श्रद्धा दामले
पाऊस सुरू होता. श्रोत्यांमध्ये छत्र्या उघडल्या गेल्या. मोकळं वातावरण चटकन बदललं. पण लोकांमधला उत्साह कायम होता. कारण एकच होतं… क्लॉडिन गे यांचं भाषण ऐकण्यासाठी जमलेले लोक अतिशय उत्सुक होते!
वय ५३. पण हा आकडा खरा वाटूच नये अशी लहानशी चण, समारंभाचा काळा पोशाख परिधान केलेल्या आणि डोळ्यांवरच्या काळ्या चष्म्याच्या फ्रेममधूनही बोलक्या डोळ्यांनी संवाद साधू पाहणाऱ्या क्लॉडिन पोडियमजवळ आल्या आणि त्यांनी सगळ्यांचं हसून स्वागत केलं. प्रेक्षकांना पावसात उभं राहावं लागत असल्याबद्दल सॉरीही म्हटलं! ‘पण माझं भाषण मी थोडक्यात आटपणार नाहीये!’ अशी सूचना देऊन आणि सुरुवातीलाच टाळ्या घेऊन बोलायला सुरुवात केली.
क्लॉडिन गे यांना अमेरिकेतल्या हॉर्वर्ड विद्यापीठाच्या तीसाव्या अध्यक्ष म्हणून नुकतंच सन्मानित करण्यात आलं. तसं पाहिलं तर ही नित्यनेमाने घडणारी घडना. एक अध्यक्ष पायउतार झाले, की दुसरे स्थानापन्न होणारच. पण नाही, क्लॉडिन यांच्या बाबतीत आणखी काहीतरी विशेष होतं. क्लॉडिन या केवळ नव्या अध्यक्ष नव्हत्या. हॉर्वर्डची स्थापना होऊन ३८७ वर्षं झाली आहेत. इतक्या प्रचंड मोठ्या काळातल्या क्लॉडिन या पहिल्या कृष्णवर्णीय आणि दुसऱ्या क्रमांकाच्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.
३८७ वर्षं. हा कालावधी मोजण्यासाठी नुसता ‘मोठा’ हा शब्द पुरेसा ठरणार नाही. उत्तम जग घडावं यासाठी विविध लोकांनी एकत्र यायला इतका मोठा कालावधी जावा लागला आहे. त्याबद्दल फार सुंदर विचार क्लॉडिन यांनी आपल्या भाषणात मांडले. पाऊस, लोकांच्या उत्स्फूर्त टाळ्या, फोटोंचा ‘क्लिकक्लिकाट’ या कशानेही विचलित न होत्या त्या अतिशय संयतपणे पोडियमवर उभं राहाता आल्याच्या संधीबद्दल आभार मानतात.
कॅरेबियन समुद्रातल्या द्वीपसमूहातला हैती नावाचा छोटासा देश. तिथून क्लॉडिन यांचे वडील सोनी गे आणि आई क्लडेट गे आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत आले. भविष्य घडवायचं असेल, तर शिक्षणाला पर्याय नाही हे जाणणाऱ्या सोनी गे यांनी आपल्या दोनही मुलांना शिक्षणाचा पाया घालून दिला. क्लॉडिन आणि त्यांच्या भावाला शिकवलं. भविष्य बदलवणारी ही संधी दिल्याबद्दल त्या आपल्या आईवडिलांचे मनापासून आभार मानतात.
पण आपला प्रवास हा एका पिढीपासून नाही, तर चारशे वर्षांपूर्वीपासून सुरू झाल्याचं त्या अतिशय नम्रपणे नमूद करतात. त्या म्हणतात, ‘ज्या पोडियमवर मी आता उभी आहे, तिथपासून केवळ ४०० यार्डांच्या अंतरावर, ४ शतकांपूर्वी एका धैर्याचा प्रवास सुरू झाला होता. याच धैर्यानं मला इथवर येण्याची संधी दिली. हॉर्वर्ड विद्यापीठाच्या तत्कालीन अध्यक्षांच्या वैयक्तिक मालमत्तेत चारशे वर्षांपूर्वी चार गुलाम राहात होते आणि काम करत होते. माझी आणि त्यांची कहाणी एकसारखी नाही, पण या संपूर्ण काळातल्या विविध ट्रेंड सेट करणाऱ्यांची आणि माझी कहाणी मात्र एकसारखीच आहे.’
स्थलांतरित आईबापाची लेक असणाऱ्या क्लॉडिन यांनी नुकताच हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारला. त्यांचा हॉर्वर्ड विद्यापीठातला प्रवास डीनपदापासूनच सुरू झालेला होता. परंतु आज त्यांच्या म्हणजेच एका कृष्णवर्णीय महिलेच्या नियुक्तीनं हॉर्वर्ड विद्यापीठानं एक नवा इतिहास रचला आहे. हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. शिक्षणाच्या सहाय्यानं जग बदलायचा प्रयत्न अशा नव्या नव्या टप्प्यांवर यशस्वी होतो आहे, असंच म्हणावं लागेल.
क्लॉडिन आपल्या अध्यक्षीय भाषणांत धैर्य आणि बदल हातात हात घालून चालतात, हे अधोरेखित करतात. त्या म्हणतात, ‘हॉर्वर्ड विद्यापीठाने माणूस म्हणून सर्वांना आपलंसं करण्याचा झगडा सुरू ठेवला. बदल घडवण्याचं धैर्य दाखवलं आणि विविध लोकांना एकत्र घेऊन काम करण्याचा पाया घातला त्यामुळे हे अशक्य वाटणारं अंतर कापलं गेलं आहे. त्या धैर्याचं प्रतिबिंब माझ्यात दिसावं असं मला वाटतं.’
त्यांच्या वडिलांनी उत्सुकता आणि सकारात्मकतेचा संस्कार आपल्या मुलांना दिला. तो पूर्णपणे आत्मसात करून क्लॉडिन गे यांचा नवा प्रवास सुरू झालेला आहे. नव्या इतिहासाला सुरुवात झालेली आहे!
lokwomen.online@gmail.com