गृहसजावटीमध्ये अंतर्गत सजावटीसाठी झाडांचा वापर होतो तो प्रामुख्याने पर्णशोभेच्या, सावली आवडणाऱ्या झाडांचा. पण उठावदार सजावटीसाठी फुलांना पर्याय नाही. यातूनच पुष्परचनेच्या कलेचा उगम झाला व तंत्रशुद्ध कलानिर्मिती झाली. फुलांच्या सौंदर्यपूर्ण रचना करताना भौमितीय आकार, त्रिमितीय अवकाश, उंची अशा विविध घटकांचे महत्त्व लक्षात घेतले गेले. त्यामुळेच जगभरात पुष्परचनांसाठी फुलांचा वापर होतो. त्यामध्ये अधिराज्य आहे लांब दांड्याच्या दीर्घजीवी फुलांचे. या अधिराज्याचा सम्राट आहे, अर्थातच गुलाब आणि सम्राज्ञी लिली!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिलीसी या कंदवर्गीय कुटुंबात लिलीचे असंख्य प्रकार आहेत. कंदवर्गीय फुले एकदा बागेत लावली की ती त्यांच्या फुलण्याच्या ऋतूमध्ये फुलतात अन् दीर्घकाळ आनंद देतात. मध्यम आकाराच्या कुंडीत कंद लावावेत. कंदांना पाणी जास्त घातल्यास ते कुजण्याचा धोका असतो. लिलीस तलवारीसारख्या पात्याची लांब पाने येतात. लिलीच्या जातीप्रमाणे पानांची रुंदी व रचना बदलते. पानाच्या रचनाही लोभस असतात. कंदातून दांडावर येऊन त्याच्या टोकास फुले येतात. एका दांड्याला एकच फूल येणारी पिवळी, पांढरी, गुलाबी लिलीची फुले व पानेही नाजूक असतात. फुले उन्हात दीर्घकाळ टिकतात. आडवी कुंडी अथवा सुंदर बरणीत वा बाऊलमध्ये कंद लावल्यास अख्खी कुंडी पुष्परचनेसारखी ठेवता येते. फुले सुकल्यावर कळ्यांची फलधारणा होऊन काळ्या चपट्या बिया येतात. या बियांपासूनही रोपे तयार होतात. मोठ्या लिलीच्या कंदामधून जाड दांडा वर येतो व टोकास कर्ण्यासारखी तीन-चार फुले येतात.

हेही वाचा… नातेसंबंध: बॉयफ्रेंड तुमचं खाजगी आयुष्य सार्वजनिक करतो का?

मे, जून, जुलैमध्ये ही फुले फुलतात. गर्द लाल, पांढरा, लिंबाणी, गुलाबी, फिकट केशरी असे अनेक रंग लिलीमध्ये मिळतात. फुले येऊन गेल्यावर कंद काढून टाकावेत. कुंडीत कंद वाढल्यास विरळणी करावी व कंदांची देवाणघेवाण करावी. सुट्या पाकळ्यांची नाना रंगांमध्ये मिळणाऱ्या मोठय़ा लिलीची फुले पुष्परचनेसाठी फारच लोकप्रिय आहेत. याचे कंद रोपवाटिकांमध्ये अथवा फुलांच्या प्रदर्शनात मिळतात. फार थंड हवामानात येणाऱ्या लिलीचे कंद आपल्याकडे चांगले फुलतीलच असे नाही.

केवळ मे महिन्यात फुलणारा, अनेक लाल रंगांच्या फुलांचा गोल बॉल, जो ‘मे फ्लॉवर’ नावाने प्रचलित आहे. हा लिलीसी कुटुंबातला नसला तरी दिसतो छान. फुलं येऊन गेल्यावर कंद जमिनीत विश्रांती घेतो पुढच्या मेपर्यंत. ग्लॅडिओलस हा अतिपरिचित कंद लावल्यावर सुंदर लांब पातीची पाने येतात. नंतर एकच नाजूक दांडा वर येऊन कळ्यांची जणू दीपमाळच फुलते. तळातून वर एकेक फूल उमलत जाते. पुष्परचना करणाऱ्यांची ही आवडती फुलं. याचे पांढरा, केशरी, लिंबोणी, लाल सर्वच रंग छान दिसतात. फुलकाड्या खूप टिकतात. कोणतेही एक-दोन रंग निवडून कुंडीत लावता येतात. फुले येऊन गेल्यावर, पाने सुकल्यावर कंदांना विश्रांती द्या. त्या काढून सावलीत वाळवून परत लावा.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: सुमधुर दही

कंदवर्गातील आणखी एक लोकप्रिय सदस्य, मनमोहक सुगंधाने सायंकाळ भारून टाकणारा निशिगंध! निशिगंधाची एखादी काडीही वातावरण प्रसन्न करते. याचे छोटे कंद वा रोपं रोपवाटिकेत मिळतात. शुभ्र फुलांचा एकेरी व लालुंगी छटा असलेला भारदस्त दुहेरी असे दोन्ही प्रकार सुगंधाची बरसात करतात. कंद लावल्यावर नाजूक लांब पाने येतात व तळातून दांडा वर येतो. त्याच्या टोकाला कळ्या येतात. फुले हळूहळू उमलत जातात. खूप दिवस फुलत राहतात, टिकतात. कंद काढून ठेवले नाही तरी चालतात. काढून ठेवलेल्या कंदांना लावायला उशीर झाला तर कोंब फुटतात व सूचना देतात- आता लावा मला मातीत!

कंदवर्गीय फुलात विविधता खूप आहे अन् फुलण्यात सहजता. वाऱ्यावर डुलणारी, भरभरून सुगंध देणारी ही फुले पुष्परचनाकारांना आणि कविमनाला नेहमीच भावतात. म्हणूनच आपणही गुमगुणतो गीतकार योगेश यांचं गीत- रजनीगंधा फुल तुम्हारे, महके यूँही जीवन में।…

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultivation of tuberose lily gladiolus in garden these flowers bloom throughout their blooming season dvr