“मॅडम, मी एक स्टडी रिपोर्ट पूर्ण केलाय, पण फायनल करण्यापूर्वी तुम्ही एकदा नजर टाकावी असं वाटतंय. उद्या संध्याकाळी तुमच्याकडे येऊ का?” सायलीच्या या मेसेजवर ‘जरूर ये’ असं हेमाताईंचं उत्तर लगेचच आलं.
हेमाताई सायलीच्या सीनियर ऑफिसर. सहा महिन्यांपूर्वी रिटायर झाल्या होत्या. अतिशय बुद्धिमान, परफेक्शनिस्ट आणि परखड म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. मात्र कामासाठी दरारा असला तरी एरवीचं वागणं हसतखेळत असायचं. त्या सायलीच्या आदर्श होत्या. सायलीच्या मनापासून आणि समजून काम करण्याचं हेमाताईंना कौतुक होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : झोपू आनंदे : घोरणे

ठरल्याप्रमाणे सायली ड्राफ्ट रिपोर्टचं बाड घेऊन गेली. स्क्रीनवर पाहण्यापेक्षा हेमाताईंना कागदावर दुरुस्त्या-सूचना करायला आवडतं हे तिला माहीत होतं. चहा-पाणी झाल्यावर सायलीने रिपोर्टची कॉपी हेमाताईंच्या हातात दिली. त्यांनी विषय नीट पाहिला, अनुक्रमणिकेवर नजर टाकली, महत्त्वाच्या चॅप्टर्सची काही पानं वेगानं चाळली आणि काहीच न बोलता रिपोर्ट बाजूला ठेवून इकडच्या तिकडच्या गप्पा चालू केल्या. “रिपोर्ट कसा झालाय? काही चुकलंय का?” सायलीनं न राहवून विचारलं.

आणखी वाचा : आला ‘सनस्क्रीन’चा मोसम! या टिप्स वाचाच!

ताई हसल्या. “मला या रिपोर्टबद्दल काही मतही व्यक्त करावंसं वाटलं नाही, इतकं तू वाईट काम केलं आहेस आणि तुलाही ते माहीत आहे. हो ना?” सायली गप्प बसली. “मग तरीही मला हा रिपोर्ट दाखवावा असं तुला का वाटलं? हे काम तू केलंयस असं मला दुसऱ्या कुणी सांगितलं असतं तर मी विश्वासही ठेवला नसता.” यावर मात्र सायली एकदम वैतागली. “मग काय करू मॅम? नवीन बॉसला कशाचंच काही नसतं. त्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या टोळक्यासमोर बढाया मारत बसण्यातच त्यांना इंट्रेस्ट आहे. कुणाला पडलेलीच नाहीये कामाची. मी किती जीव ओतून काम करते त्याचं काहीच नाही. ‘लवकर संपव’ म्हणून मागे लागतील, पण दिल्यानंतर वाचतात की नाही देव जाणे. माझ्याकडून मागच्या रिपोर्टमध्ये एक मोठी लॉजिकल चूक झाली होती. कुणाच्याच लक्षात आली नाही. शुद्धलेखनाच्या चुका काढतील; शब्द, वाक्यरचना बदलतील, पण मुद्द्यांकडे लक्षही नाही. या रिपोर्ट रिपोर्ट खेळण्याचा मला कंटाळा आलाय. अर्थच वाटत नाहीये कशात. तुम्हाला मिस करते मी.”

आणखी वाचा : आहारवेद: नियमित ताक प्या, व्याधिमुक्त व्हा!

“म्हणून तू मला हे दाखवायला आलीस? फालतू झालंय हे मी सांगावं म्हणून?”
“माहीत नाही. असेलही. मला समजत नाहीये. एका रिपोर्टच्या वेळी पुनःपुन्हा करेक्शन्स काढत होते, तर साहेबांचा पीए म्हणाला, “सर तर बघतही नाहीत. तुम्हीच कीस पाडत बसता मॅडम.” अशा वातावरणात काम करण्याचा उत्साहच संपतो. म्हणून आले असेन कदाचित. मन मोकळं करायला.”
हेमाताई म्हणाल्या, “म्हणजे बॉस माझ्यासारखा किंवा तुला पटणारा असेल तरच तू मनापासून काम करणार का? नाही तर कसं तरी उरकणार? इतकं नकोसं होतंय तर जॉब सोडून दे ना.”

“जॉब कसा सोडणार? खायचं काय मग?”
“मग नीट कर काम. तू नेहमी करतेस तसं.”
“पण वरचे लोक असं बेजबाबदारपणे वागतातच का? त्यामुळे कशातच अर्थ वाटत नाही ना?”
“तू काम कंपनीसाठी करतेस ना? बॉससाठी नाही. वैताग येणं स्वाभाविक आहे सायली; पण माणसांचे स्वभाव किंवा सिस्टीम बदलणं आपल्या हातात नसतं. मला सांग, या रिपोर्टखाली तू स्वत:ची सही करू शकतेस का?”
“अं.. नाही करू शकत.” सायली अडखळत, शरमून म्हणाली.

“याचा अर्थ, तू स्वत:साठीही काम करतेस. तुझ्या सहीला तुझ्यासाठी अर्थ आहे. त्यात तुझा सेल्फ रिस्पेक्ट आहे. हो ना? आपला अर्थ आपल्यापाशी असतो सायली. त्यामुळे, बॉसवर चिडचिड करून आपणही निरर्थक काम करायचं? की स्वत:च्या सहीला अर्थ द्यायचा? हा चॉइस तर तुझ्याकडेच आहे ना?”
सायलीनं रिपोर्ट बॅगेत कोंबला. निघताना खाली वाकून हेमाताईंना नमस्कार केला. तिच्या मनातला गोंधळ आणि चिडचिड संपली होती.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choice is ours what does your signature bears importance vp