डॉ.शारदा महांडुळे

रोजच्या आहारात फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक अत्यंत स्वादिष्ट व रुचकर जिन्नस म्हणून जिन्याचा उपयोग केला जातो.

What did you decide on the No November trend Chatura new
चतुरा: ‘नो नोव्हेंबर’ ट्रेंड मध्ये तुम्ही काय ठरवलं?
Womens Health Suffering from abdominal
स्त्री आरोग्य – ओटीपोटीदुखीने त्रस्त आहात ?
nisargalipi Decorating glass garden
निसर्गलिपी : काचपात्रातील बाग सजवताना…
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

आयुर्वेदिक औषधांमध्येही जिरे वापरले जातात. मराठीत ‘जिरे’, हिंदीमध्ये ‘जिरा’, संस्कृतमध्ये ‘जीरक’, इंग्रजीत ‘क्युमिन’, तर शास्त्रीय भाषेत ‘क्युमिनम सिमिनम’ (Cuminum Cyminum) या नावाने जिरे ओळखले जातात. ते ‘अम्बेलिफेरी’ या वनस्पती कुळातील आहेत.

जिऱ्याची लागवड भारतात सर्वत्र केली जाते. त्यातही उत्तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारताशिवाय चीन, उ. आफ्रिका, युरोप, तुर्कस्तान, इजिप्त, सीरिया येथेही जिऱ्याचे उत्पादन घेतले जाते. थंडीमध्ये जिऱ्याची पेरणी केली जाते. त्याचे झुडूप साधारणतः एक ते दीड फूट उंचीचे असून सुगंधी असते. या झुडपांची पाने अगदी बडीशेपेच्या पानांप्रमाणे लांब आणि पातळ असून, दोन ते तीन पाने एकत्र असतात. बारा महिने वाढणारी जिरे ही वनस्पती औषधी गुणधर्मयुक्त असून, त्याची फुले आकाराने लहान व पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची असतात. या वनस्पतीच्या मुळ्या लांब व लवचिक असतात. याची फळे अतिशय लहान बीप्रमाणे असतात व त्यांचा रंग तांबूस पिवळसर असतो. याच फळाला आपण जिरे असे म्हणतो. जिरे तीव्र गंधयुक्त असतात. त्यापासून तेल बनते. हे तेलही अतिशय औषधी गुणधर्मयुक्त असून, त्यामध्ये थायमॉलचे प्रमाण जास्त असते. याचे पांढरे जिरे, शहाजिरे व काळे जिरे असे तीन प्रकार आहेत.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : जिरे रूक्ष, तिखट, किंचित उष्ण व अग्निप्रदीपक असतात. पित्तशामक, वातहारक, बुद्धिवर्धक, रुचिकारक, कफनाशक, बलदायक व डोळ्यांना हितकारक असतात. या सर्व गुणधर्मांमुळे जिरे पोट फुगणे, उलटी होणे, अतिसार, भूक कमी लागणे या विकारांवर उपयोगी पडतात.

आधुनिक शास्त्रानुसार : जिऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, उष्मांक, प्रथिने, मेद, ‘अ’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्त्वे, मिनिरल कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही सर्व पौष्टिक घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१) गायीच्या दुधामध्ये एक चमचा जिरे शिजवून त्याचा कल्क खडीसाखरेबरोबर घेतल्यास जीर्ण ज्वर नाहीसा होऊन उत्साह निर्माण होतो.

२) जिरे आणि सैंधव समभाग घेऊन लिंबाच्या रसात सात दिवसांपर्यंत भिजत घालून सुकवावेत. नंतर त्याचे चूर्ण करून सकाळ-संध्याकाळ घेतल्याने पचनशक्ती वाढून अपचन, पोट फुगणे हे विकार दूर होतात.

३) बाळंतिणीच्या आहारामध्ये जिऱ्याचे प्रमाण जास्त ठेवल्यास अंगावरील दूध वाढण्यास मदत होते व त्याचबरोबर गर्भाशय शुद्ध होण्यास मदत होते. म्हणून जिरे, जिऱ्याची पूड, जिऱ्याचा काढा किंवा जिऱ्याचे सरबत अशा विविध प्रकारे जिऱ्याची आहारामध्ये योजना करावी.

४) गर्भवती स्त्रीला जिरे अत्यंत उपयोगी आहेत. तिच्या घशामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ होऊन उलटी, मळमळ होत असेल, तर अर्धा चमचा जिऱ्याची पूड लिंबूरसाबरोबर घ्यावी किंवा जिरे घालून केलेले लिंबूसरबत घोट-घोट प्यावे. यामुळे त्रास लगेच थांबतो.

५) लहान मुलांना जंत झाले असतील, तर वावडिंगाचे चूर्ण अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा व थोडा गूळ एकत्रित करून त्याच्या लहान गोळ्या बनवाव्यात व या गोळ्या दिवसातून तीन वेळा दिल्यास पोटातील जंत मरून शौचावाटे बाहेर पडतात.

६) अजीर्ण होऊन जर ताप आला असेल, तर अशा वेळी अर्धा चमचा जिऱ्याची पूड लहानशा गुळाच्या खड्याबरोबर दिवसातून तीन ते चार वेळा सेवन करावी. यामुळे भूक वाढते व पोट साफ होते. पचनशक्ती वाढल्याने घेतलेल्या अन्नाचे पचन होऊन ताप नाहीसा होतो.

७) जुलाब लागले असतील, तर अर्धा चमचा जिरेपूड किंवा जिरे दह्याबरोबर दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावेत. यामुळे जुलाब थांबतात.

८) अजीर्ण, आम्लपित्त, भूक कमी लागणे या सर्व लक्षणांवर अर्धा चमचा जिरे गरम पाण्यात उकळून घ्यावे. हे पाणी थोडे थोडे प्यायले असता अजीर्ण, आम्लपित्त दूर होऊन भूक चांगली लागते.

९) आवाज बसणे, खोकला येणे या विकारांवरही जिऱ्याची पूड, साखर व तूप एकत्र खाल्ले असता वरील विकार दूर होतात.

१०) पोटफुगीचा त्रास जाणवत असेल, तर अशा वेळी ताकामध्ये अर्धा चमचा जिरेपूड टाकून ते ताक सकाळ-संध्याकाळ प्यायल्यास शौचाच्या जागेवाटे वात सरून फुगलेले पोट कमी होते. त्याने शौचास साफ होऊन पोटदुखी कमी होते.

११) तोंडाला चव येण्यासाठी, अपचनामुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी, आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यासाठी जिरेचूर्ण उपयोगी पडते. त्यासाठी एक चमचा तुपामध्ये खडा हिंग तळून घ्यावा, एक वाटी जिरे कढईमध्ये भाजून घ्यावेत. एक चमचा सैंधव कढईमध्ये तडतडेपर्यंत भाजून घ्यावे. या सर्व जिनसांचे मिश्रण तयार करून चूर्ण तयार करावे व हे जीरक चूर्ण वेळप्रसंगी वरील आजारांवर वापरावे.

१२) मूळव्याधीचा त्रास होत असेल, तर अशा वेळी जिरे वाटून त्याचा लेप मूळव्याधीच्या कोंबावर लावावा. यामुळे शौचाच्या जागेच्या वेदना कमी होऊन कोंबाचा आकार लहान होण्यास मदत होते.

१३) गर्भवती स्त्रीचे दिवस पूर्ण होऊन प्रसूती होण्यासाठी जिऱ्यांचा उपयोग होतो. दोन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे जिरे, चिमूटभर हिंग आणि थोडे सैंधव मिसळून हे पाणी गर्भवती स्त्रीला प्यायला दिल्यास अपानवायूला प्राकृत गती मिळून प्रसूती नैसर्गिक होण्यास मदत होते.

१४) लघवी साफ होत नसेल व लघवी करताना जळजळ होत असेल, तर जिरेपूड पाव चमचा, लिंबू व खडीसाखर घालून तयार केलेले सरबत दिवसातून तीन ते चार वेळा प्यावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवी साफ होते.

सावधानता :

जिरे किंचित उष्ण, तिखट, अग्निप्रदीपक व रूक्ष असल्याने त्याचा आहारात अति प्रमाणात वापर केल्यास पोटामध्ये दाहनिर्मिती होऊ शकते. म्हणून जिऱ्याचा आहारात योग्य प्रमाणातच वापर करावा.