-नीलिमा किराणे

शमिका आज लवकर घरी आलेली पाहून अरुणाताई गालातल्या गालात हसल्या. सकाळी अक्षय-शमिकाची वादावादी त्यांनी पाहिली होती, पण लेकीकडे चार दिवसांसाठी आलेल्या त्या कूल मॉम कूल सासू असल्यामुळे मध्ये पडल्या नव्हत्या.

अक्षय आणि शमिकाच्या लग्नाला सहा महिने झाले होते. नव्या नवलाईच्या मोडमधून वास्तवात यायला सुरुवात झाली होती. शमिकाचं स्वत:चं बुटीक होतं आणि अक्षय एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर. त्याला खाण्यापिण्याची आवड, सुदृढ बालक जणू तर शमिका फिटनेसची वेडी. गेल्या महिन्याभरापासून तिला आपलं वजन वाढत चालल्याचं जाणवून त्रास होत होता. एके दिवशी तिने ‘उद्यापासून दोघांनीही सकाळी रनिंग सुरू करायचं आणि डाएट डबेच ऑफिसला न्यायचे,’ असं जाहीर करून तशी सुरुवातही केली. नव्या नवलाईच्या या दिवसांत अक्षयला शमिकाचं सगळंच आवडत होतं. त्यामुळे हा हेल्दी बदल त्याला आवडला. मात्र थोड्या दिवसांनी सकाळचं फिरायला जाणं एक दिवसाआड, दोन दिवसाआड असं कमी होत गेलं. ‘नको ना थंडीत पळायला जायला’ म्हणून अक्षय लाडात आल्यावर शमिकालाही लोळण्याचा मोह पडायचा. अक्षय डायट फूडही आवडीने खायचा आणि चमचमीत पदार्थही मनापासून चोपायचा. त्याबद्दल हल्ली त्यांची खटकाखटकीही व्हायची.

आणखी वाचा-अडीच लाख स्त्रियांना ‘मातृत्वाचा दंड’?

काल शमिकाने तिच्या फिटनेस गुरूंचा एक यूट्यूब व्हिडीओ पाहिल्यावर, ‘आपल्या वाढत्या वजनाचं आता काहीतरी केलंच पाहिजे’ ही जाणीव एकदम टोकदार झाली. त्यात सकाळी उठण्याऐवजी अक्षय लाडात आल्यावर ती खवळलीच एकदम. “आजिबात लाडात येऊ नकोस. तुला फिटनेसचं काहीच पडलेलं नाहीये. जाडी इतकी वाढली तरी व्यायाम नको, खाण्यात बदल नको. उद्या बाळ हवं असेल तर बाबा होण्याची मॅच्युरिटी नको का?” अशी तिची एकदम टोकाची बडबड ऐकून अक्षय भडकला. ‘माझी तब्येत कायम अशीच आहे. मी काहीही खाईन. मला कंट्रोल करण्यापेक्षा स्वत:च्या बुटीककडे लक्ष दे. तुला ना मार्केटिंग जमतं, ना मॅनेजमेंट” अशी त्याने परतफेड केली. भांडून, वैतागून दोघेही शेवटी आपापल्या कामाला निघून गेले.

सकाळच्या या भांडणाच्या पार्श्वभूमीवर शमिका लवकर परतली. अरुणाताईंच्या अपेक्षेप्रमाणे तिनं त्यांच्याजवळ विषय काढलाच. “आई, मी अक्षयला व्यायामाचा आग्रह करते, पहाटे उठून डायट डबा करते याचं काहीच नाही, उलट मूळ मुद्द्याला कलटी मारून माझ्या बुटीकच्या मार्केटिंग-मॅनेजमेंटबद्दल सुनवत राहतो. हे वागणं बरोबर आहे का? दोघांनीही हेल्दी असायला नको का?”

आणखी वाचा- नातेसंबंध: नवरा फारच ‘बोअरिंग’ आहे?

“ तुझा मुद्दा आणि कळकळ योग्यच आहे शमिका, पण सतत मागे लागल्यामुळे अक्षयला वळण लावल्याचा, कंट्रोल केल्याचा फील येतो ना? मग तो त्याच्या आवडीच्या क्षेत्रात तुला सुधरवायला जातो. थोडक्यात, दोघेही एकमेकांना सुधरवण्याचा प्रयत्न करत तक्रार करत राहता.
“पण हे प्रेमापोटीच आहे ना?”
“हो, दोघांचेही मुद्दे योग्य, हेतू चांगले असले तरी ‘तुझंच चुकतं’ असा मेसेज जातो, एकमेकांचा आदर राहत नाही ना?”
“ म्हणजे मी काहीच करायचं नाही? त्याला जाड होताना बघत राहायचं?” “असंही तू सतत बोलत राहिल्याने तो थोडीच बारीक होणारे? प्रत्यक्षात तुम्ही दोघंही फक्त बोलतच राहताय. कृती कुठेय? तुला रनिंग-डाएट महत्त्वाचं वाटतं ना? ते तू तुझ्यापुरतं कर. थोड्या दिवसांनी तू फिट झालेली बघून त्यालाही वाटेल तुझ्यासोबत यावंसं. जबरदस्ती कशासाठी? बुटीकचं मार्केटिंग हवं हा त्याचाही मुद्दा योग्यच आहे की. पण तुला चुकीची म्हणून लेबल करण्याऐवजी, त्याने त्याच्या कल्पना तुला सुचवाव्यात, मात्र त्या कशा, किती वापरायच्या याचा निर्णय तुझा असायला हवा.” “पटतंय गं, वादविवाद हीच कृती होत चाललीय.”
“खरं सांगू का, प्रेमाचं नाव घेत जबरदस्तीनं जोडीदाराचा पतंग जोरात उडवायला बघायचं, की स्वतःचा पतंग स्वत:च्या पद्धतीने मजेत उडवायचा एवढाच चॉइस करायचाय तुम्हाला.”
आईनं नेमकं उदाहरण दिल्यावर शमिकाच्या डोळ्यासमोर एक कल्पनाचित्र उभं राहिलं. दोघांनीही आपल्या एकेका हातात धरलेले स्वत:चे पतंग कसेही भेलकांडताहेत आणि दुसऱ्या हाताने आपण दोघेही एकमेकांच्या पतंगांना उंच उडवायला बघतोय हे चित्र एंजॉय करत शमिका हसत सुटली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com