ग्रीन सॅलडपेक्षा रंगीत सॅलडमध्ये रफेज-फायबरचं प्रमाण कमी असतं, पण त्यांच्यात रंगीत द्रव्य (ॲन्थोसायनीन, बिटा कॅरोटिन वगैरे) असतं. रंगीत सॅलडचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास शरीरातल्या पेशींचा अकाली नाश होत नाही. बिटा कॅरोटिनमुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते आणि आपल्या शरीरात त्याचं रूपांतर ‘व्हिटॅमिन ए’मध्ये होतं, की ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. गाजर, लाल-पांढरा मुळा, बीट, टोमॅटो, काकडी, स्वीट कॉर्न, रंगीत ढोबळी मिरची या रंगीत सॅलडमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात रंगीत द्रव्यं असतात. ग्रीन सॅलडप्रमाणे रंगीत सॅलडमध्ये समाविष्ट असलेले सगळे प्रकार आपण ‘किचन गार्डन’मध्ये वाढवू शकतो. गाजर, मुळा, बीट या वनस्पतींच्या मुळांमध्ये अन्न साठवलं जातं आणि त्यांचा रंगीत सॅलड म्हणून आहारात समावेश केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘किचन गार्डन’मध्ये हे सॅलडचे प्रकार वाढवायचे असल्यास कुंडी एक फूट तरी खोल असली पाहिजे. रंगाचे रिकामे मोठे डबे, फुटकी बादली, मोठी पॉलिथीन बॅग (शक्यतो काळी), भाजी साठवण्याचे मोठे ट्रे यामध्ये सुद्धा हे प्रकार वाढवता येतात. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ‘कंटेनर्स’च्या तळाला आणि कडेला थोडी छिद्र पाडून घ्यावी. त्यात समप्रमाणात शक्यतो तांबडी माती (नसल्यास नेहमीची माती चालते), कुजलेलं शेणखत (अगदी बारीक केलेलं), कोकोपीट घालावे. अगदी बारीक वाळू असेल तर ती त्यात मिसळावी, म्हणजे पाणी घातल्यावर माती चिकट होणार नाही, ती सच्छिद्र राहली. कुंडीतल्या मातीत मोठी ढेकळं किंवा काटक्या, न कुजलेला पालापाचोळा नाही ना, याची खात्री करून घ्या, नाही तर गाजर, मुळा, बीट मातीत वाढत असताना अडथळा येऊ शकतो.

हेही वाचा… नातेसंबंध- डेटिंगला जाताना…

काही वेळेस ते पूर्ण वाढणार नाहीत किंवा ते दुभंगून त्यांची विचित्र पद्धतीने वाढ होईल. कोकोपीट ऐवजी ‘परलाईट’ वापरले तरी चालते. गादी वाफ्यावर हे लावायचे झाल्यास वेगळी पद्धत वापरावी लागते. दोन गादी वाफ्यांच्यामध्ये जो उंचवटा असतो त्यात त्याचे बी पेरावे, म्हणून त्यांची मुळं वाढताना त्यांना योग्य खोलगट भाग मिळेल, त्यात त्यांची वाढ चांगली होईल. या उंचवटय़ावर तीन इंचांच्या अंतरावर साधारणपणे दोन पेरं खोल गोल करा. एका ठिकाणी दोन ते तीन बिया पेरा. बिया बारा तास अगोदर पाण्यात भिजवून मग पेरल्यास उगवण्याचा कालावधी कमी होतो. कुंडीत बी पेरायचे झाल्यास विरळ पेरा. एकाच ठिकाणी बी पडणार नाही याची काळजी घ्या. बी पेरल्यानंतर त्यावर मातीचा थर द्या. हलके पाणी घाला आणि एक दिवस त्यावर ओले वर्तमानपत्र अलगद घालून ठेवा.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: स्वागत आरोग्यदायी जीवनाचे

गाजराचे सर्व बी एकदम उगवून येत नाही. पहिल्या आठवडय़ात काही बी उगवेल. साधारणपणे दोन-अडीच आठवड्यात बरेच बी उगवून येईल. बी पेरल्यानंतर अंदाजे २५ दिवसांनी किंवा रोपाला पानांच्या तीन ते चार जोड्या आल्यानंतर एकाच ठिकाणी अनेक रोपं आली असतील, तर त्यातले जोमाने वाढणारे रोप ठेवून बाकीची कात्रीने कापून टाका. उपटून काढू नका. कारण जोमाने वाढणाऱ्या रोपाच्या मुळाला धक्का लागेल, तिथली माती सुटून येईल. रोपाचं खोड वाकलं असेल ते रोप शक्यतो काढून टाका किंवा मातीचा आधार देऊन खोड ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर गाजर न वाढता नुसती पानं वाढत राहतील. बी पेरल्यानंतर दीड महिन्याने कुंडीतल्या मातीत थोडं सेंद्रिय खत घाला. गादी वाफ्याच्या उंचवट्यावर गाजराचे बी पेरले असेल तर तिथे काळजीपूर्वक खत घाला. गादी वाफ्यात त्याच वेळेस ‘लेट्यूस’ लावा, कारण ती एकमेकांना पूरक आहेत. ‘लेट्यूस’ला गाजराच्या मानाने खत कमी लागते. गाजर जमिनीत वाढत राहते, वर खोडावर पानं वाढतात. पाणी घालताना किंवा अन्य काही कारणांनी गाजराचा रंगीत भाग थोडा जरी मातीच्या वर आला तर तो भाग हिरवा तर होतोच पण गाजराची चव कमी होते आणि त्यातले ॲन्थोसायनीन या रंगीत द्रव्याचे प्रमाण कमी होते आणि अशा गाजरांमध्ये पौष्टिकता कमी होते. गाजराच्या अनेक जाती आपल्याकडच्या हवामानात वाढतात, कुंडीत, वाफ्यांमध्येही लावता येतात. ‘अर्ली नॅन्तेज’ ही युरोपियन नारिंगी रंगाची जात आपल्याकडे कुंडीतही चांगले वाढते.

हेही वाचा… मातापित्यांची मालमत्ता हवी, पण त्यांची जबाबदारी नको?… वृद्ध आई-वडिलांनी हे वाचायलाच हवं!

महाबळेश्वरसारख्या ठिकाणी ती जास्त चांगल्या प्रमाणात वाढते. घरातली कुंडी थंड पाण्यात ठेवावी, कुंडीच्या आजूबाजूला ओलावा राखला तर कुंडीतल्या गाजरालाही नारिंगी रंग येतो. कुंडीत फार पाणी साचू देऊ नका. अन्यथा गाजर मातीतच कुजेल. ‘नॅनतेज’चे गाजर मध्यम लांबीचे आणि टोकापर्यंत सारख्याच लांबीचे असते. सगळ्यात मधला भाग अगदी थोडा असल्यामुळे गाजराचा भाग वाया जात नाही. खाताना ‘नॅनतेज’ थोडेसे कोरडे लागते, पण चव चांगली आणि या जातीतले गाजर लवकर तयार होते. ‘चॅन्तनी’ या जातीचे गाजर गडद लालसर नारिंगी रंगाचे असल्यामुळे अतिशय आकर्षक दिसते. याशिवाय ‘कोअरलेस’, ‘इम्परेटर’ या जातीही कुंडीत/ वाफ्यात वाढू शकतात. ‘पूसा केसर’ या भारतीय संकरीत जातीत पानांची वाढ कमी, पण गाजराची वाढ चांगली होते. शिवाय मध्यभागातला कठीण भाग अतिशय कमी पण लाल रंगाचा असतो.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultivation of carrots on terrace garden dvr
Show comments