-डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“राकेश, अमेयची परीक्षा मागच्या आठवड्यात संपून त्याची सुट्टी सुरू झाली आहे. १५जूनपर्यंत त्याला सुट्टी आहे. त्याच्यासाठी मी दोन समर कॅम्प आणि कौशल्य उपक्रमाच्या क्लासची चौकशी केली आहे. तुलाही इमेल केला आहे. वेळ झाल्यावर वाच. या १ तारखेपासून त्याच्या अॅक्टिव्हिटी चालू होतील.”
“रजनी, तू फायनल कर. जे योग्य असेल तो निर्णय घे. फक्त बजेट मला कळव म्हणजे मला तशी व्यवस्था करता येईल.”
मेघाताई मुलगी आणि जावई यांचं बोलणं ऐकत होत्या. अमेय आत्ता कुठे ८ वर्षांचा होतो आहे. या लहान वयातच मुलांना एवढं बिझी ठेवायचं त्यांना काही पटतं नव्हतं. म्हणूनच त्या रजनीला म्हणाल्या, “रजनी, अमेयला जरा मोकळं खेळू दे. त्याच्या मनासारखं त्याला वागू देत. शाळेच्या रुटीनमध्ये मुले वेळापत्रकाला बांधलेलीच असतात. शाळेसाठी सकाळी साडेसहा वाजता त्याला तयार व्हावं लागतं. दुपारी शाळेतून आल्यावर होमवर्क, त्याचा बॅडमिंटनचा क्लास यामध्ये तो बिझी राहतो. त्याच्या मित्रांशी त्याला खेळायला वेळच राहात नाही. आता सुट्टी एन्जॉय करू देत. उगाचच कॅम्प आणि क्लासेस कशाला करायला लावतेस? पैशांचा अपव्यय नुसता. खरं तर घरातच मुलं खूप शिकतात. त्याच्यासाठी पालकांनीही वेळ काढणं गरजेचं असतं. मुलांसोबत खेळावं, गोष्टी सांगाव्यात, स्वयंपाकघरातही त्यांना मदतीला घ्यावं. घरातील संस्कारच जास्त महत्वाचे असतात.”
आणखी वाचा-शाळांना सुट्ट्या लागल्या, मुलांना कुठे ठेवायचं? पालकांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे!
“आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. घरातच मुलं खूप काही शिकतात त्यात दुमत नाहीच. ‘माझं वर्क फ्रॉम होम’ मी तेवढ्यासाठीच मागून घेतलं आहे. राकेशही त्याच्यासाठी वेळ काढतोच. पण आता जीवनमूल्यं बदलली आहेत. घरातील संस्काराबरोबरचं जीवनमूल्याचे संस्कार समाजातून मिळणं आणि बदलत्या जीवनपद्धतीत राहण्यासाठी त्याला सक्षम करणं तेवढंच महत्वाचं आहे. पूर्वीची परिस्थिती आता राहिलेली नाही. मुलांना मामाचा गावच राहिलेला नाही. शहरात मैदान नाहीत. मुलांना खेळायला जागा नाही. घरात एका मुलावरच थांबलेली कुटुंबं जास्त आहेत. भावंडांमधील शेअरिंग मुलांना माहिती नाही. त्यामुळंच समर कॅम्प किंवा कौशल्य वर्गासारख्या सपोर्ट सिस्टिमची सध्या गरज आहे. तिथं समवयस्क मुलं एकत्र भेटतात. शेअरिंग शिकवलं जातं. तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना नवीन खेळ शिकवतात. साहसी उपक्रम राबवून मुलांमधील भीती कमी केली जाते.
आईवडिलांच्या संरक्षण कवचातून बाहेर येऊन त्यांना परिस्थितीशी सामोरं जाण्याचं कौशल्य शिकवलं जातं. मनाविरुद्ध घडलं तरी त्याचा सामना कसा करायचा? एकमेकांना मदत करून मैत्र कसं जपायचं? याचं प्रात्यक्षिक शिकवलं जातं. त्यातून मुलांच्या नवीन ओळखी होतात. मागच्या वर्षी अमेयच्या समरकॅम्पमधील मुलांची सहल एका अनाथाश्रमात नेली होती. या मुलांशी मैत्री करून त्यांना कसा आधार द्यायचा हे त्यांना शिकवलं. त्याचा परिणाम असा झाला, की अमेयनं सुचवल्याप्रमाणं आम्ही आता नियमित तिथं जातो. काही वेळ त्यांच्याबरोबर घालवतो. आम्हालाही त्याच्या या निर्णयाचं कौतुक वाटलं.
सध्याच्या परिस्थितीत आई वडील दोघंही आपल्या नोकरी व्यवसायात व्यग्र असतात. त्यांना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी करिअरची आव्हानं स्वीकारावी लागतात. पुरेसा वेळ मुलांना देणं त्यांच्यासाठीही अवघडचं असतं. म्हणूनच समर कॅम्प, कौशल्य वर्ग यांसारख्या सपोर्ट सिस्टीमची मदत घेणं आता अनिवार्य झालं आहे. मुलांना घडवताना बाहेरच्या जगाचं ज्ञान देणंही महत्वाचं आहे. मुलं संस्कारांसोबतच स्मार्ट कशी होतील, याचा विचार करायला हवा. ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा का हरला? हे सांगताना, स्पर्धा कुणासोबत करावी? हे शिकवणंही गरजेचं आहे. मोबाईल, संगणक यांपासून मुलांना लांब ठेवता येणार नाही, पण मुलांच्या ज्ञानवृद्धीसाठी त्याचा उपयोग कसा करायचा हे मुलांना शिकवायला हवं. फक्त प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या गरजा, त्यांचे गुण- अवगुण ओळखून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सपोर्ट सिस्टिमची निवड करणं गरजेचं आहे.”
मेघाताई लेकीचं बोलणं मनापासून ऐकत होत्या. पालकत्वाच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. पालकांनीही पारंपारिक गोष्टी धरून न ठेवता स्मार्ट होणं गरजेचं आहे, हे त्यांच्याही लक्षात आलं. आपली मुलगी स्मार्ट पॅरेंटिंग करते आहे हे पाहून तिचं कौतुकही वाटलं.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
smitajoshi606@gmail.com