टेनिस विश्वात अत्यंत मानाच्या ‘यूएस ओपन’ (The US Open) स्पर्धेत नुकताच एक इतिहास रचला गेला. यूएस ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये एक नवी चॅम्पियन समोर आली- अमेरिकेची फक्त १९ वर्षांची कोको गॉफ! (Coco Gauff) तिनं बेलारुसच्या आर्यना सबालेंकाचा २-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. या विजयामुळे कोको ही सेरेना विल्यम्सनंतरची सर्वांत कमी वयाची चॅम्पियन बनली आहे. सेरेना १९९९ मध्ये तिच्या वयाच्या १६ व्या वर्षी यूएस चॅम्पियन ठरली होती. कोकोच्या आयुष्यातलं हे पहिलं ग्रॅण्डस्लॅम पदक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१३ मार्च २००४ रोजी फ्लोरिडामध्ये जन्मलेल्या कोकोनं वयाच्या ६ व्या वर्षापासूनच टेनिस खेळायला सुरुवात केली होती. तिच्या आईचं नाव कँडी आणि तर वडिलांचं नाव कोरे गॉफ. तिला दोन लहान भाऊही आहेत. सुरुवातीला काही वर्षं कोकोचं कुटुंब ॲटलांटामध्ये होतं. कोकोला टेनिसचं चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी ती ७ वर्षांची झाल्यावर ते पुन्हा फ्लोरिडामध्ये आले. तिच्या वडिलांनीच तिला सुरुवातीचं टेनिस प्रशिक्षण दिलं. खेळाबद्दलच्या प्रेमाचा वारसा कोकोला घरातूनच मिळाला आहे. तिचे वडील बास्केटबॉलपटू तर आई ॲथलीट होती. २०१८ मध्ये कोकोनं इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (ITF) मधून व्यावसायिक टेनिस खेळायला सुरुवात केली.

हेही वाचा… … आणि दाढदुखी थांबली

वयाच्या १५ व्या वर्षी ती विम्बल्डनची सर्वांत कमी वयाची ‘क्वालिफायर’ झाली होती. २०१९ मध्ये पहिल्याच स्पर्धेत ती चौथ्या फेरीपर्यंत पोहोचली. तिच्या वयाचा, अनुभवाचा विचार करता ही तिच्यासाठी मोठी झेप होती. गेल्या वर्षीही तिनं ‘फ्रेंच ओपन’च्या अंतिम फेरीपर्यंत टक्कर दिली होती. पण फ्रेंच ओपनचं विजेतेपद मिळवू शकली नाही. या वर्षी जुलै महिन्यात विम्बल्डनच्या पहिल्याच म्ती पराभूत झाली, मात्र तिनं आशा सोडली नाही आणि जिद्दीनं प्रयत्न करत राहिली. त्यामुळेच अमेरिकेची ही ‘टीनएजर’ टेनिस विश्वातली जगज्जेती होऊ शकली.

‘यूएस ओपन’ चम्पियन झाल्यानंतर कोकोवर पुरस्कारांचा, पैशांचा जणू वर्षाव होत आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. काही बातम्यांनुसार तिला ३ मिलियन डॉलर्सची पुरस्काराची रक्कम मिळाली आहे. १९ वर्षांचं वय म्हणजे मनसोक्त जगून घेण्याचं, अनेकदा बंड करण्याचं आणि फारशी फिकीर न करता जगण्याचं समजलं जातं. कोकोनं याच वयात आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं प्रवास केला. प्रत्यक्षात घाम गाळून कष्टाला पर्याय नाही हे तिनं दाखवून दिलं. जगप्रसिद्ध टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स या चम्पियन भगिनी कोकोच्या आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच आपल्याला टेनिस खेळावंसं वाटायला लागलं असं ती सांगते.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: दर वेळी नकार का येतो?

जुलै महिन्यात विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर झालेली कोको यूएस ओपनची चॅम्पियन होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण परिश्रमाच्या जोडीला आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे जणू कोकोनं इतिहास रचला. सबालेंकाच्या विरोधातला तिसरा सेट जिंकल्यावर आपण जिंकलो आहोत यावर तिचा विश्वासच बसत नव्हता! जिंकल्याचं कळल्यावर स्टँडमध्ये असलेल्या तिच्या आईकडे ती धावत गेली. कोकोच्या आईला आपल्या मुलीचं यश बघून अश्रू अनावर झाले होते.

‘मला प्रचंड आनंद झाला आहे! प्रामाणिकपणे सांगायचं तर मला ही स्पर्धा बाकी कुणासाठी नाही, तर स्वत:साठीच जिंकायची होती,’ यूएस ओपनचं विजेतेपद मिळाल्यावर कोकोनं दिलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे. तिनं तिच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांचे, टीका करणाऱ्यांचेही आभार मानले. ‘माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही, त्या सगळ्यांना मला धन्यवाद द्यायचे आहेत. खरंतर त्यांनीच माझ्या स्वप्नांची ज्योत धुमसती ठेवली. त्यामुळे आता माझं यश आणखी झळाळून उठलं आहे!’ असं कोको म्हणाली. फ्रेंच ओपनमधील पराभवामुळे कोको आधी खूप निराश झाली होती. पण त्यामुळेच आताचा हा विजय अधिक महत्त्वाचा आणि स्वप्नवत आहे असं कोकोनं सांगितलं.

हेही वाचा… मैत्रिणींनो, भाज्यांची सालं, देठं वाया घालवू नका! या टिप्स वाचा-

कोकोच्या विजयानंतर ‘यूएस ओपन’नं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काही वर्षांपूर्वी यूएस ओपन टेनिस मॅच बघण्यासाठी आलेली छोटी कोको दिसते. टेनिस फॅन ते टेनिस जगज्जेती, हा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा तिचा प्रवास सगळ्या क्रीडाप्रेमी आणि क्रीडापटू मुली-स्त्रियांसाठी उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coco gauff won womens singles the us open tennis competition a new grand slam champion dvr
Show comments