तीन महिन्यापूर्वी निधी आणि वरूणचं लग्न ठरलं होतं. त्यांचा विवाह सहा महिन्यांनी होणार होता. दोघेही खूप खूष होते, पण याकाळात वरुण निधीसाठी सतत भेटवस्तू पाठवू लागला. एकदा त्याने तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट पाठवलं होतं. त्याने ते खासगी कुरियरने पाठवलं. त्या दिवशी अचानक घरी आलेलं पार्सल बघून निधी प्रचंड खूश झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निधीची आतेबहीण मुक्ता निधीकडे आली होती. निधीचा आनंद तिने मोबाईलमधे शूट केला आणि गंमतीत पार्सल अनपॅक करतानाचा व्हीडिओही काढला. पार्सलमधे निधीसाठी दोन सुंदर ड्रेस होते. एक डायरी, पर्स, दागिने असं बरंच काही होतं. आनंदाचा बहर ओसरण्यापूर्वीच मुक्ताने दोन्ही व्हीडिओ वरुणला पाठवले. पुढच्या १० मिनिटांत वरुणचा व्हीडिओ काॅल आला. तो निधीला म्हणाला, नीट बघ. त्यात आणखी वस्तू असायला हव्यात. जरा मला सगळ्या गोष्टी नीट दाखव.

“हे बघ, हा पार्सल पॅक आणि हा अनपॅक केल्यानंतरचा बाॅक्स आहे.”

“निधी, काहीतरी गडबड आहे. अगं, या पार्सलमधे अजून दोन बांगड्या, कानातील टाॅप्स आणि एक अँकलेट असायला हव्यात.”

”वरुणच्या फोननंतर निधी आणि मुक्ता दोघी अस्वस्थ झाल्या. त्यांना कळेना काय करायचं. निधीने तिच्या बाबांना फोनवरून जे घडलं ते सगळं सांगितलं. बाबा म्हणाले,”काळजी करू नको. मी येताना कुरियरच्या ऑफिस मधे जाऊन येतो.”

हेही वाचा… ‘हॉर्वर्ड’च्या पहिल्या कृष्णवर्णीय व दुसऱ्या महिला अध्यक्ष – क्लॉडिन गे

त्यादिवशी बाबाना त्या ऑफिसमधे कुणी भेटलं नाही. बाबांचे दोन तीन हेलपाटे झाले. त्यांनी ऑफिसच्या बाहेरील बोर्डवरून संपर्क नंबर घेतला. त्यादिवसापासून निधी रोज त्यांना फोन करत होती. पण संपर्क होत नव्हता. मग एक दिवस ती कार्यालयात गेली. सुदैवाने ऑफिस चालू होतं. तिथे तिने कर्मचार्‍याला घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले,”आमच्याकडे असं होणं शक्यच नाही. तरी तुम्ही तक्रार लिहून द्या.” तिने तक्रार लिहून दिली. तिच्या बाबांनी तिला एक चांगली सवय लावली होती. कुठेही तक्रार करायची असेल, कुठलंही कागदपत्र सही करून द्यायचं असेल तर त्याच्या कमीतकमी दोन काॅपीज करायच्या. एक काॅपी नेहमी आपल्याकडे ठेवायची. तिने तसंच केलं. तिने दोन अर्ज लिहिले कारण तिथे जवळपास झेराॅक्स सेंटर नव्हतं. तिने एक तक्रार अर्ज कर्मचार्‍याकडे दिला. दुसर्‍या अर्जावर त्यांच्याकडून पोच घेतली. त्यांनी तिला ‘चौकशी करून कळवतो’ असं आश्वासन दिलं. ती घरी आली. तिकडे वरुणही चौकशी करत होता. जमेची बाजू अशी होती की, वरुणकडेही पॅकिंग करतानाचा व्हीडिओ होता. पुढे हेच दोन्ही व्हीडिओ

पुरावे म्हणून उपयोगी पडतील याचा त्यांना काही अंदाजच नव्हता.

हेही वाचा… परदेशी जाण्याच्या कारणास्तव घटस्फोटित स्त्रीला अपत्याचा ताबा नाकारता येणार नाही

बरेच दिवस झाले तरी कुरियरच्या ऑफिस कडून काही उत्तर आलं नाही. निधीला खूप वाईट वाटलं होतं. वरुणने प्रेमाने पाठवलेल्या काही वस्तू तिच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या. तिने ग्राहक तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल करायचं ठरवलं. ती ग्राहक तक्रार निवारण केंद्राच्या कार्यालयात गेली. तिने तिची हकिगत सांगितलं. तेंव्हा तिथल्या कर्मचार्‍यांनी तिला तक्रार करण्याची पध्दत समजाऊन सांगितली.

“इथे तुम्ही लेखी तक्रार करू शकता किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करता येते. तुमच्या केसमधे कुरियर सेवेत कमतरता दिसून येते. कुरियर कार्यालयाकडून मिळणार्‍या सेवेबद्दल तुमचे समाधान झाले नाही. तुम्ही त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवू शकता. त्यानंतरही तक्रारीचं कारण योग्य असेल तर माफीचा अर्ज करून तक्रार नोंदवता येते. तुम्ही विचार करून कळवा.”

निधीने ताबडतोब तक्रार अर्ज भरून तक्रार नोंदवली. तिला मनातून प्रचंड भीती वाटत होती. पण तिने तक्रारीचं पाऊल तरी उचललं होतं. आता माघार नव्हती. ती वेळोवेळी वरुणला सगळं फोनवरून सांगत होती. ही तक्रार करताना तिला धीर देण्यासाठी एका कर्मचार्‍याने अधिकची माहिती दिली होती.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पित्तामुळे हैराण

अशाच एका कुरियर सेवा केंद्राकडून एका व्यक्तीच्या पार्सलबद्दल छेडछाड झाली होती. त्या पार्सल मधल्या २०००० रुपयांच्या वस्तू गायब होत्या. त्या व्यक्तीने ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार केली. ठोस पुरावे आणि योग्य तक्रार यामुळे ग्राहकाला त्या कुरियर कार्यालयाकडून २०००० रुपयांची भरपाई आणि ग्राहक न्यायालयाच्या खर्चापोटी ५००० रुपयांचा दंड ठोठावला. निधीला न्यायालयाचा हा निर्णय ऐकून थोडं बरं वाटलं.

निधीच्या तक्रारीमधे खरेपणा होता हे सिध्द करण्यासाठी तिच्याकडे पार्सल पॅक आणि अनपॅक करतानाचे व्हीडिओ आणि तक्रार केल्याची काॅपी होती. निधी जागरुक ग्राहकराणी होती. तिच्याप्रमाणे इतरांनी देखील फसवणुकीविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे यावं तरंच समाजात ग्राहक हक्कांबद्दल जागृती होईल.

समुपदेशक, सांगली.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Courier services consumer complaints and consumer court decision dvr