अर्चना मुळे
एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत परत घेतला जाणार नाही, असं बिलावर लिहिलेलं आपण नेहमीच पाहातो. पण खरंच तसं असतं का? ग्राहक कायदा काय म्हणतो?
सीमाचा अठरावा वाढदिवस होता. तिला खूप साऱ्या भेटवस्तू मिळाल्या. त्यात तिच्या आत्याने आणलेला एक सुंदर ड्रेस होता. तो सीमाला खूपच आवडला. इतका, की तिने तो लगेच घालून बघितला. पण ड्रेस खूपच घट्ट होता. तिला तो बसलाच नाही. तिने आत्याला दाखवलं. आत्या म्हणाली, “उद्या तू कॉलेजमधून लवकर ये. आपण बदलून दुसरा आणू.”
दुसऱ्या दिवशी दुपारनंतर दोघी ड्रेस बदलण्यासाठी दुकानात गेल्या. दुकानदाराला बिल दाखवलं. आणि मोठ्या साइजचा ड्रेस मागितला. त्यांच्याकडे त्या साइजचा ड्रेस नव्हता म्हणून त्या दोघी दुसरा ड्रेस बघू लागल्या, पण मनासारखा ड्रेस काही मिळेना. त्यातून एक आवडला, पण कापडाची क्वालिटी खराब होती. त्या दुकानदाराला म्हणाल्या,“आम्हाला असाच सेम ड्रेस हवा होता. तो तुमच्याकडे नाही. आम्हाला ड्रेस नको. तुम्ही त्याचे पैसे परत द्या.”
हेही वाचा >>> प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांवर मारेकरी घालणारी असली कसली लेक?
“असं कसं पैसे द्या. तुम्ही बिलावर वाचलं नाही का, एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत परत घेतला जाणार नाही. स्पष्ट लिहिलंय तसं. तुम्ही दुसरा कोणताही ड्रेस किंवा काहीही खरेदी करा. मी पैसे परत नाही देऊ शकत.”
“अहो, पण आम्हाला हवा तसा दुसरा ड्रेस तुमच्याकडे नाही. जो आम्हाला आवडला त्यात साईज नाही आहे. मग आम्ही काय घेऊ?”
“काहीही घ्या. माझा वेळ घेऊ नका.”
“अहो, तुम्ही आमचे पैसे विनाकारण अडवून ठेवत आहात. आम्ही तुमचे नेहमीचे ग्राहक आहोत. तरी अशा पद्धतीने बोलताय तुम्ही? आम्हाला दुसरं काही आवडलंच नाही तर तुम्ही पैसे परत द्यायला हवेत.”
“हा तुम्ही परत आणलेला ड्रेस घेऊन जा. पैसे मिळणार नाहीत. जा तुम्ही.”
एवढा सगळा विसंवाद होत असतानाच सीमाची मैत्रीण मिनाक्षी तिथं खरेदीसाठी आली. मिनाक्षीने सीमाकडे वादाचं कारण विचारले. पूर्ण चौकशी केली आणि दुकानदाराला म्हणाली,“तुम्ही बिलावर जे लिहिलंय आणि तुमच्या मागे जो बार्ड आहे ते सगळं ग्राहक कायद्याच्या विरोधात आहे. तुम्ही असं करू शकत नाही. ग्राहकाने घेतलेला ड्रेस त्यांच्या साइजचा नसेल तर तुमचा माल तुम्ही परत घेतला पाहिजे.”
हेही वाचा >>> कोण आहे मिन्नू मणी? शेतमजुराची मुलगी ते ‘टीम इंडिया विमेन’मधलं स्थान…
“ तुम्ही कोण मला शिकवणाऱ्या. आता धंदा तुमच्याकडून शिकू का?”
“ मी वकील आहे आणि ‘ग्राहक तक्रार निवारण मंच’ जिल्हास्तरीय न्यायालयात काम करते. तुम्ही ग्राहकांवर अन्याय करत आहात. आम्ही तुमच्या विरोधात ग्राहक कोर्टात जाऊ शकतो.”
“ वकील आहात म्हणून भीती घालताय काय. मी कुणाला घाबरत नाही.”
“ ठीक आहे. मग आम्ही आमचा हक्क ग्राहक न्यायालयाकडून मिळवू. दोन दिवसांत जिल्ह्याच्या तक्रार निवारण केंद्रात तुमच्या विरोधात तक्रार दाखल करू. तुम्हाला नोटिस येईलच.”
या सगळ्या वादग्रस्त संभाषणात तिथे असणाऱ्या आणखी एका अनोळख्या स्त्री ग्राहकाची भर पडली होती. ती मधेच म्हणाली,“अहो दादा, परवा अशाच एका केसमधे एका तरुणीने २४० रुपये किंमतीचे लेगिंग्ज घेतले होते. ते तिला छोटे झाले. ज्या दुकानात ते घेतले त्यावेळी तिथे गर्दी होती. ट्रायल करून लेगिंग्ज घ्यायला वेळ लागणार होता. दुकानदारानेच, ‘बिनधास्त न्या. बसेल तुम्हाला तो.’ असं सांगितलं होतं. पण नंतर लक्षात आलं ते तिच्या मापाचे नाहीत त्यामुळे ती परत करायला गेली तर त्यांनी ते घेतले नाहीत. तिने दुकानदाराच्या विरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार केली होती. निकाल तिच्या बाजूने लागला. दुकानदाराला लेगिंग्जचे २४० रुपये आणि शिवाय एक हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली होती. रक्कम छोटी असली तरी दुकानाची मोठी बदनामी झाली. पुढचे कित्येक महिने त्याच्या व्यापारावर या केसचा परिणाम झाला होता.
एवढं ऐकून सीमा म्हणाली, “हे बघा दादा, ग्राहकांना ग्राहक-हक्क माहीत असतातच असं नाही. म्हणून तुम्ही त्यांना त्रास देणार का? तुम्हाला जसे पैसे मिळवायचे असतात तसेच आम्हाला वाचवायचेही असतात. सांगा, आम्ही पुढे जाऊ का? विचार करून सांगा. तुमच्याविरुध्द तक्रार नोंदवली, तर तुम्हालाच फार मानसिक त्रास होईल. शिवाय वेळ जाईल तो वेगळाच. आणि निकाल तर आमच्याच बाजूने लागणार.”
हेही वाचा >>> तुम्हा नवरा-बायकोंत अजूनही ‘आंतरपाट’ आहे का?
सीमाचं बोलणं एकून दुकानदार सावध झाला. त्याने कुणालातरी फोन करून या ग्राहक हक्काची चौकशी केली. मिनाक्षीने मोबाईलवर केंद्रीय ग्राहक कल्याण,अन्न आणि नागरी पुरवठा विभाग यांनी १३ नोव्हेंबर २०१५ रोजी काढलेल्या आदेशाचं बिल क्रमांक ३२७ दुकानदाराला दाखवलं. आणि म्हणाली,“ हे बघा यामध्ये स्पष्ट लिहिलंय, दुकानदारांनी विकलेला माल जसा विकला त्याच अवस्थेत असेल आणि विकल्यापासून १५ दिवसाच्या आत ग्राहक परत करत असेल तर तो घेतला पाहिजे. आता तर या दोघींचे पैसे परत द्या. नाहीतर इथून पुढे आमच्या परिचयातील कुणीच या दुकानात खरेदीसाठी येणार नाहीत.”
दुकानदार वरमला होता. त्याने सीमाच्या ड्रेसचे पैसे परत दिले. म्हणाला “ नवीन ड्रेस आले तर मेसेज करतो. गैरसमज करुन घेऊ नका. शेवटी हा धंदा आहे. पण इथून पुढे ग्राहकाची प्रामाणिक अडचण असेल तर एकदा विकलेला माल परत घेईन. त्यांना त्रास देणार नाही..”
सीमा आणि तिच्या आत्याने दुकानदाराचे, मिनाक्षीचे आभार मानले. त्या या दुकानातून दुसऱ्या दुकानात खरेदीसाठी गेल्या. तिथे मात्र त्यांनी आधीच ‘एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही’ असा बोर्ड नाही ना याची खात्री केली. मगच आत गेल्या. archanamulay5@gmail.com