डॉ. शारदा महांडुळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वयंपाकघरात प्रत्येक गृहिणी आहारीय पदार्थ सुगंधी मसालेदार व स्वादिष्ट बनविण्यासाठी दालचिनीचा वापर करते. फार प्राचीन काळापासून मसाल्याबरोबरच आयुर्वेदिक औषधांसाठी दालचिनीचा वापर केला जातो.

मराठीत ‘दालचिनी’, हिंदीमध्येही ‘दालचिनी’, संस्कृतमध्ये ‘दारुशील’, इंग्रजीमध्ये ‘सिनॅमॉन’, तर शास्त्रीय भाषेत ‘सिनॅमोमम झ्येलॅनिकम’ (Cinnamomum Zeylanicum) या नावाने ओळखली जाणारी दालचिनी ही ‘लॉरेसी’ या कुळातील आहे.

भारतामध्ये निलगिरी पर्वत आणि उत्तर भारतात दालचिनीचे उत्पादन घेतले जाते. यापासून तेलही काढले जाते. दालचिनीच्या पानांतून काढलेले तेल अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांत आणि औषधांमध्ये उपयोगात आणले जाते. चीन, जपान, मलाया, जावा, सुमात्रा, सिलोनमध्ये दालचिनीच्या मोठ्या मोठ्या बागा असतात. दालचिनीचे झाड साधारणतः सात ते आठ फूट उंचीचे असते. त्याची पाने सुगंधी, गुळगुळीत, चमकदार, लंबगोल आकाराची व मोठी असतात. याच पानांना तमालपत्र असेही म्हणतात. तमालपत्राच्या वनस्पतीची साल म्हणजेच दालचिनी होय. सालीचा सुगंध उत्तम असून, त्याची चव तिखट गोड असते.

औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार : दालचिनी लघु, उष्ण, तिखट, मधुर, कडवट, रूक्ष आणि पित्तकारक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : दालचिनीमध्ये कॅल्शिअम, लोह, आर्द्रता, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, फॉस्फरस, थायमिन, पोटॅशिअम, उष्मांक, सोडिअम, नियासिन, रिबोफ्लेविन, तसेच ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असतात.

उपयोग :

१) दातदुखी असह्य झाली असेल, तर दालचिनीच्या तेलात बुडविलेला कापसाचा बोळा दुखणाऱ्या दातावर ठेवावा. त्याने दाताचा ठणका त्वरित थांबतो.

२) दालचिनी, कात, जायफळ व तुरटी यांच्या चूर्णाची गोळी बनवावी. एक-एक गोळी सकाळ-संध्याकाळ घेतल्यास गर्भाशयाचे आकुंचन होऊन अंगावरून पांढरे जाणे किंवा लाल जाणे हे विकार कमी होतात.

३) अजीर्णामुळे वारंवार जुलाब होत असतील, तर दालचिनी व पांढरा कात यांचे चूर्ण मधात कालवून सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा घ्यावे. यामुळे पातळ जुलाब होण्याचे थांबतात.

४) ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये रजःस्राव साफ होत नाही, त्यांनी दालचिनीचे अर्धा-अर्धा चमचा चूर्ण सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास रज:स्राव साफ होण्यास मदत होते.

५) पोटामध्ये मुरडा येत असेल, तर दालचिनीचे अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास मुरडा येणे थांबते.

६) दालचिनीच्या पानांतून काढलेले तेल पोट दुखणे, पोटात गॅस धरणे व पोटामध्ये जंत होणे या सर्व विकारांवर गुणकारी आहे. हे तेल थोड्या प्रमाणात सेवन केल्यास पोटातील जंत शौचावाटे निघून जातात व पोटदुखी थांबते.

७) दालचिनीचे तेल स्वादिष्ट व रुचकर असते व त्यामध्ये असणाऱ्या रोगप्रतिकारक गुणधर्मामुळे त्याचा वापर मिठाईमध्ये व मसाल्यामध्ये केला जातो. तसेच साबणामध्ये दालचिनी तेलाचा उपयोग केला जातो. या तेलामुळे त्वचा कांतियुक्त व मऊ राहते व त्वचेचे कोणतेही विकार होत नाहीत.

८) दालचिनी सेवनामुळे शरीरात वाईट कोलेस्टेरॉल (LDL) निर्माण होत नाही व त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहून हृदयाचे कार्यही सुरळीत चालते.

९) दालचिनी हृदय बलकारक, हृदय उत्तेजक आहे. हृदयाची दुर्बलता दूर करून हृदयाचे कार्य संतुलित राखण्यास दालचिनी मदत करते.

१०) खाल्लेल्या अन्नाचे पचन सुरळीत होण्यासाठी, तसेच मुख व कंठ शुद्धीसाठी जेवणानंतर दालचिनीचा छोटासा तुकडा चघळावा.

११) स्थौल व्याधीने जर एखादा रुग्ण त्रस्त असेल, तर त्याच्या शरीरातील आमनिर्मिती कमी करण्यासाठी दालचिनीचूर्ण, आवळाचूर्ण, सुंठचूर्ण व तुलसीपत्र पाण्यामध्ये एकत्र उकळून दिवसभर हे पाणी थोडे थोडे पीत राहावे.

१२) एखादी व्यक्ती बेशुद्ध होऊन शरीर थंड पडले असेल, तर त्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी दालचिनीच्या तेलात तिळाचे तेल मिसळून ते सर्व शरीरावर चोळले असता रुग्ण शुद्धीवर येतो.

१३) वातविकार असणाऱ्या रुग्णांमध्ये दालचिनीचे तेल शरीरास चोळल्यास फायदा दिसून येतो.

१४) सर्दीमुळे तीव्र स्वरूपात डोकेदुखी जाणवत असेल, तर दालचिनी पाण्यात उगाळून गरम करून कपाळावर लेप केल्यास किंवा दालचिनीचे तेल कपाळावर लावल्यास डोकेदुखी त्वरित थांबते.

१५) पोटामध्ये कळ येत असेल, तर दालचिनीचे तेल अथवा अर्क अर्धा चमचा घेतल्यास कळ येण्याचे थांबते.

सावधानता :

दालचिनीचा उपयोग अति प्रमाणात केल्यास ती विषासमान शरीरावर कार्य करते. तसेच कायमस्वरूपी जास्त प्रमाणात दालचिनीचे सेवन केल्यास नपुंसकता निर्माण होऊ शकते. उष्ण प्रकृतीच्या लोकांनी दालचिनीचा उपयोग अतिशय विचारपूर्वक वैद्याच्या सल्ल्याने करावा. उन्हाळ्यामध्ये दालचिनीचा वापर करणे शक्यतो टाळावे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cinnamon helps to lower ldl and overall cholesterol levels good for heart asj