-डॉ. स्मिता प्रकाश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ स्वरा, तू काय ठरवलं आहेस?”
“आई, तू कशाबद्दल विचारते आहेस?”
“ स्वरा, तुला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल विचारते आहे ते. ”
“मग, माझं उत्तर सुद्धा तुला माहिती आहेच.”
“अगं, पण तू एवढा हट्टीपणा का करते आहेस? संदीपला तुझ्यासोबत यायला वेळ नसेल तर तुला एकटीला केतकीच्या लग्नाला यायला काय हरकत आहे? आणि आम्ही सर्वजण सोबत असणारच आहोत. तुझी चुलत बहीण आहे ती, तुझ्या लग्नात तिनं किती मदत केली होती आणि आता तू तिच्या लग्नाला आली नाहीस तर तिला काय वाटेल?”
“आई, मी हे सर्व संदीपला सांगितलं आहे, पण तरीही तो माझ्यासोबत यायला तयार नाही. मी सुद्धा लग्नाला येणार नाही.”

“ स्वरा, संदीपला उगाच वेठीस धरू नकोस. त्याच्या अडचणी त्यानं तुला सांगितल्या आहेत.”
“ आई, लग्नाच्या अगोदर संदीप माझी खूप काळजी घेत होता. मला काय हवं नको ते त्याला मी न सांगताच सारं काही समजायचं. मला एकटीला तो कधीही सोडायचा नाही,पण जसं लग्न झालं तसं तो बदलला आहे ”
“ स्वरा, लग्न झाल्यानंतर नाती बदलतात. प्रियकराचा ‘नवरा’ होतो. प्रेयसीची ‘बायको’ होते आणि मग अपेक्षा बदलतात. काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही येतात आणि त्याही सांभाळाव्या लागतात. तूच त्याला समजावून घ्यायला हवं. ”
“आई, मीच एकटीनं समजावून घ्यायचं? आता जर केतकीच्या लग्नाला तो आला नाही, तर पुढच्या दोन महिन्यात त्याच्या बहिणीचं लग्न आहे, तेव्हा मीही जाणार नाही, मग त्याला कळेल.”

आणखी वाचा-बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा? 

“ स्वरा, अशी चुकीची बरोबरी योग्य नाही. जोडीदाराच्या मनाचाही विचार करायला हवा. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. एकमेकांना समजून घेणं, सांभाळून घेणं याला खरं संसार म्हणतात. संदीप तुझी काळजी घेतो. तुझ्या आवडीनिवडीचा विचार करतो. अडीअडचणीच्या प्रसंगात नेहमीच तुला साथ देतो. तुझ्या पाठीशी उभं राहतो. हे तुलाही चांगलंच माहिती आहे, मग त्याचीही काही महत्वाची कामं असतील तर तू त्याचा विचार करायला हवा. केतकीच्या लग्नाला यायला जमत नाही याचं त्यालाही वाईट वाटतंय, पण ऑफिसची महत्वाची कामं आहेत म्हणून त्याला रजा मिळत नाहीये. ”

“ सगळी नाटकं आहेत त्याची, स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला रजा आधीच मंजूर करून घेतली ना? तेव्हा ऑफिसची कामं नाहीत? प्रत्येक वेळी मीच तडजोड करायची, मीच समजून घ्यायचं?
“स्वरा, तडजोडी तर कराव्याच लागतात. आम्ही तडजोडी केल्या नसतील का? खूप गोष्टी आम्हीही सोडून दिल्या,तेव्हा आमचा संसार झाला.”
“आई, तुमचा जमाना वेगळा होता, तुम्ही संसार केला नाही. तो रेटला. तू स्वतःच्या मनाला मारून माघार घेतलीस. तुझं गाण्याचं करिअर तू सोडून दिलंस. प्रत्येक गोष्टीत तू तडजोड केलीस. मी ती करणार नाही.”

आणखी वाचा-घटस्फोटानंतर दोन मुलांचा साभाळ करत ४५ व्या वर्षी गॅरेजमधून सुरू केली कंपनी, कोण आहेत मीरा कुलकर्णी?

“स्वरा, तुझ्या बाबांनी मला गाणं सोडण्याची जबरदस्ती केली नव्हती. घरातील कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे मी ठरवलं होतं. मी मनानं स्वीकारलेली ती तडजोड होती. त्या तडजोडीचाही मी कधी बाऊ केला नाही. लग्न झाल्यानंतर भूमिका बदलतात, ‘मी’ ऐवजी ‘आम्ही’ चा विचार करावा लागतो. तू असं वागतोस, म्हणून मी तसच वागणार असं करत बसलीस तर, चिडचिड, भांडण वाढतं वाढतील. घरातील वातावरण बिघडेल. तुलाही आनंद मिळणार नाही आणि त्यालाही नाही.”

स्वरा विचार करू लागली. आई जे सांगत आहे ते बरोबरच आहे. माझे कुटुंबीय तर आहेत ना बरोबर. मी सर्वांसोबत लग्नाला गेले नाही तर मलाही घरात चैन पडणार नाही. कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. माझी उगाचच चिडचिड होईल. दोघांमध्ये वाद वाढेल. मग नेहमीचंच भांडणं-अबोला-घुसमट-आणि बरंच काही. त्यापेक्षा समजुतीनं घेतलं तर माझा आनंद मला मिळवता येईल. संदीप सोबत नाही याचं वाईट वाटणार आहेच, पण आता थोडं तडजोड केली तर पुढच्या गोष्टी टळतील. दोघांच्या नात्यात कटुता येणार नाही.
सगळा विचार करून ती म्हणाली, “आई, मी तुमच्या सोबत येते. खूप कामं बाकी आहेत. पिकोसाठी दिलेल्या साड्या आणायच्यात, ब्लाऊजला मॅचिंग लटकन आणावी लागणार आहे आणि पार्लरमध्येही जाऊन यायचं आहे. मी निघते. ”
तिची लगबग बघून सुलभाताईंचा जीव भांड्यात पडला.

लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.

smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counselling why compare in relationship between husband and wife mrj
Show comments