Darshana Pawar Saraswati Vaidya & Crime Cases: दर्शना पवार, सरस्वती वैद्य, दिल्ली मध्ये प्रियकराने जिची ठेचून हत्या केली ती तरुणी, मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात शिरून जिच्यावर अत्याचार झाला ती विद्यार्थिनी, गुजरातला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये जिची साडी खेचून धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आलं ती महिला … या व अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत वारंवार समोर आल्या आहेत. अलीकडे एका पोस्ट वरील कमेंट वाचताना एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांच्याच अंतरंगात किती गढुळता आली आहे, हे या निमित्ताने दुर्दैवाने समोर आलं.
दर्शना पवार प्रकरणात राहुल हंडोरेला अटक झाली, तेव्हापासून अनेक फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्या. साहजिकच प्रत्येक पोस्टमध्ये दर्शनाच्या मृत्यूबाबत पहिल्या वाक्यात सर्वांनी हळहळ व्यक्त केली. पण ती हळहळ व्यक्त झाल्यानंतर जवळपास ८० % लोकांनी विचारलेला एक प्रश्न, ‘अजूनही आपली बुद्धी किती मागास आहे’ हे दाखवणारा होता. हा प्रश्न म्हणजे, “तू त्या मुलाबरोबर एकटी गेलीसच का?” आपल्याकडे एखाद्या मुलीला चारित्र्याचं सर्टिफिकेट देताना सगळेच स्वयंघोषित अधिकारी होतात, त्या मुलीने अगदी जीव गमावला असला तरी ‘बाई गं तुझे संस्कार कुठेत?’ हे विचारायला मागे पुढे पाहिलं जात नाही. म्हणजे खरंतर एखाद्या वेळेस त्या मुलीच्या मृत्यूचा दाखला यायला उशीर होईल; पण चारित्र्याचा दाखला अगदी सगळे हातात घेऊन तयार असतात.
दर्शनाला, तू त्या मुलाबरोबर एकटीने का गेलीस हे विचारणाऱ्यांनी फक्त एक उत्तर द्यावं की, एखाद्याबरोबर बाहेर जाणं म्हणजे ती त्या माणसाला आपल्याबरोबर काहीही करण्याची, अगदी अमानुष पद्धतीने जीव घेण्याची दिलेली परवानगी असते का? अजून काही कमेंट्सचा मथळा असा होता की “तुला यश मिळालं, तसं तू प्रेम विसरलीस, त्या मुलाचा किती अपमान झाला असेल, दुसऱ्याबरोबर लग्न ठरलेलं असताना तू जुन्या प्रियकराला का भेटलीस.” इतके सगळे तपशील पाहणाऱ्यांनी हा विचार केलाय की, उद्या तिने त्या माणसाबरोबर लग्न केलं असतं तर काय त्यांच्यात भांडण होणार नव्हतं? ज्या पुरुषाचा अहं इतका नाजूक आहे, त्याने भविष्यात इतर कोणत्याही मुद्द्यावरून अशी कृती केली नसती, याची खात्री काय? दर्शनाच्या चारित्र्याकडे मायक्रोस्कोप लावून पाहणाऱ्यांना गुन्हेगारांची उघड उघड विकृती दिसू नये?
बरं, फक्त दर्शनाच नाही तर वर दिलेल्या सगळ्याच घटनांमध्ये कित्येक वेळा असंबद्ध तपशिलांकडे इतक्या सखोल पद्धतीने पाहिलं जातं की मुळात ‘गुन्हा, गुन्हेगार’ सोडून हा तपशीलच एखाद्या प्रकरणाचा केंद्रबिंदू होतो. सरस्वती वैद्य प्रकरणात मनोज साने आहे की सहानी या प्रश्नाने त्या गुन्ह्याची तीव्रता कमी होणार होती का? धावत्या ट्रेनमधून जिची साडी खेचून अत्याचार करून जिला बाहेर फेकलं गेलं, तिच्याबरोबर असणारा पुरुष प्रवासी कोण होता आणि ती त्याच्याबरोबर एकटी का जात होती? हे प्रश्न नेमक्या कोणत्या तपासासाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत?
मुंबई लोकलमध्ये जेव्हा महिलांच्या डब्यात घुसून एका व्यक्तीने (जाणून बुजून नाव देत नाहीये) २० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला तेव्हा, ‘बलात्काराचा प्रयत्न झालाच नव्हता, तिचा फक्त विनयभंग झाला होता’ असं स्पष्टीकरण देणारे त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल यासाठीही परिमाण शोधणार का?
एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपशील महत्त्वाचे हे जितकं खरं आहे तितकंच कुठल्या वेळी कुठल्या तपशिलांकडे लक्ष द्यावं, हे ही आपल्याला समजायला हवं. आणि यासाठी धर्माचे, जातीचे, बुरसट विचारसरणीचे सर्व पडदे बाजूला सारून माणुसकीचा खरा चेहरा समोर यायला हवा. कारण त्या शुद्ध नजरेनेच आपण गुन्हेगारांची विकृती आणि पीडितांचे दुःख हे आडनाव, लिंग, धर्म सगळ्यापलीकडे जाऊन पाहू शकणार आहोत. बघा जमतंय का?