सविताकडे या वेळी भिशी होती. त्या भिशीसाठी तिने यावेळी बिस्किटाची थीम ठरवली होती. नवनवीन चवीची, भारीतील भारी बिस्किटं आणायची सविताने ठरवलं. त्यासाठी सविताने विशिष्ट प्रकारच्या बिस्किटांचा शोध घेतला. तिच्या शहरात हैदराबादच्या कराची बिस्किटांपासून ते सँडविच बिस्किटं, पाचक बिस्किटं, शाॅर्टब्रेड बिस्किटं, काजू बिस्किटं, गहू-तुपातील घरगुती बिस्किटं, नानखटाई अशी अनेकविध बिस्किटं मिळणारी एक मोठी बेकरी होती. तिथे ती तिची बहीण रेवतीसह गेली. दोघींनी मिळून भरपूर बिस्किटं खरेदी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिशीसाठी फक्कड चहा करण्यात आला होता. गप्पांबरोबर बिस्किटांचा फडशा पडू लागला. बिस्किटांचे पुड्यावर पुडे फुटू लागले. इतक्यात श्रावणीने त्यांना थांबवलं आणि त्यांच्या गप्पांची दिशाच बदलली. ती म्हणाली, “आज आपण कोणताही बिस्किट पुडा फोडताना आधी त्यावरची माहिती वाचायची. ती एका कागदावर लिहायची आणि मग पुडा फोडायचा.”

“श्रावणी, काय गं… हे तुझं नेहमीचंच झालंय. दर वेळी काही तरी नवीन असतं बघ. आता बिस्कीट पुड्यावरची माहिती घेऊन काय करायचं आपल्याला?”

“कळेल, बिस्कीट पुड्यावरचं नाव, आतील बिस्किटांची संख्या, वजन, एक्सपायरी डेट, एमआरपी लिहिलेलं असतं. ते सगळं लिहून काढू या.” मैत्रिणींनी लिहायला सुरुवात केली. लिहिताना त्यांना मजा येत होती, कारण कोणत्याही वस्तूच्या पॅकिंगवरची माहिती कधी कुणी बघितलीच नव्हती. या मैत्रिणी अवाक् झाल्या जेव्हा त्यांनी केलेल्या नोंदीची पडताळणी होऊ लागली. श्रावणीने सांगितलं की, “आता जिला जी बिस्किटं खायची असतील तिने तो पुडा व्यवस्थित फोडायचा, असा की नंतरही गरज पडली तर त्यावरची माहिती पुन्हा नीट वाचता येईल. त्यातील बिस्किटांची संख्या मोजायची. सविता, एक काम कर ना. तुझ्या किचनमध्ये तो छोटा वजनकाटा आहे तो आण ना.”

हेही वाचा… बेकायदेशीर लग्नांमधून जन्मलेल्या अपत्यांना पालकांच्या मालमत्तेत हक्क!

सविताने वजनकाटा आणला. त्यावर आता प्रत्येक प्रकारच्या बिस्किटांचं वजन बघण्यात आलं. संख्या, वजन, एमआरपी सगळ्याची व्यवस्थित नोंद केली. वेगवेगळ्या प्रकारचे तेरा बिस्किटांचे पुडे होते. त्यातील दोन पुड्यांमध्ये प्रत्येकी एक बिस्किट कमी होतं. एका पुडीची एक्सपायरी डेट संपली होती. या मिळालेल्या माहितीने सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. श्रावणीकडे बघून ‘पुढे काय’ असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

श्रावणी म्हणाली, “बघा, कसं असतं? आपण महिन्याला किती बिस्किटं खरेदी करतो. घरात रोज बिस्किटं लागतातच ना? आपण इतक्या बारकाव्यानिशी कधी बघतच नाही. निदान आजपासून बघू या.”

“अगं पण, काय फायदा? एखाद्या बिस्किटासाठी कोण एवढी झंझट करेल?”

हेही वाचा… टेनिसमधील नवी चॅम्पियन: ‘यूएस ओपन’ विजेती कोको गॉफ

“आपण करायचं, कारण आपण एक बिस्कीट पुडा आणतो; पण एखाद्या कंपनीत एका दिवशी लाखो पुडे तयार होतात. असे एका पुड्यात एक बिस्कीट कमी भरलं तरी कंपनीला लाखो रुपयांचा फायदाच होतो. आपल्यासाठी एका पुड्यामागे दोन रुपयांचं किंवा चार ग्रॅमचं नुकसान म्हणजे काहीच नाही. असं जर वाटत असेल तर आपण आपली फसवणूक करून घेतो आहोत.”

“आणि हे किती जरी खरं असलं तरी एका बिस्किटासाठी आपण नाही भांडत बसणार.”

“नको भांडू; पण काय होतंय ते तर समजून घे. आजचंच बघ. आपण तेरा पुडे आणले. प्रत्येकात एक बिस्किट कमी निघालं असतं तर तेरा बिस्किटं होतील. एवढ्या बिस्किटाने एखाद्या गरिबाचं एक वेळचं पोट भरेल. चला आत्ता आणखी एक काम करू या. आपल्याला ज्या कंपनीच्या पॅकेटमधून कमी बिस्किटं मिळाली त्या कंपनीच्या वेबसाइटवरून मेल आयडी किंवा काही तरी संपर्क नंबर वगैरे मिळेल.”

एवढं म्हणेपर्यंत रेवतीने त्या कंपन्यांचे ई मेल आयडी शोधले. एका कंपनीने वेबसाइटवर ‘येथे तक्रार नोंदवा’ असं लिहिलं होतं. तिथं क्लिक करून रेवतीने संपूर्ण माहितीसह तक्रार नोंदवली. दुसऱ्या कंपनीला मेल केला.

श्रावणीने भिशीच्या दिवशी सकाळीच एका वृत्तपत्रात बातमी वाचली होती. बिस्किटाच्या पुड्यात कमी बिस्किटे. ‘आयटीसी’ला एक लाख रुपयाचा दंड. आयटीसी लि. कंपनीच्या ‘सनफिस्ट मारी लाईट’ या बिस्किटाच्या बॅच क्रमांक ०५०५सी ३६ मधील एका पुड्यावरील विवरणाप्रमाणे आत बिस्किटं नव्हती. एक बिस्किट कमी होतं. बिस्किटांचं वजनही कमी होतं. ही बाब एका ग्राहकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कंपनीविरुद्ध जिल्ह्याच्या ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घेतली. ग्राहक मंचने ‘आयटीसी’ कंपनीला एक लाख रुपयांचा दंड केला. पुड्यांवरील विवरणाप्रमाणे बिस्किटांची संख्या नसल्याने ग्राहकांची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले आहे, असे ग्राहक न्यायालयाने म्हटले. श्रावणीकडे या बातमीचं कात्रण होतं. तिने ती बातमी सगळ्यांना वाचून दाखवली. ती एक जागरूक नागरिक होती. तिने ‘चहा बिस्कीट भिशी’च्या निमित्ताने सगळ्यांना ग्राहक हक्कबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला.

या मैत्रिणींच्या मेलला कंपनीकडून उत्तर येईलच. आता तरी इथून पुढे काहीही खरेदी करताना प्रत्येक ग्राहक राणी निदान पॅकेटवरील माहिती वाचेल. वजन आणि एक्स्पायरी डेट नीट बघेल. त्यानंतरच खरेदी करेल आणि स्वत:ची फसवणूक थांबवेल.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consciousness about consumer rights and fight for justice dvr
Show comments