-डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“आय विल फिनिश हिम ऑफ, आता तर मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. समजतो कोण हा स्वतःला? स्वतः सर्व चुका करायच्या आणि स्वतःच घटस्फोट हवा म्हणून दावा दाखल करायचा? मी त्याला कधीच घटस्फोट तर देणार नाहीच. पण, त्याला आयुष्यातून उठवेन, माझ्या मुलाचं नखंही त्याच्या नजरेस पडू देणार नाही. तनयला घेऊन जाण्याची भाषा करतो? मी त्याला चांगलाच धडा शिकवेन. त्याला असं मोकळं सोडणार नाही. ”
अवंतिकानं तिच्या हातातील नोटीस बाजूला भिरकावून दिली आणि आपल्या ओंजळीत तोंड लपवून रडत राहिली. तिथंच खेळणारा ७ वर्षाचा छोटा तनय सर्व ऐकत होता. आईला नक्की काय झालंय हे त्याला कळत नव्हतं. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, “ आई, तू का रडतेस? काय झालंय? मला कोण घेऊन जाणार आहे? तू रडू नकोस ना. तू रडलीस की मलाही रडू येतं.”
अवंतिकाने तनयला जवळ घेतलं. आपले डोळे पुसले आणि म्हणाली, “ बेटा, काही झालं नाही मला, तू रडू नकोस हं, तुला माझ्याकडून कुणीही घेऊन जाणार नाही.”
आणखी वाचा-मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
शारदाताई लांबून हे सगळं बघत होत्या. तनय खेळायला निघून गेल्यानंतर त्यांनी तिच्याशी बोलायला सुरुवात केली, “अवंतिका, अजिंक्यनं ‘घटस्फोट हवा’ अशी नोटीस तुला पाठवल्यामुळे तू चिडली आहेस ना? पण गेली २ वर्षं तूच तर त्याला सोडून देण्याची भाषा करत होतीस. तुमच्या दोघांमध्ये संशय, गैरसमज, वैचारिक मतभेद झाल्यामुळे तू त्याचं घर सोडून इथं राहायला आलीस. तुमच्या दोघांमधील वाद मिटवेत, तुम्ही पुन्हा एकत्र यावं म्हणून त्याच्या नातेवाईकांनी, मित्रांनी प्रयत्न केले, एवढंच नाही तर तुझ्या बाबांनी आणि मी सुद्धा खूप प्रयत्न केले, पण तुमचे वाद मिटतच नाहीत. तुम्ही दोघं तुमच्या वैयक्तिक मतावर ठाम आहात, मग आता त्यानं घटस्फोटाची नोटीस पाठवली तर तुला एवढा राग का येतोय?
‘तू असं वागलास, मग मी आता तशीच वागणार,’ असं म्हणून, लहान मुलं भांडतात तसं तुम्ही दोघेही भांडताय. या सूडबुद्धीच्या पलीकडे जाऊन आयुष्याचा गांभीर्यानं विचार कधी करणार? ‘त्याच्याबद्दल आता मला काहीच वाटत नाही. आमच्यातील प्रेम केव्हाच संपलंय’ असं तूच म्हणाली होतीस ना? मग आता तुला नक्की कशाचं वाईट वाटतंय? कशाचा राग येतोय?’ त्याला मी चांगलाच धडा शिकवेन,’ ही सूड बुद्धी कशासाठी? त्यानं तुझ्यावर आरोप केले की, तू त्याच्यावर आरोप करणार. त्यानं एक दावा केला, की तू त्याच्यावर चार दावे दाखल करणार. यामधून काय मिळवणार आहात? सुडाचा आनंद? आणि अशा वातावरणात वाढणाऱ्या त्या कोवळ्या तनयचं काय? तुमच्या वादात त्याचं आयुष्यही कोमेजून जाणार!
अवंतिका, अजूनही विचार कर. तुम्ही दोघंही एकमेकांशी बोला. मन मोकळं करा. तुमच्यातील मतभेद खरोखर संपुष्टात येणार असतील तर दोघं मिळून ते संपवा आणि ते संपवता येणं शक्य नसेल तर दोघांचे मार्ग वेगळे करा. उगाचच रस्सीखेच करून, एकमेकांना संपवण्याचा विचार करून खुनशी वृत्तीने वागाल तर दोघंही आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकणार नाहीत. तुम्ही दोघे जो निर्णय घ्याल त्यावर तनयचं भविष्य ठरणार आहे. कोणताही निर्णय घेताना त्रास होणार, घुसमट होणार पण एकमेकांना उगाचंच त्रास देण्यात स्वतःची मानसिक शक्ती खर्च करू नका.”
आणखी वाचा-सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
शारदाताई जे सांगत होत्या ते आता अवंतिका शांतपणे ऐकत होती आणि विचार करत होती. खरंतर अजिंक्य सोबत राहायचं नाही हे तिनं केव्हांच ठरवलं होतं, आज त्याला सोडण्याचं दुःख नव्हतंच, पण जे ‘मी करायला हवं ते त्यानं का केलं? मग तो जे मागेल ते मी त्याला मिळूच देणार नाही,’ हा माझाही अहंकार आहे, हे तिच्याही लक्षात येत होतं. ती आईच्या गळ्यात पडून पुन्हा रडू लागली.
तिची अवस्था बघून त्या पुन्हा म्हणाल्या, “बेटा, लग्न मोडणं आणि आयुष्यभरासाठी जोडलेलं नातं तोडणं वाटतं तितकं सोपं नाही. पण ज्या नात्यातून खरंच मानसिक त्रास होतोय, जे दुरुस्त होणं शक्यच नाही याची खात्री झाली आहे. त्या नात्यापासून लांब राहिलेलं बरं. ते फार ताणत बसू नकोस. सारासार विचार करून निर्णय घे, भांडत बसू नकोस. तू कोणताही निर्णय घेतलास, तरी मी तुझ्या पाठीशी आहे.” आईच्या आश्वासक शब्दांनी अवंतिकाला धीर आला आणि तिचा सूडाग्नी शांत झाला.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
smita joshi606@gmail.com