कोणत्याही व्यक्तीसाठी यश मिळवणे सोपे नाही आणि कोणतीही व्यक्ती एका दिवसात यशस्वीसुद्धा होत नाही. जिद्द, मेहनत आणि सतत प्रयत्न हाच ध्येयापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग आहे. तर आज आपण अशाच एका तरुणीबद्दल जाणून घेणार आहोत. या तरुणीने उच्च पगाराची नोकरी सोडत चौथ्या प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली आहे. एस. अस्वथी तरुणीने आयएएस (IAS) अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते शेवटी २०२० मध्ये पूर्ण केले.
एस. अस्वथी तिरुअनंतपूरम येथील रहिवासी असून बांधकाम उद्योगातील एका मजुराची मुलगी आहे. कुटुंबाची परिस्थिती बिकट असतानादेखील तिने न डगमगता यूपीएससी २०२० ची नागरी सेवा परीक्षा (Civil Service Exam) उत्तीर्ण केली. अस्वथी अभ्यासात नेहमीच उत्कृष्ट होती. तिने या परीक्षेत ४८१ वा क्रमांक मिळवला. तर आज आपण अस्वथी या तरुणीची चिकाटी आणि कठोर परिश्रमाची गोष्ट जाणून घेऊ, जी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल.
एस. अस्वथीने इयत्ता आठवीमध्ये शिकत असतानाच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. ही इच्छा असूनही तिने तिरुअनंतपूरमच्या सरकारी बार्टन हिल इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेऊन इंजिनिअरिंग क्षेत्रातील तिचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला टीसीएस कोची (TCS Kochi) येथे नोकरी मिळाली. पण, यादरम्यान तिच्या मनात कुठेतरी यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा होतीच.
हेही वाचा…कौटुंबिक हिंसाचारावरील हेल्पलाइन म्हणून ‘डॉक्टर प्रसन्न गेटू’ करतायत २० वर्षांपासून काम…
तेव्हा एस. अस्वथीने २०१७ मध्ये तिची आयटी (IT) नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून तिला परीक्षेसाठी अभ्यास करण्यास वेळ मिळेल. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी तिने तिरुअनंतपूरममधील अनेक खाजगी तसेच केरळ राज्य नागरी सेवा अकादमीमध्ये प्रवेश घेतला. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अस्वथीने खुलासा केला की, २०२० मध्ये तिने परीक्षा दिली, तो तिचा चौथा प्रयत्न होता. प्राथमिक परीक्षेत तिचे पहिले तीन प्रयत्न अयशस्वी ठरले, तरीही ती थांबली नाही आणि चौथ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली.
तसेच या यशामागचे गुपित तिने सांगितले की, ही परीक्षा पूर्ण करण्यासाठी तिने जास्तीस्त जास्त लेखनाचा सराव आणि कन्टेन्ट सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. जेणेकरून उत्तरपत्रिकेत प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे सादर करता येतील.”
एस. अस्वथीचे वडील बांधकाम उद्योगातील मजूर आहेत. तसेच तिचा धाकटा भाऊ आयटी कंपनीत काम करतो आणि तिची आई श्रीलता या गृहिणी आहेत. अस्वथीच्या यशामुळे तिच्या वडिलांना म्हणजेच प्रेम यांना तिचा खूप अभिमान वाटला आणि त्यांनी आपले मत व्यक्त करत सांगितले की, “मी खूप आनंदी आहे. ती अभ्यासात नेहमीच उत्कृष्ट होती. आमची एवढी कठीण परिस्थिती असतानाही तिने नागरी सेवा परीक्षा (Civil Service Exam) उत्तीर्ण केली.”