प्रिया भिडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रावण घेवड्यालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ या प्रकारात मोडतो. शिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात बरेच संशोधन झाले असल्यामुळे विविध प्रकारचे घेवड्याचे बी बियाणांच्या दुकानात मिळते. आपल्याकडे श्रावण घेवड्याची ‘फाल्गुनी’ हा उपप्रकार खूप चांगला आणि भरघोस वाढतो. याच्या शेंगा बारीक, गुळगुळीत, मऊ आणि गडद हिरव्या रंगाच्या असल्यामुळे हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. याच्या शेंगा १३ सें.मी. ते १५ सें.मी. लांबीपर्यंत वाढतात. खोड कणखर आणि झाड झुडुपासारखं वाढत असल्यामुळे शेंगांचा भार हे झाड सहजी पेलू शकते. परंतु शेंगा जमिनीला टेकल्या तर कुजतात. त्या कुजू नयेत म्हणून झुडुपाखाली बराच पालापाचोळा किंवा मका, ऊस यांचे पाचट टाकावे.

हेही वाचा >>> नातेसंबंध: त्यानं घरजावई म्हणून राहावं! मी सासरी नाही जाणार!

‘स्नॅप बीन्स’च्या शेंगा थोड्या गोलसर आणि चपट्या असतात. शेंगांची भाजी करताना त्याच्या शिरा काढव्या लागतात, अन्यथा भाजी चांगली होत नाही. रनर बीन्स या श्रावण घेवड्यापेक्षा थोड्या लहान असतात. श्रावण घेवड्याच्या एका उपप्रकारात शेंगावर जांभळट छोट्या रेषा असतात. याच्या बिया श्रावण घेवड्याच्या कोवळ्या पोपटी बियांपेक्षा थोड्या फिकट असतात. आणि त्यावरही जांभळट रेषा असतात. ‘वॅक्स बीन्स’ या घेवड्याच्या झुडूप प्रकारात शेंगा पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या असतात. ‘बाजीराव’ किंवा ‘राणी’ घेवड्याच्या प्रकारात शेंगा चपट्या आणि जांभळ्या रंगाच्या असतात. झाड जास्त उंच होत नसलं तरी शेंगांचं प्रमाण खूप असतं! कोवळ्या शेंगा खूप वाढतात. काळा घेवड्याच्या शेंगा पिवळट, पांढरट आणि गुलबट, किरमिजी रंगाच्या असतात. ह्याच्या शेंगाचं बाहेरचं आवरण – टरफलं भाजीसाठी वापरत नाहीत. काळ्या बियांची उसळ चांगली होते. ‘राजमा’ हा लाल किंवा किडनीच्या आकाराच्या बिया असलेला प्रकार खूप लोकप्रिय आहे. ह्यातही मोठ्या दाण्याचा, गुलबट-तांबडट आणि छोटय़ा गडद तांबडा-तपकिरी रंगांच्या बियांचा राजमा प्रसिद्ध आहे. पांढऱ्या बियांचा राजमाही आता लोकप्रिय होऊ लागला आहे. ‘पी बीन्स’ ह्या वेलीसारख्या घेवड्याच्या बिया दुरंगी रंगाच्या म्हणजे तांबडट – तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या असतात. तर, ‘पिंटो बीन्स’ ह्या प्रकारात बिया सुरकुतलेल्या दिसतात. शेंगा उकडून तशाच खातात किंवा तेलावर परतून कुरकुरीत करून खातात. श्रावण घेवड्याचा वेलासारखा पसरणारा ‘ब्लु कोको’ ह्या उपप्रकारात शेंगा आणि बिया जांभळ्या रंगाच्या असतात. बिया शिजवल्या की त्यांचा रंग काळा होतो. श्रावण घेवड्याच्या ह्या उपप्रकारात जवळजवळ सगळ्यांच्याच शेंगांची आणि बियांचीही भाजी किंवा उसळ करतात.

हेही वाचा >>> चौथ्या सीटसाठी वादावादी कशाला? ‘लोकल’ नियमांची खरच गरज आहे का?

लिमा बीन्स, सोयाबीन्स, फावा बीन्स हे घेवड्याचेच प्रकार आहेत, पण त्यांच्या शेंगांची भाजी करत नाहीत. बियांची उसळ करतात किंवा वाळवून कडधान्यं करतात. ही अनेक दिवस टिकतात. ह्यांना ‘शेलींग बीन्स’ असंही म्हणतात. घेवड्याचे सर्वच प्रकार वाढवताना योग्य काळजी घेतली तर एकेका झाडाला खूप शेंगा लागतात. फुलं आल्यानंतर हवा कोरडी असेल तर झाडाला भरपूर पाणी घाला, पण पाणी झाडाभोवती साचू देऊ नका. ठरावीक उंचीचं झाड झालं की त्याचा शेंडा खुडा म्हणजे फुलं लवकर येतील. त्या काळात झाडाला पातळ सेंद्रिय खत घाला. शेंगांची पूर्ण वाढ झाल्याशिवाय शेंगा खुडू नका. शेंगांमध्ये बी दिसायला लागल्यावर हलक्या हाताने शेंगा खुडा. शक्यतो कात्रीने शेंगा कापू नका. शेंगांचा पहिला बहार काढला की झाडाला पातळ सेंद्रिय खत आणि भरपूर पाणी घाला म्हणजे शेंगांचा दुसरा बहार मिळेल; पण ह्यावेळच्या शेंगा थोड्या लहान वाढतात.

हेही वाचा >>> गोठा ते रॅम्प : पूनम पाटलांचा थाट!

घेवड्याच्या कुंडीत झेंडू किंवा नारिंगी केशरी रंगाची फुलं येणारा नेस्ट्रॅशियम लावा. परसबागेतही दोन ओळींमध्ये ही छोटी वाढणारी रोपं लावावीत, म्हणजे घेवड्याची मुळं कुजणार नाहीत. जमिनीत घेवडा लावला असेल तर त्यामध्ये मुळा, मका यांची दोन तीन झाडं लावा, पण त्याजवळ कांदा, लसूण लावू नका. घेवड्याची पानं आणि शेंगा हे गोगलगायीचं आवडतं खाद्य आहे. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या, रोपाच्या भोवती पाण्याच्या बाटलीचा तळाचा भाग कापून ठेवा. आणि खोडावर मोठ्या प्लॅस्टिक बाटलीचे गोल भाग कापून ठेवा. कुंडी विटांवर किंवा प्लास्टिकच्या ताटलीत घालून ठेवा, कडेने मुंग्यांची पावडर घाला. घेवड्याचं बी लावण्यापासून ते शेंगा येईतोपर्यंत योग्य कळजी घेतली की शेंगा भरपूर लागतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultivating legumes on balconies article about bean cultivation on terrace cultivating bean on balconies zws