“ रेवा अगं, सोसायटीच्या मिटींगला तू नव्हतीस. आपली नेहमीप्रमाणे ताम्हणी घाटातील वर्षा सहल ठरली आहे. येत्या रविवारीच जायचं सगळ्यांनी ठरवलं आहे. आपल्याला खूप प्लानिंग करायचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात मस्त मजा करू. मी आजच मला आणि मुलांना नवीन रेनकोट घेऊन येणार आहे. तुझ्याकडे चांगले रेनकोट आहेत का? की तू ही माझ्यासोबत खरेदीला येतेस?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ उर्वी, यावेळी मला नाही जमणार. मध्यंतरी सोनू सर्दी खोकल्यानं किती आजारी होता आणि माझी पण खूप कामं पेंडिंग आहेत. रविवारच्या सुट्टीतच सर्व कामं करावी लागतात.”

हेही वाचा – पिंपरी : हप्त्यासाठी मासे विक्रेत्या महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, दोन महिलांवर गुन्हा

“कामं होतील गं, ती नेहमीचीच असतात. पण आता बघायला मिळणारे धबधबे पुन्हा नसतील. आता पाऊसही थोडा ओसरला आहे. हीच वेळ आहे वर्षा सहलीचा आनंद घेण्याची. निसर्गाचं विलक्षण वैभव पाहून आपले ताणतणाव आपोआप दूर होतात. मला आणि उमेशला तर अशी भटकंती खूप आवडते.’’

“तेच गं, उमेश तुझ्या सोबत असतो, राकेश माझ्या सोबत कधी असतो का? ट्रिपमध्ये सर्व जोडपी त्यांच्या मुलांबरोबर असतात. आमच्याकडे फक्त सोनू आणि मीच असतो. त्यापेक्षा मी न आलेलं चांगलं.”

“ अच्छा, म्हणजे राकेश सोबत असणार नाही हे दुःख आहे तर? अगं, या ट्रिपची कितीतरी तयारी तोच करून देतो,पण त्याचा बिझनेस असल्याने रविवारी त्याला शक्य होत नाही आणि इतर सर्व नोकरदार असल्याने आणि मुलांनाही रविवारची सुट्टी असल्याने आपण रविवारचा दिवस ठरवतो आणि दरवर्षी तू आणि सोनू सर्वांसोबत येताच ना?”

“उर्वी, त्याचा बिझनेस आहे. रविवारी त्याची जास्त धावपळ असते. त्याला जमतं नाही. हे सगळं मी लग्न झाल्यापासूनच स्वीकारलं आहे. ॲडजेस्ट केलेलं आहे. मी कित्येक गोष्टीमध्ये सॅक्रिफाइज करते, पण त्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही. लग्नापूर्वीही त्याचा हाच बिझनेस होता तेव्हा तो काहीही करून माझ्यासाठी वेळ काढायचा. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होतो, एकमेकांशिवाय काहीच सुचत नव्हतं, पण लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच चित्र बदललं. त्याला त्याचा बिझनेस महत्वाचा वाटू लागला. प्रत्येक वेळी मी त्याला समजावून घ्यायचं. त्याच्या सवडीनुसार कधीतरी तो म्हणेल तेव्हा मी सुट्टी काढून त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जायचं, हेच चालू झालं. आमच्या रीलेशनशिपमधील त्याचा इंटरेस्ट हळूहळू कमी होऊ लागला आहे, आमचं नातं ‘स्लो फेड’ होत चाललं आहे.”

“रेवा, तू काही गोष्टींचा अतिविचार करतेस. तुझ्या म्हणण्यानुसार तो वागत नाही. तुला वेळ देत नाही म्हणून त्याचा तुझ्यातील इंटरेस्ट कमी झाला आणि तुमचं नातं ‘स्लो फेड’ झालं असं तुला वाटतंय. पण मला सांग तो मुलांचं सगळं व्यवस्थित करतो ना? तुला आणि त्यांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेतो ना?”

“उर्वी, राकेश त्याच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतो. तो एक चांगला बाप आहे. चांगला माणूस आहे, पण चांगला नवरा नाही. तो माझ्या फिलिंग्स समजूनच घेत नाही. तो घरात आहे, म्हणजे माझ्या बरोबर आहे असं त्याला वाटतं, पण घरात मोबाईलवर त्याचं काम चालू असतं, तो माझ्याशी बोलतच नाही. चहा घेताना त्याच्या शेजारी बसलं तरी त्याचं दुसरंच काहीतरी चालू असतं. पूर्वीसारखं तो स्वतःहून मला कधीही जवळ ओढून घेत नाही किंवा माझी चौकशी करीत नाही. त्याच्या साध्या स्पर्शाचीही मला गरज असते हे त्याला कळतंच नाही.’’

हेही वाचा – पुणे : लोहगावमधील आरआयटी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर; वनविभाग, अग्निशमन दलाकडून शोधमोहीम

“रेवा, तूच म्हणतेस की घरातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तो व्यवस्थित पार पाडतो. कर्तव्याला कधी चुकत नाही, मग फक्त तुझ्या फिलिंगचा तो विचार करत नाही असा अर्थ काढून घेऊन तू याचा स्वतःलाच का त्रास करून घेतेस?. तुझं म्हणणंही आजिबात चुकीचं नाही, तुझ्या भावना ओळखून त्याने प्रत्येक गोष्टीत तुझा विचार करावा हे योग्य आहेच, पण तरीही आता परिस्थती बदलली आहे आणि जबाबदाऱ्यांनुसार प्राधान्यक्रमही बदलतात. आता पूर्वीसारखं व्यवसाय सोडून तो तुझ्या मागे येणार नाही कारण त्याला प्रेम, नातं टिकवायचं आहेच, पण त्याचबरोबर आर्थिक जबाबदाऱ्याही पार पाडायच्या आहेत. तूसुद्धा आई झालीस तेव्हापासून तू राकेशच्या अगोदर सोनूचा विचार करू लागलीस की नाही? म्हणून म्हणते, प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत राकेशनं असायलाच हवं हा अट्टाहास सोडून दे. तू ही त्याच्या भावना समजावून घे. त्याला त्याची स्पेस दे आणि सतत त्याच्याभोवती फिरणाऱ्या विचारांतून थोडी बाहेर ये.”

उर्वीचं बोलणं रेवा ऐकत होती. तिनेही या सर्वांचा विचार केला आणि म्हणाली, “तू म्हणते आहेस ते सर्व मला पटलं आहे, चल, आपण तयारीला सुरुवात करू. मी वर्षा सहलीला येईनच, पण आमचं नातं ‘स्लो फेड’ न होता चांगल्या पद्धतीने कसं फुलेल, नव्हे धावेल याचा विचार मी प्राधान्याने करेन.”

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counselling want to make a slow fade relationship fast ssb