नितेश संध्याकाळी घरी आला तेव्हा ‘लेटर बॉक्स’ मध्ये एक लिफाफा दिसला. काही तरी असेल म्हणून त्याने तो घरात आणून टेबलवर ठेवला. तो खूप दमला होता, तरी त्याचा चहा त्याला स्वतःलाच करून घ्यावा लागणार होता, अर्थात अनेक वर्षांपासून याची सुद्धा त्याला सवय झाली होती. बायको निकिता त्यांची मुले राजू आणि सोनूला घेऊन माहेरी निघून गेल्यापासून तो एकटाच राहात होता. दोघांच्यात वाद झाल्याने त्याने घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयात केस दाखल केली होती. सर्वांनी त्याला समजावून सांगितले होते, पण त्याच्या मनातील संशयाचं भूत काही केल्या जात नव्हतं म्हणूनच तो कोणतीही तडजोड करण्यास तयार होत नव्हता. खरं तर तोही आता कोर्ट-कचेरीला कंटाळला होता. नातं किती ताणायचं, असाही प्रश्न त्याला पडला होता. कधी कधी सोनूची खूप आठवण यायची, पण आता काहीच हातात राहिलं नव्हतं. वाद वाढत गेले होते.
आणखी वाचा : त्वचा कोरडी पडते? अशी घ्या काळजी…
चहा घेतल्यानंतर त्यानं तो लिफाफा हातात घेतला, कोठून आलाय काही कळत नव्हतं, फक्त त्याचा पत्ता त्याच्यावर होता. त्याने ते बंद पाकीट उघडलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. ते त्याच्या लेकीचं, सोनूचं पत्र होतं.
प्रिय बाबा,
आज माझा दहावीचा रिझल्ट लागला. मला ९६ टक्के मार्क मिळालेत. मला डॉक्टर व्हायचं आहे. खूप खूप शिकायचं आहे, पण तत्पूर्वी मला भेटायचंय तुला. सारं सारं काही तुला सांगायचं आहे. पण तू कुठे आहेस बाबा? मी आईला विचारलं, तर ती म्हणते, “तुझा बाबा हरवलाय.” कुठे गेलास तू आम्हाला सोडून? किती वर्ष झाली आता. मला आठवतंय, तुझी आणि आईची खूप भांडण झाली आणि नंतर तू निघून गेलास ते कायमचाच. नंतर कधी कधी कोर्टात भेटायचास तू. आता आम्ही आजीकडेच राहातोय इतके वर्ष. माझ्या सर्व मैत्रिणी आई-बाबांसोबत फिरायला जायच्या तेव्हा वाटायचं किती लकी आहेत त्या. त्यांना आई-बाबा दोघंही मिळालेत. मामा, मामी आणि त्या भावंडांबरोबर जेव्हा आम्ही पिकनीकला वगैरे जायचो तेव्हा खूप मजा यायची, पण तुझी आठवण यायचीच. शेवटी बाबा तो बाबाच असतो ना रे. मामा किंवा आजोबा काही बाबाची जागा नाही घेऊ शकणार.
आणखी वाचा : मधुमेहापासून बचावासाठी काय कराल, काय टाळाल?
आजी, आजोबा, मामा, मामी, आई सगळे खूप लाड करतात. राजूला आणि मला हवं ते देतात. पण तुला माहिती आहे, मला मात्र कायम बाबा हवा होता. तो मात्र मिळालाच नाही रे मला. राजू खूप लहान होता तेव्हा आपण सगळे एकत्र राहात होतो. आई, तू , मी, राजू सगळे मस्त फिरायला जायचो, खूप मज्जा करायचो. राजू लहान होता, त्याला आत्ता काहीच आठवत नाही, पण मला आठवतंय, तू माझ्याशी खूप खेळायचास, कुशीत घेऊन गोष्ट सांगत मला झोपवायचास, माझ्याशी लपाछपी खेळायचास, मला बागेत घेऊन जायचास. तू माझी परी आहेस, असं म्हणायचास. ते दिवस मला खरंच आठवतात. किती वेळा तू माझ्या स्वप्नात आलास, पण प्रत्यक्ष समोर कधीच आला नाहीस रे. कोर्टातून येताना आईने सांगितलं होतं, आता बाबाची आठवण काढायची नाही, आता मीच तुझी आई आणि मी तुझा बाबा. खरंच आईने सगळं केलं, काहीच कमी केलं नाही. पण, मनातून तुझी आठवण नाही गेली रे. तुझी खूप आठवण यायची, पण तुझं नाव काढलं की आई नुसती रडायची. मग मी तुझं नाव काढणंच बंद करून टाकलं. पण मनातल्या मनात मात्र आठवायचे तू कसा असशील? कुठे असशील? सारखा विचार करायचे कधीच बोलले नाही आईला. तुझा विषय काढला की तिला त्रास व्हायचा, आईने खूप शिकवलं. हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी दिल्या, पण फक्त बाबा दिला नाही रे मला. बाबा तू असं का केलंस? तू आम्हाला सोडून का गेलास? भांडण तुझं आणि आईचे होतं, आम्ही काय केलं होतं रे? साधं भेटायलाही यावंसं वाटलं नाही इतके वर्षात तुला आम्हाला? आम्हाला का बाबा नसावा?
आणखी वाचा : मेन्टॉरशिप : सुप्रिया सुळे -‘उत्तम ते सर्वोत्तम’ या प्रवासात लाभले अनेक मेन्टॉर्स!
शाळेतल्या मैत्रिणी काही काही बोलायच्या, माझ्या माघारी. ‘हिला बाबा नाही’,असं म्हणायच्या. माझ्या कानावर आलं की मी चिडायचे, भांडायचे त्यांच्याशी. सांगायचे, माझा बाबा आहे. तर म्हणायच्या, ‘दाखव कुठे आहे?’ मी एवढंच सांगायचे, ‘तू लांब गेला आहेस, येणार आहेस, आल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेन. बाबा खरंच येशील का रे तू? माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा मी गेले होते लग्नाला, ती सासरी निघताना, तिचे बाबा तिला जवळ घेऊन रडत होते. माझ्या लग्नाच्या वेळी तरी येशील? भेटशील मला? मला असंच जवळ घेशील? मला आणि राजूला आई आणि तू दोघेही हवे आहात. येशील का नक्की भेटायला? माझा हरवलेला बाबा परत येण्याची मी वाट पाहत आहे.
तुझीच
सोनू
आणखी वाचा : गौतमी पाटील ‘१०० टक्के’ चुकलेली नाही!
नितेशने पत्र बाजूला ठेवले. आपले डोळे पुसले. त्याच्या लेकीने त्याच्या अहंकाराचे पंख कापून टाकले होते. स्वतःच्या चुकांची त्याला जाणीव झाली. केवळ संशयामुळे आपण निकिताला दूर ठेवले, पण तिच्यावर सूड उगवताना आपल्या मुलांवर काय परिणाम होतोय याचा विचार केला नाही याचा पश्चात्ताप त्याला झाला. इतक्या काळानंतर का होईना त्याच्यातला बाबा विरघळला होता. आत्तापर्यंत मुलांवर केलेल्या अन्यायाचं काही अंशी तरी परिमार्जन करावं यासाठी तो आता मुलांना परत घेऊन येणार होता. ही रेशीम नाती कायद्यानं कधीच संपणार नाहीत याची खात्री त्याला झाली.
त्या पत्राची हळुवार घडी घालताना त्याने त्याच्यावर आपले ओठ टेकवले आणि सोनूला जवळ घेतल्याचा भास त्याला झाला.
smitajoshi606@gmail.com