रे? किंवा कोल्हे?’ जाम टरकलो. आणखीनच दबकत चालू लागलो. अचानक समोर एक कंदील उगवला आणि ‘या, पोचलात एकदाचे! तुमच्याच काळजीत होतो.’ असा मित्राचा खणखणीत आवाज ऐकू आला. ‘हुश्श!’ मग जेवण, जेमतेम गप्पा आणि गाढ, गाढ झोप.
आणखी वाचा : Open Letter: अहो गृहमंत्री, लक्ष कुठे देणार? दीपिकाच्या कपड्यांकडे की हुंडाबळींच्या मोठ्या संख्येकडे?
सकाळी उठलो तेव्हा लख्ख उजाडलं होतं. मित्राचं जंगल पाहण्यासाठी अंगणात आलो, तर…!
मुख्य डांबरी रस्त्यावरच्या, बसने आम्हाला तिथं सोडलं होतं, त्या पाटीपासून घरापर्यंत फक्त मोकळं माळरान पसरलेलं होतं. एकही झाड नव्हतं. मित्राच्या घराशेजारीच काय ती पाच-दहा झाडं आणि भाज्यांचे वाफे होते. आम्ही वेडे होऊन पाहतच राहिलो. पाठीवरच्या सॅक सांभाळत, एकमेकांचे हात घट्ट धरून, टॉर्चच्या एवढ्याशा प्रकाशात, ट्रॅक पकडून, मोकळ्या माळरानावर दबकत दबकत चालणाऱ्या आमचा, कुणीच शूट न केलेला काल रात्रीचा सीन डोळ्यांसमोर आला आणि एकच शब्द शिवीसारखा उमटला. ‘बाऽवळट’! सगळे धो धो हसत सुटलो.
आणखी वाचा : open letter : राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजींना अनावृत पत्र… आम्ही ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या लेकी!
एवढा घोर बावळटपणा कशामुळे झाला असेल? मित्राच्या अद्भुत शेताच्या स्वप्नाळू अपेक्षेत मन असताना, अनोळखी गावातली, निर्मनुष्य, किर्रर्र अंधारी रात्र अनपेक्षितपणे समोर आली आणि कल्पनेपलीकडची भीती वाटली. त्यात सापकाटा, वाघरू, कोल्ह्याची ऐकीव भीती मिसळली आणि तारतम्य म्हणजे लॉजिक सुटलं. मित्राच्या शेताच्या ऐकीव माहितीतला ‘जंगल’ हा शब्द आम्ही शब्दश: घेतला आणि एसटीतून उतरल्या क्षणापासून प्रत्येक जण आपापल्या काल्पनिक जंगलातून भीत भीत सावधपणे चालू लागला. मित्रानं वाढवलेली झाडी, शेती पण प्रत्यक्षात होती, पण आम्ही आलो त्या माळरानाच्या रिकाम्या पट्ट्यानंतर मित्राचं घर आणि त्याच्यापुढे ते जंगल होतं. कारण रस्त्यालगतचा तो रिकामा पहिला पट्टा मित्राच्या मालकीचा नव्हता.
आजही कशाची अनावर भीती वाटते आणि चित्रविचित्र शक्यता मनाला आणखी घाबरवून सोडतात, तेव्हा अंधाऱ्या रात्रीतल्या त्या शेतवाटेवरचा, कुणीच शूट न केलेला आमचा विनोदी सीन डोळ्यांसमोर येतो. त्या अनावर भीतीला अडवतो. तेव्हाच्या बावळटपणाची आठवण करून देतो आणि विचारतो, ‘ठरव, तेव्हासारखं पॅनिक होऊन, कल्पनेनं आपणच काही तरी ठरवून गोष्टींचं भयंकरीकरण करायचंय की लॉजिक जागं ठेवायचंय? हा चॉइस तुझ्याकडेच आहे.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com